वादग्रस्त साथी

By admin | Published: March 2, 2016 02:48 AM2016-03-02T02:48:04+5:302016-03-02T02:48:04+5:30

एकीकडे समाजवादी साथी अशी ओळख जपत असतानाच दुसरीकडे जातीयवादाचे आरोप झेलत मुस्लीम मतपेटी भक्कम ठेवणाऱ्या निहाल अहमद मौलवी मोहम्मद उस्मान यांच्या

Controversial Partner | वादग्रस्त साथी

वादग्रस्त साथी

Next

एकीकडे समाजवादी साथी अशी ओळख जपत असतानाच दुसरीकडे जातीयवादाचे आरोप झेलत मुस्लीम मतपेटी भक्कम ठेवणाऱ्या निहाल अहमद मौलवी मोहम्मद उस्मान यांच्या निधनाने समाजवादी चळवळीतील वादग्रस्त पर्वाची अखेर झाली आहे. तब्बल २७ वर्षे विधानसभेत मालेगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निहालभाईंनी राज्यातील ‘पुलोद’ सरकारमध्ये तंत्र व उच्च शिक्षणासह रोजगार हमी योजना मंत्री म्हणून काम केले असले आणि काही काळ विरोधी पक्ष नेते म्हणूनही भूमिका बजवली असली तरी, मालेगावलाच त्यांनी आपल्या चळवळीचे व राजकारणाचे केंद्र बनविले होते. त्यामुळे राज्यस्तरीय नेतृत्व केल्यानंतरही अखेरच्या काळात त्यांनी मालेगावचे प्रथम महापौर होण्याची संधीही घेतली. वरकरणी जातीयवादाचा विरोध करीत आपली समाजवादी भूमिका जपणाऱ्या निहालभाईंचे संपूर्ण राजकीय जीवनच संघर्षमय व वादळी राहिले आहे. विशेषत: मालेगावातील गणेशोत्सवात एका मंडळाने रस्त्यात केलेली आरास काढण्याची सूचना अमान्य केली गेल्यावर ती स्वत:हून पाडून टाकण्याच्या त्यांच्या कृतीने ते अधिक चर्चेत आले व वादग्रस्त ठरले. अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनानंतर आपल्या शर्टाच्या डाव्या हाताच्या बाहीवर सतत काळीपट्टी बांधण्याच्या भूमिकेने तसेच २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यासाठी त्यांनी आंदोलन छेडल्याने त्यांच्यावरील जातीयवादाचा आरोप अधिक गहिरा झाला, पण या आरोपांची फिकीर न बाळगता त्यांनी कायम आपला मुस्लीम मतदार आपल्यासोबत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. मालेगावातील हातमाग विणकर, अल्पशिक्षित व असंघटीत मुस्लीम तसेच तळागाळातील वर्गासाठी नित्यनवी आंदोलने करून रस्त्यावर उतरणाऱ्या व सायकल चालवित चर्चेत राहणाऱ्या निहालभाईंपासून त्यांच्या अखेरच्या काळात मात्र पारंपरिक मतदार दुरावल्याचे दिसून आले. विधानसभेच्या निवडणुकीसह लोकसभेची निवडणूकही लढवून पाहिलेल्या भाईंना मालेगाव महापालिकेतही अलीकडच्या काळात पिछाडीचा सामना करावा लागला, त्यानंतर त्यांनी राजकीय संन्यास घोषीत करून पत्नी साजेदा व पुत्र बुलंद इक्बाल यांना आपले राजकीय वारस म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातही यश आले नाही. तरीही न खचता त्यांची समाजासाठीची चळवळ सुरूच होती. राजकारणातील यशापयशाखेरीजही मालेगाव म्हणजे निहालभाई, असे घट्ट समीकरण असलेल्या या साथीचे जन्मदिनीच जाणे म्हणूनच मालेगावकरांना चटका लावणारे ठरले आहे.

Web Title: Controversial Partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.