आधी सळसळतं चैतन्य निर्माण व्हायला हवं; आज मुलं शाळेत परततील, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 10:06 AM2021-10-04T10:06:35+5:302021-10-04T10:07:03+5:30

मुलं शाळेत कशी ‘बसतील’ याचा विचार नको, कारण गेली दीड वर्षे मुलं बसलेलीच आहेत. त्यांच्यामध्ये आता सळसळतं चैतन्य निर्माण व्हायला हवं!!

Consciousness must first be created; When the children return to school today, | आधी सळसळतं चैतन्य निर्माण व्हायला हवं; आज मुलं शाळेत परततील, तेव्हा...

आधी सळसळतं चैतन्य निर्माण व्हायला हवं; आज मुलं शाळेत परततील, तेव्हा...

Next

डॉ. श्रुती पानसे, शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासक

गेली दीड वर्षे घरात अडकून पडलेली मुलं आता पुन्हा शाळेकडे यायचं म्हणून उत्साहात दिसताहेत. मुलं जेवढी उत्साहात आहेत तेवढेच त्यांचे आई-बाबासुद्धा. या ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलेले शिक्षकसुद्धा प्रत्यक्ष शिकवायला उत्सुक आहेत. एकुणात आपली परंपरागत व्यवस्था पुन्हा सुरू होणार आहे याचा आनंद सर्वांनाच आहे. मुलं जेव्हा प्रत्यक्ष शाळेमध्ये येतील त्या वेळेला त्यांच्या मानसिकतेत काय बदल झाले असतील ते बघूया 

एक : मेंदूला अनुभवांचं खाद्य मिळत नव्हतं - ऑनलाइन शिक्षण सुरू असलं किंवा आई-बाबा घरामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटिज करून घेत असले तरीसुद्धा त्याला एक प्रकारच्या मर्यादा गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत पडल्या होत्या. मुलांच्या मेंदूला अनुभवांचं खाद्य जे मिळत होतं ते मर्यादित होतं. एकूणच शालेय मुलांचे मेंदू अनुभवांचे भुकेलेले असतात. पंचेंद्रियांमार्फत मिळणारे अनुभव मुलांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचं मन, त्यांची बुद्धी घडवीत असतात आणि तिथेच तर मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

दोन : नव्या वातावरणाशी जुळवून घेणं किंवा न्यूरोप्लास्टीिसिटी, पण चुकीच्या दिशेने!
 जरी मुलांच्या मेंदूला चालना हवी असली तरीसुद्धा गेल्या  दीड वर्षांत आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे हे बदल मुलांनीदेखील स्वतःमध्ये रुळवून घेतले होते. त्यामुळे आता  मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही, मुलांचे छंदसुद्धा आता मागे पडले आहेत, मुलं सकाळी लवकर उठत नाहीत आणि रात्री लवकर झोपत नाहीत, काहीही करण्याची इच्छाच मुलांमध्ये आता नाही, अशा तक्रारी बऱ्याच वाढल्या होत्या.  असेल त्या परिस्थितीशी  जुळवून घेण्याची प्रक्रिया मेंदूमध्ये घडते, त्यालाच न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतात. मुलांमध्ये ही आता निर्माण झालेली दिसून येते. एक प्रकारचा आळस, शैक्षणिक सुस्ती  आहे .

मोबाइलवरून शिक्षण आणि मोबाइल हेच खेळणं, असा दुहेरी वापर झाल्यामुळे मुलांची शारीरिक हालचालदेखील कमी झालेली आहे. आपली उत्साही मुलं आता याच गोष्टींना सरावली आहेत. त्यांच्यात झालेला हा बदल शिक्षकांनी आणि पालकांनी लक्षात घ्यायला हवा. हे दोन बदल लक्षात घेऊन शैक्षणिक वेळापत्रकाची आखणी केली, तर मुलांना हळूहळू मोकळं करून अभ्यासाकडे वळविता येईल. त्यासाठी कोविड टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांनुसार सुरुवातीला अभ्यास न सुरू करणं हे हिताचं आहे. मुलांना मोकळं  सोडण्यासारखे काही उपाय शिक्षक आणि पालकांनादेखील करता येतील.

चित्र - आर्ट थेरपी
लहान मुलांना चित्र काढायला देणं, अगदी मनमोकळी चित्र त्यांनी काढणं, कोणताही विषय न सांगता! त्यामुळे मुलांच्या भावविश्वातल्या गोष्टी समजतील. पहिल्या पंधरा दिवसांत मुलांकडं भरपूर चित्र काढून घ्यावीत. अंतर राखून खेळएकमेकांना स्पर्श न करता, मुलांनी धावपळ केली पाहिजे, उड्या मारल्या पाहिजेत यामुळे  रक्ताभिसरण सुधारेल आणि मेंदूला ऑक्सिजन मिळेल. 

बेसलाइन टेस्ट
मुलांना काय लक्षात आहे आणि मुलं काय विसरली आहेत यासाठी एक बेसलाइन टेस्ट शिक्षकांच्या फायद्याची राहील. ही टेस्ट अर्थातच सरप्राइज असावी. 

शैक्षणिक साधनांचा वापर
लहान मुलांना सुरुवातीला शैक्षणिक साधनांमधून शिकविलं तर मुलांवर ओझं येणार नाही. गमतीत, खेळात मुलं शिकतील म्हणजेच त्यांचं आकलन होईल. अभ्यासासाठी मुलांच्या मागे लगेचच लागू नका, अशी सूचना पालकांनासुद्धा करावी लागेल. दिव्यांग मुलं हीदेखील एका वेगळ्या मानसिक, भावनिक, शारीरिक परिस्थितीमधून गेलेली आहेत. हे लक्षात घेऊन शैक्षणिक साधनं आणि खेळ याचा वापर जास्त केला तर ते या मुलांसाठीदेखील तितकेच फायद्याचे ठरेल. मुलं शाळेत कशी ‘बसतील’, याचा विचार करण्यापेक्षा मुलं शाळेत आणि घरात ‘हालचालीतून कशी शिकतील’ याचा विचार प्राधान्याने करायला हवा. कारण गेली दीड वर्षे मुलं बसलेलीच आहेत. त्यांच्यामध्ये आधी सळसळतं चैतन्य निर्माण व्हायला हवं!!

drshrutipanse@gmail.com

Web Title: Consciousness must first be created; When the children return to school today,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.