मिठीबाबतचा दुटप्पीपणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 06:21 AM2018-08-23T06:21:18+5:302018-08-23T06:22:31+5:30
देशापुढचे महत्त्वाचे प्रश्न सोडून राष्ट्रीय पक्षांचे प्रवक्ते जेव्हा मिठ्यांवर किंवा आलिंगनांवर उतरतात तेव्हा खरे तर त्यांचेही बुद्धिबळ परीक्षेला बसविण्याच्याच योग्यतेचे असते हे आपण समजून घ्यायचे असते.
भारताचा माजी क्रिकेटपटू व पंजाब सरकारात मंत्री असलेला नवज्योत सिंग सिद्धू हा परवा पाकिस्तानचा क्रिकेटपटू पंतप्रधान इम्रान खान याच्या शपथविधीला हजर राहायला त्याने दिलेल्या निमंत्रणावरून गेला. त्याची ही भेट शासकीय नव्हती. क्रीडांगणावरच्या स्मरणांना उजाळा देण्यासाठी, त्या क्षेत्रातून राजकारणाच्या पटलावर आलेल्या दोन स्रेह्यांची ती भेट होती. तीत सिद्धूने पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांना प्रेमाने आलिंगन दिले. तसे ते त्याने इम्रानलाही दिले. या घटनेत देशाला एक सरळसाधी स्नेहभेट दिसली. मात्र राजकारणी माणसांना प्रत्येक गोष्टीचे भांडवल करायचे असल्याने भाजपमधील काहींना त्या भेटीत विशेषत: त्या आलिंगनात भारतविरोध दिसला. भाजपचे एक प्रवक्ते पापण्या पूर्ण न उघडता अर्ध्या डोळ्यांनी बोलतात. त्यांच्या कपाळावर गंधाचा टिळाही असतो. जगाला दिसलेल्या सिद्धूच्या त्या साध्या भेटीतला भारतद्वेष या जड डोळ्यांनी बोलणाऱ्या संबित पात्राला दिसला. लष्करप्रमुखाला व इम्रानला आलिंगन देऊन सिद्धूने भारताचा व भारतीय जवानांचा अपमान केला असा एक जंगी शोधच त्यातून त्याने लावला. हा संबित पात्रा भाजपचा प्रवक्ता आहे आणि त्याला ओएनजीसीचे सदस्यत्व, प्रचंड मानधनासह देऊन मोदींनी त्याची चांगली सोय केली आहे. (त्याच्या डॉक्टरीचा परवाना का काढून घेतला गेला हे कधीतरी त्यालाच विचारले पाहिजे.) त्यामुळे त्याने सिद्धूचे वागणे देशहिताचे नसल्याचे व शत्रूशी हातमिळवणी करणारे असल्याचे सांगून टाकले. चीनचे भारताशी वैर आहे. त्याचे सैन्य आपल्या उत्तर सीमेवर उभे आहे आणि डोकलामच्या परिसरात त्याच्या सैन्याची व आपली तब्बल २१ दिवस समोरासमोरची खडाखडी झाली आहे. तरीही मोदींनी चीनचे अध्यक्ष शी झिपिंग यांना अलाहाबादेत बोलविले. त्यांना साबरमतीच्या आश्रमातला गांधीजींचा चरखा चालवायला दिला. गुजराती ढोकळ्याची मेजवानी दिली आणि निरोप देताना त्यांना जवळही घेतले. या व्यवहारात त्या संबित पात्राला देशविरोध वा जवानांचा अपमान दिसला नाही. पुढे मोदींनी अमेरिकेच्या ट्रम्प यांना सौदी अरेबियाच्या नेत्याला व चीनच्या आहारी गेलेल्या नेपाळच्या पंतप्रधानालाही मिठी मारली. खरे तर हे मिठीचे राजकारण मोदींनीच देशात सुरू केले. मात्र त्यांच्या मिठीत या पात्राला देशविरोध दिसला नाही. याहून गंभीर बाब पाकिस्तानची. त्या देशाच्या राजकारणाची सुरुवात अडवाणींनीच केली. बॅरि. जिनांच्या मजारीवर जाऊन त्यांनी त्यांना ‘सेक्युलॅरिझमचे’ सर्टिफिकेट दिले. पुढे मोदींनी पाकिस्तानला दिलेल्या भेटीत त्यांनी नवाज शरिफांच्याही गळाभेटी घेतल्या. एकदा तर ताश्कंदवरून भारतात परतताना मोदींनी त्यांच्या विमानाला वाकडी वाट करायला लावूृन ते लाहोरमध्ये उतरविले व तेथे सुरू असलेल्या शरीफ यांच्या घरच्या लग्न सोहळ्यात सामील होऊन तिथल्या मेजवानीतही ते सहभागी झाले. त्यावेळी भाजपच्या संबित पात्राने त्यांना मुत्सद्देगिरीचे प्रशस्तीपत्र दिले. तेव्हा त्याला देशहित, लष्कराचा सन्मान व पाकिस्तानशी असलेले शत्रुत्व आढळले नाही. मोदी भेटले वा त्यांनी मिठ्या मारल्या तर ते मुत्सद्दीपण आणि काँग्रेसच्या वा अन्य पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली गळाभेट मात्र देशविरोधी असा दुहेरी न्याय करणारा संबित पात्रा आणि त्याचे बोलविते धनी यांच्याच मानसिकतेची व बुद्धीची कधीतरी तपासणी करून घेतली पाहिजे. फ्रान्सशी केलेला राफेल विमानांचा करार ‘गुप्तता राखण्याच्या’ अटीवर झाला असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले तर ते खरे आणि ‘अशा कोणत्याही अटी नाहीत’ हे फ्रान्सच्या अध्यक्षांनी राहुल गांधींना सांगितले ते खोटे अशी दुटप्पी भूमिका त्याला घेता येते त्या पक्षाच्या पुढाºयांना आणि प्रवक्त्यांना सिद्धूसारख्या मंत्र्याला नावे ठेवणे अर्थातच अवघड नाही. देशापुढचे महत्त्वाचे प्रश्न सोडून राष्ट्रीय पक्षांचे प्रवक्ते जेव्हा मिठ्यांवर किंवा आलिंगनांवर उतरतात तेव्हा खरे तर त्यांचेही बुद्धिबळ परीक्षेला बसविण्याच्याच योग्यतेचे असते हे आपण समजून घ्यायचे असते.