माध्यमे व बॉलिवूड यांच्या वादातून सरकारला मुजोरी करण्याची संधी मिळता कामा नये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 01:26 AM2020-10-14T01:26:49+5:302020-10-14T06:51:49+5:30
चित्रपटातील हिरो हा व्यक्तिगत आयुष्यात ‘ड्रगिस्ट’ आहे ही प्रतिमा एखाद्या मुन्नाभाईला यश देऊन गेली तरी सर्वांना तारून नेत नाही, उलट अशी प्रतिमा चित्रपटाच्या धंद्यावर परिणाम करते. हे सध्या बॉलिवूडला परवडणारे नाही.
बॉलिवूडमधील घडामोडींचे वार्तांकन सभ्यतेने व्हावे व बदनामी करणारी शेरेबाजी करण्यास निर्बंध घालावे, अशी अपेक्षा दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेतून जवळपास एकमताने व्यक्त करण्यात आली आहे. बड्या तारे-तारकांसह इंडस्ट्रीतील ३७ संघटनांच्या वतीने रिपब्लिक टीव्ही व टाइम्स नाऊ टीव्ही यांच्या विरोधात बॉलिवूडने ही याचिका केली. आमीर, सलमान, शाहरूख अशा सरकारविरोधी मते असणाऱ्या अभिनेत्यांबरोबर अक्षय कुमार, अजय देवगण असे मोदी समर्थक समजले जाणारेही याचिकाकर्ते आहेत. वार्तांकनाच्या विरोधात कोर्टाची पायरी चढण्याची बॉलिवूडची ही पहिलीच वेळ असेल. गॉसिप हे बॉलिवूडचे इंधन ! तारेतारकांच्या रंगेल गोष्टी बॉलिवूडमधूनच माध्यमांकडे जाऊन चघळल्या जातात. बॉलिवूडची त्याबद्दल तक्रारही नसते. उलट जितके गॉसिप होईल तितके चांगले अशी बॉलिवूडची रीत आहे. मात्र सुशांतसिंह प्रकरणानंतर माध्यमांतून, विशेषत: वरील दोन वाहिन्यांवरून, सुरू झालेले गॉसिप हे बॉलिवूडच्या प्रतिमेला नख लावणारे होते. या वाहिन्यांवरील चर्चांमध्ये बॉलिवूडला लावलेली विशेषणे ही केवळ तारेतारकांच्या रंगढंगांबद्दल नव्हती तर ‘अंमलीपदार्थांच्या विळख्यात सापडलेले बॉलिवूड’ अशी प्रतिमा निर्माण करणारी होती. बॉलिवूडला हे अपेक्षित नव्हते.
अंमलीपदार्थांचा बॉलिवूडमधील वापर ही नवी गोष्ट नव्हती. मात्र त्यामुळे सर्व इंडस्ट्री ‘ड्रग कार्टेल’च्या हातात आहे ही मांडणी अतिशयोक्त होती. अर्थात वस्तुस्थितीला धरून बातम्या देण्यापेक्षा मनोरंजन करण्याची ओढ सध्या खासगी वृत्तवाहिन्यांना आहे आणि रंजनात्मक बातम्यांमध्येच बहुसंख्य प्रेक्षकांना अधिक रस असल्याने टीआरपीच्या शर्यतीत उतरलेल्या वाहिन्यांतून सारासार विवेकाने बातम्या येणे शक्यच नव्हते. जास्तीत जास्त प्रेक्षक खेचण्याच्या नादात या वाहिन्यांनी बॉलिवूडवर आक्षेपार्ह शब्दांची चिखलफेक सुरू केली. अशा पद्धतीची चिखलफेक व हीन पातळीवरील वार्तांकन अमेरिकेतील हॉलिवूडबद्दल अनेकदा झाले आहे. हॉलिवूडमधील माफिया राजची तपशीलवार वर्णने प्रसिद्ध झाली आहेत. मात्र त्यावरून तेथे गहजब होत नाही, कारण हॉलिवूडला आपली प्रतिमा जपण्यापेक्षा व्यवसायात अधिक रस असतो. भारतात तसे नाही. बॉलिवूडला आपली प्रतिमा जपायची असते. नेते वा अभिनेते यांचे व्यक्तिगत चारित्र्य खासगी गप्पातून सार्वजनिक गप्पात उतरले की जनमानसावर मोठा फरक पडतो हे राजकीय नेते व बॉलिवूडला माहीत आहे.
सध्या कोविडमुळे बॉलिवूडसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी काही चित्रपटांनी चांगला धंदा करणे इंडस्ट्रीसाठी अत्यावश्यक आहे. अशा वेळी लोकांनी ड्रगिस्ट बॉलिवूडकडे पाठ फिरविली तर तो फटका मोठा असेल. या परिस्थितीत संपूर्ण इंडस्ट्रीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उमटविणारी पत्रकारिता थांबवली जावी, अशी अपेक्षा बॉलिवूडने केली तर ते समजण्याजोगे आहे.
मात्र यामुळे वस्तुस्थितीला सोडून वार्तांकन करणाऱ्यांची दोषांतून सुटका होत नाही. वस्तुस्थितीला न जुमानता वैचारिक, आर्थिक वा भावनिक कलाने वार्तांकन करण्याची खोड सध्या वाढली आहे. माध्यमांतील वार्तांकनामध्ये सभ्यता असावी, ते वस्तुस्थितीला धरून असावे ही बॉलिवूडची मागणी राजकारणापासून अन्य क्षेत्रांनाही लागू आहे.
बॉलिवूडच्या याचिकेमुळे कोर्टाच्या मार्गाने का होईना, अशी सभ्यता माध्यमांमध्ये येत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. माध्यमांकडून अशीच अपेक्षा बजाज, पार्ले यांच्यासह काही बड्या जाहिरातदारांनी व्यक्त केली आहे आणि काही वाहिन्यांच्या जाहिराती थांबविल्याही आहेत. बाजारपेठ स्वत:च स्वत:ला कशी शिस्त लावू शकते याची ही उदाहरणे ! बाजापेठेतील शक्ती या कायम शोषण करणाऱ्या नसतात तर काही चांगल्या गोष्टीही त्या घडवून आणू शकतात. सरकारी अंकुशापेक्षा बाजारपेठेचा अंकुश हा जास्त लोकशाही स्वरूपाचा असतो. माध्यमे व बॉलिवूड यांच्या वादातून सरकारला मुजोरी करण्याची संधी मिळता कामा नये. तात्पुरत्या टीआरपीपेक्षा वार्तांकनातील वस्तुनिष्ठता व सभ्यता ही दूरगामी नफा देणारी आहे याचे भान सर्वांनी ठेवावे.