घर घेताना तिथल्या हवा-पाण्याच्या दर्जाचा विचार करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 08:33 IST2025-02-10T08:33:06+5:302025-02-10T08:33:27+5:30
एखाद्या शहरातल्या हवा-पाण्याच्या दर्जानुसार तिथल्या घरांच्या किमती ठरायला हव्यात, असा विचार ‘झिरोधा’चे सीईओ नितीन कामत यांनी मांडला आहे.

घर घेताना तिथल्या हवा-पाण्याच्या दर्जाचा विचार करा
संजीव साबडे, ज्येष्ठ पत्रकार
आपण जेव्हा कधी मोठ्या शहरात नवे घर विकत वा भाड्याने घेण्याचे ठरवतो, तेव्हा किती विचार करतो? आपल्याला परवडेल अशा किमतीत घरे जिथे आहेत, त्या जागा शोधतो. त्यानंतर ते घर रेल्वे स्टेशन, बस स्टॉपपासून जवळ आहे का, दुकाने, शाळा, कॉलेज, रुग्णालय, रेस्टॉरंट, मंडई, औषधाचे दुकान, दवाखाना आसपास आहे का, हे पाहतो. शिवाय पार्किंगची सोय, रस्ते, लोकवस्ती कशी आहे, हेही विचारून घेतो. जवळपास कारखाने, घाणेरडी गटारे, कचरा आणि झोपडपट्टी असेल, तर तिथे घर घेण्याचे टाळतो. त्यात काहीही गैर नाही. अनेक जण तर त्या वसाहतीत कोणती भाषा बोलणारे वा कोणत्या जाती-धर्माचे लोक राहतात, याचीही बारकाईने चौकशी करतात.
हे सारे करण्यामागे जीवन सुसह्य, आनंददायी किंवा कमीत कमी त्रासदायक व्हावे, हा प्रयत्न वा इच्छा असते. आपली नोकरी, पगार, मुले या हिशेबाने प्रत्येकाला चांगले, सुखी जीवन हवे असते. मग त्यासाठी घरात एअर कंडिशनर, फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन, गिझर, शक्यतो स्मार्ट टीव्ही, कराओके, उत्तम साऊंड सिस्टीम, घराला द्यायच्या रंगांच्या शेड, चांगले मोबाइल व कार, वॉर्डरोब यासह काय काय हवे, याचीही यादी केली जाते. एकूणच ज्याला उत्तम दर्जाचे जीवन म्हटले जाते, त्याचा सर्वांनाच ध्यास असतो. मध्यवर्गीय लोक वा एकूणच सामान्य लोक आयुष्यात शक्यतो एकदाच घर विकत घेतात, त्यामुळे हे सारे केले जाते. इतका सारा विचार आपल्यापैकी बहुदा प्रत्येक जण करत असणार वा तो पूर्वी केला असणार. बांधकाम व्यावसायिकही घरांच्या जाहिराती करताना काय-काय नागरी सुविधा तिथे आहेत आणि फ्लॅट लवकर बुक केल्यास किंमत किती कमी करणार हे नमूद करतात.
पण आपण जिथे घर घेणार आहोत वा ते घेतले आहे, तेथील हवेची गुणवत्ता कशी आहे, तिथे स्वच्छ हवा मिळते की प्रदूषित, हा विचारही आपल्या मनात अजिबात म्हणजे अजिबातच येत नाही. दिल्लीतील हवा फार वाईट आहे, तिथे केवळ थंडीतच नव्हे, तर वर्षाचे बारा महिने प्रदूषण असते, हे आपल्याला माहीत असते. त्यामुळे बरे झाले, आपल्याला तिथे राहण्याची वेळ आली नाही, असे बोलून दाखवतो. पण मुंबई, बंगळुरू या शहरांची स्थितीही तितकीच वाईट आहे. जितक्या सुविधा अधिक तितकी घराची किंमत अधिक असे गणित असेल, तर जिथे प्रदूषण अधिक वा हवेची गुणवत्ता म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स वाईट तिथे घरांच्या किमती कमीच असायला हव्यात की! हा विचार आपण करत नसलो तरी रिअल इस्टेट व्यवसायातील झिरोधा या बड्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत यांनी सुरू केला आहे.
स्वतःच्या दीर्घायुष्यासाठी विविध प्रयोग करणारे ब्रायन जॉनसन यांच्या एका ताज्या वक्तव्यानंतर ही बाब त्यांचा लक्षात आली. ब्रायन जॉनसन हे जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील खूप मोठे नाव आहे. नितीन यांचे बंधू निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये मुलाखत द्यायला आलेले जॉनसन बंगळुरूमध्ये तोंडाला मास्क लावून बोलत होते आणि अचानक संभाषण थांबवून त्या स्टुडिओतून ते निघून गेले. इथे भयंकर प्रदूषण आहे, असा शेराही त्यांनी जाताना मारला. या घटनेची बरीच चर्चाही झाली. नितीन कामत यांच्या लक्षात आले की केवळ दिल्लीत नव्हे, तर बंगळुरूमध्येही प्रचंड प्रदूषण आहे आणि वांद्र्यात समुद्रासमोरील भागातही हवेचा दर्जा कमालीचा खराब असतो.
खराब व प्रदूषित हवेमुळे लोकांना श्वसनाचे आजार होतात आणि काहींना, तर कर्करोगही होतो, याचा उल्लेख कामत यांनी सोशल मीडियावर केला आहे. ते लिहितात की, वांद्रे समुद्रकिनारा वा बंगळुरूच्या जेपी नगरमध्ये हवेचा दर्जा खराब असूनही घरांच्या किमती चढ्या आहेत. पण, हवा व पाण्याचा दर्जा आणि घरांच्या किमती यांची सांगड घालणे आवश्यक आहे. जिथे दर्जा वाईट, तिथे घरांच्या किमती कमी असाव्यात आणि जिथे तो उत्तम आहे, तिथे लोकांनी राहायला यावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नितीन कामत यांनी मांडलेला विचार प्रत्यक्षात येईल का कोणास ठाऊक, पण किमान आपण घर घेताना हा मुद्दा लक्षात घ्यायलाच हवा.
sanjeevsabade1@gmail.com