शीतलतेची झुळुुक
By Admin | Published: February 25, 2016 04:29 AM2016-02-25T04:29:45+5:302016-02-25T04:29:45+5:30
लागोपाठ दोन वर्षे देशाला आणि विशेषत: महाराष्ट्राला छळणाऱ्या दुष्काळापासून आता सुटका होण्याचा वेधशाळेने व्यक्त केलेला अंदाज म्हणजे ग्रीष्मातील थंडगार शीतल झुळुकच म्हणायची.
लागोपाठ दोन वर्षे देशाला आणि विशेषत: महाराष्ट्राला छळणाऱ्या दुष्काळापासून आता सुटका होण्याचा वेधशाळेने व्यक्त केलेला अंदाज म्हणजे ग्रीष्मातील थंडगार शीतल झुळुकच म्हणायची. मागील वर्षी पडलेल्या दुष्काळातून राज्य कसेबसे निभावून गेले पण लगेच दुसऱ्याही वर्षी दुष्काळ पडल्याने अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, ती पिण्याच्या पाण्याची आणि पशुधनाला वाचविण्याची. अजून फेब्रुवारी महिना संपला नाही तोच राज्यातल्या बव्हंशी धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. पावसाळ्याचा दर वर्षीचा अनुभव लक्षात घेता धरणांमध्ये जे पाणी शिल्लक आहे ते जुलैअखेर कसे पुरवायचे हा मोठा प्रश्न राज्य सरकारपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत साऱ्यांना छळतो आहे. जनावरांच्या चारा छावण्या हा तर मोठा विवाद्य विषय बनून गेला आहे. अशा छावण्या सुरु केल्या वा सुरु ठेवल्या तरी चारा कोठून आणायचा हा प्रश्न उद्या गंभीर होणारच आहे. देश पातळीचा विचार करता सतत दोन वर्षे देशाला गहू, मका आणि डाळी यांची स्वत:ची गरज भागविण्यासाठी विदेशांकडे आशेने बघत राहाणे भाग पडले होते. खासगी उत्पादक-व्यापाऱ्यांनी परस्पर गव्हाची आयात केली होती तर सरकारवर तब्बल सोळा वर्षानंतर मका आयात करण्याची पाळी आली होती. पण आगामी वर्षात हे नष्टचर्य संपणार असल्याचा शुभ अंदाज पुण्याच्या वेधशाळेने वर्तविला आहे. गेल्या वर्षीच्या भीषण दुष्काळाचा अंदाज याच वेधशाळेने वर्तविला होता. तिच्या मते गेल्या वर्षी एल-निनो (समुद्राच्या पृष्ठभागावरील तपमानात कमालीची वाढ) घटकाचा प्रभाव खूप जास्ती होता पण आगामी मान्सूनच्या वेळी तो निष्क्रीय होण्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. यंदापासून आपला अंदाज वर्तविण्याच्या पद्धतीमध्येही वेधशाळेने काही सुधार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापासूनच टप्प्याटप्प्याने आपला अंदाज ती व्यक्त करणार आहे. एरवी मान्सूनविषयक अंदाज सामान्यत: एप्रिल महिन्यात व्यक्त केला जातो. योगायोगाने पंचांगकर्त्यांनीदेखील आगामी पावसाळ्याचा अंदाज शुभकारकच व्यक्तकेला आहे.