संमेलनाचे सोंग

By admin | Published: April 13, 2016 03:39 AM2016-04-13T03:39:54+5:302016-04-13T03:39:54+5:30

साहित्य संमेलने घेण्याचा उद्देशच राहिलेला नाही, मग ते कोणतेही असो. हल्ली तर महिला, पुरोगामी, परंपरावादी अशी एक ना अनेक साहित्य संमेलने भरत असल्याने रंगत उरली नाही. कंपू मात्र तयार झाला.

Convention Song | संमेलनाचे सोंग

संमेलनाचे सोंग

Next

- सुधीर महाजन

साहित्य संमेलने घेण्याचा उद्देशच राहिलेला नाही, मग ते कोणतेही असो. हल्ली तर महिला, पुरोगामी, परंपरावादी अशी एक ना अनेक साहित्य संमेलने भरत असल्याने रंगत उरली नाही. कंपू मात्र तयार झाला.

मराठवाड्यात चैतीचे वातावरण आहे. दरवर्षी चैत्रात होणाऱ्या गावागावातील जत्रांना इकडे ‘चैती’ म्हणतात. बारागाड्या, सोंगं, तकतराव असा परंपरागत बाज अजून टिकून आहे. राम-रावण, भवानी, हनुमान, शूर्पणखा अशी सोंगं अजूनही निघतात. पालख्यांचा फेरा होतो, दाळ्या-रेवड्यांची उधळण होते. पैपाहुणे, लेकीबाळींनी घर गजबजते. शेतीच्या रगाड्यातून मिळालेली सुटका आणि श्रमपरिहार, थोडी मौजमजा हा या गावागावात होणाऱ्या यात्रांचा उद्देश. सोंग म्हणजे कलेचा आविष्कार समजला जातो. या सोंगांची चर्चा पुढे महिना-दोन महिने शिळोप्याच्या गप्पांमध्ये रंगते. काळ बदलला आणि या जत्रांचा बाजही बदलला; पण मूळ चौकट अजून कायम आहे.
या चैतीच्या गर्दीत जालन्यात झालेले मराठवाडा साहित्य संमेलन हरवले असेच म्हणावे लागले. दोन दिवसांचे हे संमेलन गाजले ते वर्तमानपत्रांमध्येच. बाकी जालनेकर किंवा मराठवाड्यातील भद्र लोकांना त्याचे काही घेणे-देणे नव्हते, असेच म्हणावे लागेल. ना गर्दी, ना साहित्यिक, तसेच रसिकांचीही वानवा अशा परिस्थितीत प्रश्न पडतो हे संमेलन का घेतले याचा. मराठवाडा साहित्य परिषदेच्या एका मान्यवर सूत्रधारानी गप्पा मारताना अगदी सहजपणे सांगितले की, टायमिंग चुकले. डिसेंबर-जानेवारी हा खरा संमेलनाचा मोसम. आता एप्रिलचे ऊन आणि त्यात दुष्काळ, त्यामुळे साहित्यिक आणि रसिक दोघेही फिरकले नाहीत, हे खरे. मग संमेलन घेण्याचा अट्टहास का? तर उत्तर असे की, खंड पडायला नको. म्हणजे साहित्य संमेलनाच्या मूळ उद्देशालाच येथे हरताळ फासला गेला. चटावरचे श्राद्ध उरकावे तसे संमेलन उरकले. निमंत्रितांना पत्रिका पोहोचल्या नाहीत अशाही तक्रारी आहेत.
जालन्याचे खासदार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव पत्रिकेवर; पण त्यांची गैरहजेरी. त्यांना छेडले असता पत्रिकेत नाव आहे; पण ते टाकण्यापूर्वी संयोजकांनी संपर्क साधला नव्हता असे ते म्हणतात, तर संयोजकांचे म्हणणे असे की, पत्रकारांच्या उपस्थितीत आम्ही त्यांना निमंत्रण पत्रिका दिली, शिवाय शिक्षणमंत्री विनोद तावडेंना आणणार होतो, तर त्यासाठी दानवेंनी मुंबईला बोलावले होते; पण मुंबईला जाऊनही दानवेंची भेट झाली नाही. अशा एक ना अनेक कहाण्या आणि रुसव्याफुगव्यांच्या कथांना, तर मारुतीची शेपटी कमी पडेल.
कहर म्हणजे या वातानुकूलित जमान्यात संमेलनाध्यक्ष दत्ता भगत हे नांदेडहून बसमध्ये प्रवास करीत जालन्यात पोहोचले आणि अध्यक्षीय भाषणात त्यांनी हे सांगितलेही. संमेलनातील चर्चासत्रांचे विषयसुद्धा पीएच.डी.च्या विषयासारखे. त्यामुळे परिसंवादात रंगत आलीच नाही. सारा उरकून टाकण्याचा प्रकार होता. याच काळात जालना शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला चालू आहे आणि त्यासाठी गर्दी एवढी की सभागृह ओसंडून वाहते. एकीकडे रसिकांची वानवा, तर दुसरीकडे प्रचंड प्रतिसाद असे परस्परविरोधी चित्र जालनेकरांनी पाहिले.
हे सर्व पाहाता संयोजकांनीही काही गोष्टी सांगितल्या. संजीवनी तडेगावकर आणि जयराम खेडेकर हे दोघे म्हणजे जालना शहरात सातत्याने साहित्यिक उपक्रम घेणारी मंडळी. त्यांच्या म्हणण्यानुसार ऊन, दुष्काळ आणि संमेलन स्थळ ही तीन प्रमुख कारणे, ज्यामुळे रसिकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. गोळाबेरीज काहीही असो. साहित्य संमेलनाला आता रमण्यांचे स्वरूप आलेले आहे. शिवाय सत्तेच्या राजकारणापेक्षाही साहित्यिकांमधील गटातटाचे राजकारण तीव्र आहे. अशा परिस्थितीत चुकलेले टायमिंग आणि उरकून टाकण्याची मानसिकता हेच रसिकांनी पाठ फिरविण्याचे कारण दिसते. गावागावातील चैतीची सोंगं तरी रंगत आणतात, लोकांचे किमान मनोरंजन करतात. आजच्या डिजिटल जमान्यातही ते संदर्भ ठेवून आहेत. हे संमेलन धड सोंगही झाले नाही आणि चैतीही नाही.

Web Title: Convention Song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.