साहित्य संमेलनांच्या ठरावांचा विनोद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:46 PM2017-12-26T23:46:09+5:302017-12-26T23:46:17+5:30
साहित्य संमेलनांच्या ठरावामध्ये अस्सल विनोदांचे बीज असते. यामुळे प्रेरणा घेऊन खरे तर मराठी साहित्यात विनोदाच्या लडी फुटल्या पाहिजेत;
साहित्य संमेलनांच्या ठरावामध्ये अस्सल विनोदांचे बीज असते. यामुळे प्रेरणा घेऊन खरे तर मराठी साहित्यात विनोदाच्या लडी फुटल्या पाहिजेत; पण आज काल सारस्वतांना कसे विनोदाचे जरा वावडेच दिसते. विनोदापेक्षा कवितेचा घाणा काढणे सोपे असल्याने कवीचे अमाप पीक आल्याची कबुलीच देऊन टाकली आहे. तर विषयाला नको म्हणून ठराव आणि विनोद हे कसे काय बुवा असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अंबाजोगाई येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याचा ठराव झाला. मुकुंदराजाच्या पावन भूमीत असे विद्यापीठ होणे संयुक्तिकच आहे. मराठी ही वैश्विक भाषा व्हावी यासही कुणाची हरकत असण्याचे कारण नाही; पण मराठी राज्यातच मराठीची अवस्था बटकीसारखी झाली. गावापासून ते पार तावडेंच्या दालनापर्यंत इंग्रजीचा तोरा वाढला तो इतका की पोरगही बापाला बाबा न म्हणता पप्पा म्हणते. आईसुद्धा सुन्याचे पप्पा असे संबोधते, तर मराठीची अशी ही गळचेपी आपणच केली. मराठी कवीसारखे गावोगाव इंग्रजी शाळांचे काँग्रेस गवत उगवले आणि मराठी शाळा आचके देऊ लागल्या. त्यातच सरकारने दुर्गम भागातील १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने तेथे तर मराठीचा श्वासच घोटण्यात आला. आता खासगी कंपन्यांना आपल्या लोककल्याण फंडातून शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याने मराठीची आणखीनच परवड होणार आहे, कारण हे उद्योग मराठी शाळा सुरू करून आतबट्ट्याचा व्यवहार करणार नाहीत. शालेय स्तरावर ही मराठीची अवस्था तर महाविद्यालयीन स्तरावर मराठी विषयाच्या वाटेला जाणारे विद्यार्थी अभावानाचे दिसतात. कसे बसे विद्यार्थी गोळा करून तासिकांचा मेळ घालण्याचा उपद्व्याप प्राध्यापकांनाच करावा लागतो नसता ‘वर्कलोड’च्या मुद्यावर नोकरीचा धोका असतो. विद्यापीठाच्या स्तरावर तर याहीपेक्षा काळजी करण्याची स्थिती आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी संख्या रोडावली. या अधोगतीचे कारण व्यवहारात मराठी भाषेची किंमत शून्य आहे. नोकरीची शाश्वती नाही त्यामुळे इकडे कुणी वळणार नाही. बरे जी मराठी शिकून मुले बाहेर पडतात त्यांना तरी ती शुद्ध लिहिता-बोलता येते का, तर हासुद्धा संशोधनाचा विषय आहे. मुळातच इंग्रजीच्या शुद्धतेविषयी आपण जेवढे जागरूक असतो तेवढेच बेफिकीर मराठीबाबत. ही मानसिकता घट्ट झाल्याने मराठीत ‘सबकुछ चलता हेै’ असे आपण मानतो. दक्षिणेतील भाषेचा लोकाश्रय कमी झालेला नाही. उत्तरेची हिंदी ही तर राष्ट्रभाषा तिला धोका नाही आणि इंग्रजीच्या आक्रमणाने हिंदीचा संकोच झाल्याची तक्रार नाही. मराठीचे नाणे खोटे कारण तिच्याच मुलांनी तिला वृद्धाश्रमात पाठवायचे ठरवले. तर अशा मराठीचे विद्यापीठ स्थापून करणार काय?