‘कूल डिसीजन’
By admin | Published: January 6, 2017 01:46 AM2017-01-06T01:46:26+5:302017-01-06T01:46:26+5:30
महेंद्रसिंग धोनी... भारतीय क्रिकेटला लाभलेला जणू परीस, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सौरभ गांगुलीने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला जिंकण्याचा विश्वास दिला
महेंद्रसिंग धोनी... भारतीय क्रिकेटला लाभलेला जणू परीस, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सौरभ गांगुलीने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला जिंकण्याचा विश्वास दिला, तर धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला जिंकण्याची सवय लावून दिली. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या धोनीचा मैदानात शांतपणे अनपेक्षित निर्णय घेऊन प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करण्यात हातखंडा. अशाच पध्दतीने त्याने नुकताच अनपेक्षित निर्णय घेताना संघाचे नेतृत्व सोडले. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी ३० डिसेंबरलाच आॅस्टे्रलियाविरुध्द सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून त्याने थेट निवृत्ती जाहीर करीत क्रिकेट विश्वात खळबळ उडवली होती. धोनी कधी काय करेल याचा अंदाज त्याच्या निकटवर्तीयांना देखील नसतो आणि म्हणूनच तो महेंद्रसिंग धोनी आहे. सर्वोच्च न्यायालयाने लोढा शिफारशी मान्य करण्यावरुन दिलेल्या आदेशानंतर भारतीय क्रिकेटमध्ये प्रशासकांच्या राजीनाम्याची मालिकाच सुरु झाली, जे अपेक्षित होते. मात्र, धोनीच्या तडकाफाडकी राजीनाम्यानंतर भारतीय क्रिकेटला धक्काच बसला. त्यात, आपण राजीनामा का दिला याचे कारणही अद्याप त्याने सांगितले नाही. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले. सहाजिकच, कसोटी कर्णधार विराट कोहलीकडे मर्यादित षटकांचे कर्णधारपदही सोपविण्यात येणार अशी चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये सुरु झाली. धोनीने हा निर्णय तडकाफडकी घेतला असला तरी, रागाच्या भरात किंवा जास्त विचार न करता घेतला असे नक्कीच नाही. धोनीची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्याची निर्णय क्षमता आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी. एकदा त्याने कोणतीही गोष्ट करायचे ठरवले तर, तो ती करतोच. शिवाय प्रत्येक वेळी त्याच्या निर्णयामागे संघहित दिसून येते. यामुळेच तर, कोणत्याही आकड्यांच्या किंवा विक्रम करण्याच्या मोहात न पडता धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतली होती आणि त्यानंतर आता मर्यादित षटकांचे नेतृत्वही सोडले. एकूणच, इतिहासावर नजर टाकल्यास कळून येईल की, कित्येक मातब्बर खेळाडूंना निवृत्त होण्यास भाग पाडले गेले आहे किंवा नेतृत्वाच्या बाबतीत त्यांच्याकडून कर्णधारपद हिसकावून घेतले गेले आहे. मात्र, धोनीने यशाच्या शिखरावर असताना कसोटीतून स्वत:हून निवृत्ती घेतल्यानंतर यशस्वी नेतृत्वपद सांभाळतानाच स्वत:हून कर्णधार म्हणून पायउतार झाला आहे. त्याने नक्कीच युवा खेळाडूंपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. ‘कॅप्टन कूल’ या बिरुदाप्रमाणेच त्याने क्रिकेटविश्वाला एका क्षणात ‘थंड’ केले. येथे विजय मर्चन्ट यांच्या एका विधानाची आठवण होणे स्वाभाविक आहे. ‘केव्हां निवृत्ती घेणार’ या प्रश्नापेक्षा ‘अरे आत्ताच निवृत्ती’ असा प्रश्न क्रिकेट खेळाडूसाठी नेहमीच उत्तम!