देश संरक्षणासाठी खान्देशपुत्रांचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2017 11:38 PM2017-04-07T23:38:06+5:302017-04-07T23:38:06+5:30

भामरे, सुनील भोकरे व चंदू चव्हाण या तीन खान्देशपुत्रांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने देशाच्या संरक्षणासाठी योगदान दिले आहे.

The contribution of the children to the protection of the country | देश संरक्षणासाठी खान्देशपुत्रांचे योगदान

देश संरक्षणासाठी खान्देशपुत्रांचे योगदान

Next

डॉ. सुभाष भामरे, सुनील भोकरे व चंदू चव्हाण या तीन खान्देशपुत्रांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने देशाच्या संरक्षणासाठी योगदान दिले आहे. त्यांचा सत्कार करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त होत आहे.
भारतीय सेना दलाचे नावलौकिक उंचावणाऱ्या तीन खान्देशपुत्रांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा सध्या खान्देशात सुरू आहे. सर्जिकल स्ट्राइकच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप परत आलेला जवान चंदू चव्हाण आणि नौसेनेच्या व्हाईस अ‍ॅडमिरलपदी पोहोचलेले सुनील भोकरे यांचे विविध ठिकाणी होणारे सत्कार, त्यातून सेना दलाच्या कर्तृत्वाचे विराट दर्शन आणि सेना दलात सहभागी होण्याचे तरुणांना आवर्जून केले जाणारे आवाहन या जमेच्या बाजू आहेत.
धुळ्यातील प्रसिद्ध सर्जन डॉ.सुभाष भामरे यांना राजकीय वारसा असला तरी ते आवडत्या वैद्यकीय सेवेत रमले. वडील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तर आई आमदार, अशी परंपरा असल्याने अखेर गेल्या विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेतर्फे रिंगणात उतरले. अपयश आले; पण लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर ते निवडून आले. दोन वर्षातच केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. वैद्यकीय व्यावसायिक असल्याने आरोग्य मंत्रालय मिळेल, अशी अपेक्षा असताना त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण अशा संरक्षण खात्याचे राज्यमंत्रिपद देण्यात आले. वन रँक वन पेन्शन, सर्जिकल स्ट्राइक, सुरक्षा जवानांच्या समाजमाध्यमांमार्फत मांडण्यात आलेल्या कैफीयती हे विषय गाजत असताना डॉ.भामरे हे त्यांच्या मूळ संयमी स्वभावानुसार संरक्षण दलाची भूमिका मांडत होते. सर्जिकल स्ट्राइकच्या दुसऱ्याच दिवशी चंदू चव्हाण हा भारतीय जवान सांबा सेक्टरला कर्तव्य बजावत असताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पोहोचला. सुरुवातीला असा कोणताही जवान पाकिस्तानमध्ये नसल्याची भूमिका पाकिस्तानने घेतली. मात्र भारताच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त रणनीतीमुळे चंदू चव्हाण पाकिस्तानात असल्याचे त्यांना मान्य करावे. डॉ. भामरे यांच्या मतदारसंघातील बोरविहीर या गावातील चंदू हा रहिवासी असल्याने डॉ.भामरे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. भामरे हे संरक्षण राज्यमंत्री असल्याने चंदूसाठी त्यांनी प्रयत्न करावे, अशी खान्देशवासीयांची अपेक्षा होती. या अपेक्षांचे ओझे, सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानसोबत ताणले गेलेले संबंध या पार्श्वभूमीवर शिष्टाई कितपत यशस्वी होईल, या विषयी साशंकता होती. परंतु ११४ दिवसांनंतर चंदू वाघा सीमा ओलांडून भारतात परतला. खान्देशात आनंदोत्सव साजरा झाला.
महिन्याभरानंतर डॉ.भामरे हे त्याला गावी घेऊन आले. गावकऱ्यांना दिलेला शब्द पाळल्याने चंदूसोबत डॉ.भामरे यांचे जल्लोषात स्वागत झाले. चंदू नसल्याने दिवाळी साजरी झाली नव्हती, ती मार्च महिन्यात साजरी झाली. चंदू पाकिस्तानात पकडला गेल्याच्या वृत्ताने आजीने प्राण सोडला होता. तिच्या अस्थींचे विसर्जन चंदूसाठी थांबविण्यात आले होते. नाशिकला जाऊन त्याने अस्थिविसर्जन केले. चंदू तसा मूळचा सामनेरचा (जि.जळगाव) रहिवासी. लहानपणी आई-वडील वारल्याने तो बोरविहीरला आजोळी आला. मोठा भाऊ भूषण आणि चंदू अशा दोघांचे सैनिक बनण्याचे स्वप्न होते. दोघांची स्वप्नपूर्ती झाली. परंतु चंदूचे सीमा ओलांडणे आणि पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप सुटणे या घटनांमुळे बोरविहीर हे गाव भारतीय माध्यमांच्या नकाशावर आले. चंदूच्या सुटकेनंतर धुळे, सामनेर यासह अनेक गावांमध्ये मिरवणुका, सत्कार, मंदिरांमध्ये आरती, मुलाखती असे कार्यक्रम अजूनही सुरू आहे. त्याची आपबिती ऐकून अंगावर शहारे येतात. परंतु त्याची दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे तो मानसिक व शारीरिकदृष्ट्या सावरत आहे.
गुढे (जि. जळगाव) येथील सामान्य कुटुंबातील सुनील भोकरे हे भारतीय नौदलाच्या व्हाईस अ‍ॅडमिरल या महत्त्वपूर्ण पदावर पोहोचल्याबद्दल जन्मगावी ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. कारगिल युद्धात भोकरे यांनी विशेष कामगिरी बजावली होती. छोट्या गावातून आणि मराठी माध्यमातून शालेय शिक्षण झालेला विद्यार्थी सैनिकी स्कूल व एनडीएमध्ये यशस्वी होऊ शकतो, हे लक्षात घेऊन मराठी तरुणांनी सेना दलाकडे करिअर म्हणून पहावे, असे आवाहन
त्यांनी केले. इंग्रजीवर प्रभुत्व आणि संवादकौशल्यात वाढ केल्यास मराठी तरुण यशस्वी होऊ शकतात, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
- मिलिंद कुलकर्णी

Web Title: The contribution of the children to the protection of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.