जाणीव आणि श्रीमंती
By admin | Published: February 13, 2015 11:02 PM2015-02-13T23:02:17+5:302015-02-13T23:02:17+5:30
अत्यंत गरिबीतून शिक्षण घेताना रात्र रात्र आई माझ्यासाठी जागायची. तिच्या कष्टामुळेच मी आज इथे दिसतोय...
विजयराज बोधनकर -
संकटकाळी अनेक माणसं एकमेकांना सहकार्य करतात. त्यामुळे अनेक संकटांचं निवारण होतं. त्या सहकार्याला जे विसरतात आणि पुन्हा स्वार्थीपणाने वागायला लागतात, तेव्हा त्यांचं हळूहळू पतन होतं. ती माणसं मग सामान्य ठरतात. त्यांनाच जाणीव नसलेली माणसं म्हणतात. पण जाणीव असलेली माणसं नेहमीच सर्वांना घेऊन चालतात. या जाणिवेच्या जाणतेपणामुळे जनमानसांत प्रसिद्धीस येतात. हा त्यांचा जाणतेपणा शुद्ध असतो, सात्त्विक असतो. ही श्रीमंत जाणीव माणसाला असा विचार करायला लावते की, आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी कष्ट घेतले, लहानाचं मोठं केलं ! नात्यागोत्यातल्या मित्रपरिवाराने अडचणीच्या वेळी मानसिक, आर्थिक सहकार्य केलं ! गरिबीच्या काळातही बायकोने काटकसरीने संसार चालविला! विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवावेत म्हणून गुरुजींनी मेहनत घेतली ! योग्यता नसतानाही एका मोठ्या माणसाच्या शिफारशीमुळे नोकरी लागलीे! कुठलंही व्याज न घेता मित्राने रक्कम दिली, म्हणून व्यवसाय बहरला ! या कंपनीत लागलो तेव्हा साधा क्लार्क होतो, पण साहेबांच्या स्फूर्ती आणि सहकार्यामुळे आज मोठ्या हुद्यावर कार्यरत आहे ! अशा हजारो उदाहरणांची पंगत इथे मांडता येईल. जे हे सारं मान्य करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात तीच माणसं मोठी होतात.
जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्माविभूषण रघुनाथ माशेलकरांनी आपल्या गुरुचा उल्लेख एका भाषणात केला. ते म्हणाले, ‘आमच्या जोशी सरांनी साबण कसा बनवितात हे दाखवायसाठी सर्व विद्यार्थ्यांना कारखान्यात नेले. तिथेच मला संशोधनाची आवड निर्माण झाली. खिशातले पैसे तिकिटासाठी वापरून कारखान्यात घेऊन जाणाऱ्या जोशी सरांमुळेच मी आज शास्त्रज्ञ झालो’ ही कृतज्ञता त्यांनी वयाच्या पंचाहत्तरीत व्यक्त केली. त्यामुळे सारे सभागृह भावनाविवश झाले. हे सांगण्याची श्रीमंत जाणीव माशेलकरांकडे होती. त्यामुळेच त्यांच्या प्रगतीची पाऊले झटपट पडली असावीत. अत्यंत गरिबीतून शिक्षण घेताना रात्र रात्र आई माझ्यासाठी जागायची. तिच्या कष्टामुळेच मी आज इथे दिसतोय... हेही सांगायला ते विसरले नाहीत. म्हणूनच रामदास स्वामी दासबोधात म्हणतात,
जाणत्याचे पहावे ज्ञान।
जाणत्याचे सिकावे ध्यान।
जाणत्याचे सुक्ष्म चिन्ह।
समजूनी घ्यावे॥
जाणीव हीच खरी ईश्वराची पूजा आहे. पण दुर्दैवाने अशा ग्रंथांचा अभ्यास होण्यापेक्षा त्या ग्रंथांचे फक्त गंध, अक्षता, फुलांनी पूजन होते व पालखीतून मिरविले जाते. म्हणूनच अभ्यासनीय कृतीपेक्षा कर्मकांडामुळेच अजाणतेपणा शिल्लक राहतो व दु:खाचा वनवास घडतो.