बांधणी उद्ध्वस्त किल्ल्यांची.. ..शोध फरार किल्लेदारांचा !
By सचिन जवळकोटे | Published: December 1, 2019 09:19 AM2019-12-01T09:19:37+5:302019-12-01T09:20:39+5:30
लगाव बत्ती
- सचिन जवळकोटे
केवळ ‘कमळा’चा तिरस्कार अन् ‘देवेंद्रपंतां’चा द्वेष या ‘कॉमन’ फॅक्टरवर ‘बारामतीकरांची शिवशाही’ निर्माण झालेली. ‘ठाकरे घराणं’ अखेर सिंहासनावर विराजमान झालेलं. आता ‘थोरले काका बारामतीकरां’ना वेध लागलेत आपल्या ढासळलेल्या बालेकिल्ल्यांच्या दुरुस्तीचे. आता मोहीम सुरू होईल उद्ध्वस्त बुरुजांच्या पुनर्बांधणीची. शोध घातला जाईल फरार सरदारांचा. कहाणी रंगेल गद्दार किल्लेदारांच्या सुडाची. होय...अन् हे सारं सर्वाधिक ताकदीनं घडेल सोलापूर जिल्ह्यातच...कारण एकेकाळी ‘बारामती’नंतर हाच टापू होता ‘थोरल्या काकां’साठी अत्यंत भरवशाचा...हक्काचा...विश्वासाचा.
गेली पाच वर्षे ‘कमळा’च्या साम्राज्यात ‘टांगा पलटी...घोडे फरार !’ हे नाट्य कैक राजकारण्यांना खूप-खूप आवडलेलं. तीस-चाळीस वर्षांचे ऋणानुबंध एका झटक्यात तोडून अनेकजण ‘बारामतीकरां’ना रक्ताळलेला खंजीर दाखविण्यात रमलेले. ‘थोरल्या काकां’च्या पाठीत सर्वाधिक वार कुठं झाले असतील तर ते ‘भीमा-नीरा’ खो-यात. अर्थात सोलापूर अन् सातारा जिल्ह्यात. विशेष म्हणजे हे दोन्हीही जिल्हे त्यांच्या हुकमी राजवटीचे. याच पट्ट्यातून ते एकेकाळी खासदार बनून केंद्रीय मंत्री झालेले. तरीही यंदा घातकी राजकारणाचा धुराळा उठलेला. आता ‘बारामतीकरांचं राजकारण’ संपलं.. ‘घड्याळाची टिकटिक’ बंद पडली, अशा भ्रमात बहुतांश प्रमुख सहका-यांनी ‘थोरल्या काकां’कडं पाठ फिरविलेली. यातूनच लोकसभेला प्रथम ‘माढ्याचा गड’ पडलेला. विधानसभेलाही जिल्ह्यात ‘कमळा’चे चार आमदार झालेले. दोन अपक्ष आमदारही त्यांच्याच छावणीत रमलेले.
विधानसभा रणसंग्रामापूर्वी सोलापुरात आलेल्या ‘थोरल्या काकां’नी पहिल्यांदाच घरभेद्यांविषयी बोलताना अत्यंत आक्रमकपणे आपली भावना व्यक्त केली होती, ‘याद राखा...एकेकाला बघून घेतो!’ आता त्यांच्या ‘चाणक्य नीती’तून त्यांचंच सरकार आलंय. ‘बघून घेण्याची’ वेळ खºया अर्थानं आलीय. त्या दृष्टीनंच पडू लागलीत त्यांची पावलं. सुरुवात होईल मंत्रीपदापासून. मुंबईचे ‘लाल दिवे’ जातील ‘धनुष्यबाणा’ला. मराठवाडा-विदर्भातली पदं घेतील ‘हात’वाले. पश्चिम महाराष्ट्रातल्या खुर्च्या मात्र स्वत:कडेच अधिक ठेवतील ‘थोरले काका’. राहता राहिला विषय जिल्ह्यातल्या तीन आमदारांचा. यापैकी कुणाला मिळू शकते संधी, याचीच ही चाचपणी.
‘माढ्याचे बबनदादा’ हे ‘बारामतीकरां’चे विश्वासू सहकारी (एकेकाळचे!). दहा वर्षांपूर्वी अकलूजमधल्या पाटलांचा वाडा टाळून निमगावातल्या शिंदेंच्या गढीकडं ‘थोरले काका’ भोजनासाठी गेले, तेव्हापासून तर जिल्ह्याची सूत्रंच जणू ‘दादां’कडंच आलेली. अशात ‘अजितदादां’कडूनही राजकीय ताकद मिळालेली; मात्र गेल्या तीन-चार महिन्यांतील ‘बबनदादां’ची चुळबूळ ‘थोरल्या काकां’नी अचूक हेरलेली. पक्षाच्या बैठकीला दांडी मारणारे हे ‘दादा’ जेव्हा ‘सावंतां’ना भेटायला गेले, तेव्हाच म्हणे ते मनातून उतरलेले.
खरंतर या ‘दादां’ना ‘धनुष्यबाणा’चं तिकीट मिळावं, अशी इच्छा खुद्द ‘देवेंद्रपंतां’ची होती; मात्र आपल्याच पक्षात आपलाच दुश्मन मोठा करून ठेवायला ‘तानाजीराव’ थोडेच दुखखुळे होते. त्यांनी तिकीटच मिळू दिलं नाही. त्यामुळं दोघांचाही नाईलाज झाला. म्हणजे ‘दादां’चा अन् ‘घड्याळा’चा. दोघांनाही एकमेकांशिवाय दुसरा पर्याय नसल्यानं पुन्हा ‘दादां’च्या हातात ‘घड्याळ’ लकाकलं. आता विषय इतकाच की, जुना भुतकाळ उकरून काढून इतकी वर्षे निष्ठेनं काम केलेल्या सहकाºयाला पुन्हा कुजवत ठेवायचं की ‘अजितदादां’च्या बाबतीत वापरलेला ‘चलो.. माफ कर दिया !’ हा फॉर्म्युला ‘निमगावकरां’साठीही राबवायचा.. म्हणजे ‘बबनदादां’ना एकदा ‘लाल दिव्याची’ संधी द्यायची.. कारण ‘अकलूजकरां’समोर एकच खमका नेता सध्या जिल्ह्यात शिल्लक; ते म्हणजे ‘बबनदादा’.
पंढरपूरचे ‘भारतनाना’ही सध्या प्रचंड चर्चेत. दरवेळी वेगवेगळ्या चिन्हावर निवडून येणारे ‘नाना’ यंदातरी ‘लाल दिवा’ घेऊन येतील, असं चित्र दिसू लागलंय. सारे नेते साथ सोडून निघून जाताना हे ‘नाना’ मात्र चक्क सुशीलकुमारांचा ‘हात’ सोडून ‘थोरल्या काकां’कडं आलेले. खरंतर त्यांनी शेवटपर्यंत ‘कमळा’ची वाट पाहिलेली; मात्र ‘पंतांचा वाडा’ रस्त्यात आडवा आला. त्यामुळं त्यांनी ‘बारामती’ची वाट धरली. अशात त्यांचा सूड घेण्याचा प्रयत्न ‘हात’वाल्यांनी केलेला. लोकसभेला ‘दोन खोकी’ उघडूनही ‘नानां’नी प्रचारात ‘पॅक अप्’ केल्यानं विधानसभेला ‘काळुंगें’चा पत्ता मुद्दाम ‘हात’वाल्यांनी ऐनवेळी ओपन केलेला. असो. गद्दारांच्या वादळातही कोण कुठल्या ‘नानां’नी आपल्या डळमळीत तंबूवर विश्वास ठेवला, याची जाणीव नक्कीच असणार ‘थोरल्या काकां’ना.
मोहोळचे ‘नवखे उमेदवार’ चक्क ‘यशवंत आमदार’ बनले. वर्षानुवर्षे ‘घड्याळ्या’ला साथ देणा-या ‘मोहोळ’च्या ऋणातून उतराई होण्यासाठी याच ‘मानें’च्या नावाचाही सध्या विचार सुरू; मात्र ते ठरले अद्याप नवीन. त्यापेक्षा ‘अनगर’च्या ‘पाटलां’ना विधान परिषदेवर घेऊन त्यांना ‘लाल दिवा’ दिला तर जिल्ह्यात पक्ष होऊ शकतो अधिक स्ट्राँग, याची पुरती जाणीव ‘थोरल्या काकां’ना. ते मध्यंतरी सोलापुरात आले होते, तेव्हा ‘हुतात्मा’च्या व्यासपीठावर किरकोळ कार्यकर्त्यांनाही जागा देऊन स्वत: बाजूला उभारणाºया या ‘अनगरकरां’च्या नेतृत्वाची खुबी केव्हाच ओळखलेली या ‘काकां’नी.. तेव्हा पाहूया आता ‘बारामतीकर’ विचार भुतकाळाचा करतात की भविष्यकाळाचा ! तोपर्यंत लगाव बत्ती...
‘थोरले काका बारामतीकर’ यांच्या निशाण्यावर म्हणे सध्या चार नावं टॉपवर. विजयदादा अकलूजकर, दिलीपराव बार्शीकर, प्रशांतपंत पंढरपूरकर अन् लक्ष्मणराव वाघोलीकर. त्यातले ‘बार्शीकर’ हे सध्या ‘मातोश्री’कारांच्याच छावणीत असल्यानं त्यांना होणार नाही एवढा त्रास. बाकीच्या तिघांबाबतीत मात्र ठरवलं जातंय परफेक्ट धोरण. आता ते ‘देवेंद्रपंतां’सारखं सत्तेतल्या सुडाचं असेल की ‘लाडक्या पुतण्या’सारखंच ‘माफीचा साक्षीदार’ बनविण्याचं, याचं उत्तर काळच देईल. तोपर्यंत लगाव बत्ती...
(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)