कोरोना : जनतेचा आरोग्यलढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 10:23 PM2020-03-21T22:23:59+5:302020-03-21T22:24:57+5:30
कोरोनाच्या धास्तीने सध्या सर्वत्र लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण करण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आवाहन करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद दिला नाही तर कोरोना आजाराच्या साथीच्या दुसऱ्या आणि तिसºया टप्प्यात आपण सापडण्याची शक्यता आहे. त्यासाठी जनतेने हा अस्तित्वाचा आणि आरोग्याचा स्वातंत्र्यलढा म्हणून हाती घ्यायला हवा आहे.
वसंत भोसले
भारतीय उपखंड पारतंत्र्यात असताना इंग्रज राजवटीविरुद्ध स्वातंत्र्यलढा चालू होता. प्रत्येक भारतीयाने इंग्रज राजवट नाकारून ‘आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत,’ असे जाहीर करण्याचे आवाहन राष्टÑीय कॉँग्रेसने केले होते; तसा ठराव राष्टÑीय कॉँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात करण्यात आला होता. त्यानुसार २६ जानेवारी १९२९ रोजी हा दिवस ठरविण्यात आला होता. तशी घोषणा करून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला बळकटी मिळाली होती. तीच २६ जानेवारीची स्मृती म्हणून राज्यघटना स्वीकारल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती.
९ आॅगस्ट १९४२ रोजी ‘चले जाव’ आंदोलनाचा नारा महात्मा गांधी यांनी मुंबईतील गोवालिया टॅँक मैदानावर दिला होता. त्याला प्रतिसाद म्हणून संपूर्ण देश स्वातंत्र्यलढ्यात एकवटला होता. हे स्वातंत्र्याचे आंदोलन होते तसेच प्रत्येक भारतीयाने सहभागी होण्याचा एक ‘आरोग्य लढा’ आज, रविवारी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला ‘जनता कर्फ्यू’ची संकल्पना म्हटले आहे. जगभरात बंद पाळणे किंवा एकत्रित लढा देण्याची अनेक सामुदायिक पावले उचलली गेली; पण आरोग्यासाठी असा लढा प्रथमच होत आहे.
कोरोना या ताप, खोकला आणि न्यूमोनियाची साथ सुरुवात चीनमधील वुहान या शहरात डिसेंबरमध्ये झाली. या आजार किंवा साथीचा प्रसार इतक्या वेगाने झाला की, तीन महिन्यांत दीडशेहून अधिक देशांमध्ये दोन लाखांहून अधिक लोक आजारी पडले. सुमारे आठ हजार लोक मृत्युमुखी पडले. सर्व देशांचा अनुभव असा दिसतो की, या साथीचा अतिशय वेगाने प्रसार होतो आहे. ही एक असाधारण साथ आहे. त्यामुळे संपूर्ण जनतेनेच या आजाराविरुद्ध लोकलढा हाती घ्यायला हवा आहे. हा आजार केवळ डॉक्टर, रुग्णालये आणि कर्मचाऱ्यांवर सोडून चालणार नाही. त्यात प्रत्येक नागरिकाला सहभागी व्हावे लागणार आहे.
कारण या आजाराचा प्रसारच लोकांनी एकत्र येण्याने होणार आहे. त्यासाठी भारतासारख्या लोकसंख्येने प्रचंड असणाºया देशाने तर फारच गंभीरपणे ही आजाराची साथ मनावर घेतली पाहिजे. चीनने या आजाराच्या साथीविरुद्ध चांगला लढा दिला आहे. त्यांचा अनुभव सांगतो की, कोरडा खोकला, ताप आणि श्वास लागणे (दम लागणे) ही आजाराची लक्षणे आहेत. आजारी पाडणाऱ्यांपैकी ऐंशी टक्के रुग्णांना सौम्य आजार होतो. तापाची गोळी घेतली, कोरड्या खोकल्यावरचे औषध घेतले आणि किमान दोन आठवडे विश्रांती घेतली तर ऐंशी टक्के रुग्ण बरे होतात; असा दावा ‘जनस्वास्थ अभियान’चे डॉ. अनंत फडके (पुणे) यांनी केला आहे. मात्र, पंधरा टक्के रुग्ण गंभीर होतात. त्यांना कोरोना न्यूमोनिया होतो. यापैकी सुमारे तीन टक्के रुग्ण दगावतात. दमा, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आदी आजार असणाºया ज्येष्ठ नागरिकांना अधिक धोका आहे. चीनमध्ये नऊ वर्षांखालील आजारी पडलेल्या एकाचाही मृत्यू झालेला नाही. तरुण, निरोगी व्यक्तींना धोका कमी आहे.
चीनमध्ये पसरलेल्या या साथीचा प्रसार इतर देशांत आयात झालेल्या लोकांद्वारे झाला आहे. त्यांच्याकडून साथ सुरू होणे हा पहिला टप्पा आहे. भारतात परदेशातून आलेल्यांकडूनच या साथीचा प्रसार झाला. भारत या अर्थाने पहिल्या टप्प्यात आहे. आजवर केवळ १६७ जणांना लागण झाल्याचे आणि चौघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आयात झालेल्या लोकांपासून तो साथीसारखा आजार समाजात पसरला की, परिस्थिती गंभीर होते. आजवर संशयित रुग्णांची पार्श्वभूमी ही परदेश दौरा केल्याची आढळली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शृंगारतळी गावातील अनेकजण आखातात कामाला आहेत. ते परत आले. विमानतळावर चाचणी झाली; पण त्यांना खोकला नव्हता, ताप आला नव्हता, ते मुक्तपणे गावाकडे आले. खरे तर हा इंडोपिरीयड असतोे. त्यांच्या अंगात आजार शिरलेला असतो; पण लक्षणे दिसत नाहीत. तपासणी घेतली तरी निगेटिव्ह येते. गावी येताच खोकला आणि ताप सुरू झाला.
येथून पुढे दुसरा टप्पा सुरू होतो. अशा आयात रुग्णांकडून आजाराची साथ समाजात पसरली की, त्याला दुसरा टप्पा म्हटले जाते. तो प्रचंड वेगाने पसरतो. भारतात त्याची सुरुवात आता होऊ शकते. यासाठी परदेशातून आलेल्या आणि संशयित वाटणाºया रुग्णांनी स्वत:ला समाजापासून किमान दोन आठवडे दूर ठेवले पाहिजे. अशा व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये म्हणून जनतेनेही शक्य तितके घरी थांबविण्याचा प्रयत्न करायला हवा आहे. कारण आपली लोकसंख्या, त्यात असंघटित क्षेत्रांतील जनतेचे प्रमाण पाहिले तर भारत देश आजतरी कोरोना अणुबॉम्बवर उभा आहे, अशी अवस्था आहे. दुसºया टप्प्यातून पार पडताना कोरोना आजाराची साथ पसरली नाही तर सुटका झाली, असे मानायला हवे. त्यासाठी येत्या ३१ मार्चपर्यंतचा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. त्याची जागृती होण्यासाठी आज, रविवारचा कर्फ्यू खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चीनने अत्यंत कठोरपणे वुहानमधील नागरिकांना अक्षरश: घरात कोंडूनच ठेवले होते. अमेरिकेत ३ ते १४ मार्च या अकरा दिवसांत रुग्णाची संख्या ६४ वरून १६७८ झाली. इटलीत २३ फेब्रुवारी ते ५ मार्च या अकरा दिवसांत ७६ वरून ३०४८ झाली; तर १५ मार्चला ती २५ हजार झाली. इटली, इराण, चीन या देशांमध्ये फारच वेगाने या साथीचा प्रसार झाला.
चीन, इटली, अमेरिका, स्पेन आदी देशांच्या तुलनेत भारतात लोकसंख्येची घनता अधिक आहे. इटलीत आपल्यापेक्षा रुग्णालयांची क्षमता खूपच अधिक आहे; पण तिथेही आज रुग्णालये, आयसीयू कमी पडत आहेत. त्यामुळे भारतात इटलीप्रमाणे या साथीचा समाजस्तरावर प्रसार वेगाने झाला, तर फार गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. भारतात ३० जानेवारीला पहिल्या केसची नोंद झाली. १९ मार्चपर्यंत १६७ जण आजारी आणि चौघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आपण दुसºया व तिसºया टप्प्यामध्ये आहोत. ती वेगाने पसरली तर लाखो लोक आजारी पडतील, पैकी दहा ते पंधरा टक्के रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्याची वेळ आली, तर त्यांना पुरेल इतकी रुग्णालयांची क्षमताच नाही. एका जिल्ह्यात सरासरी वीस ते पंचवीस लाख लोकसंख्या आहे. त्यातील दहा टक्के म्हणजे अडीच लाख आजारी पडतील; त्यापैकी पंचवीस हजारजणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येईल; तेवढी सरकारी यंत्रणा नाही. अशा पार्श्वभूमीवर आपण एकत्र येणे, गर्दी करणे व आजाराची साथ ओढावून घेणे टाळायला हवे आहे.
भारतात कुठेही, कशासाठीही, केव्हाही प्रचंड गर्दी होत असते. मुंबईतील लोकलची गर्दी म्हणजे कोरोना व्हायरस गुदमरून मरेल अशी असते. सध्या यात्रा-जत्रांचा हंगाम आहे. कुस्त्या, तमाशे आणि पालख्यांची, मिरवणुकांची रेलचेल आहे. शाळा, विद्यालये ते महाविद्यालयापर्यंतच्या परीक्षा सुरू आहेत. लग्नाचा हंगामही सुरू होणार आहे. चैत्र पाडव्याला महाराष्टÑात तरी किमान एक हजारापेक्षा अधिक यात्रा भरत असणार व सरासरी दहा हजार ते एक लाख लोक हजर असतात. कोल्हापूरच्या जोतिबा यात्रेला किमान चार ते पाच लाख लोक चोवीस तासांत डोंगरावर येतात. रेल्वेला गर्दी, बसला तोबा गर्दी, बाजारपेठांत गर्दी, सिनेमागृहे, मॉल व समारंभात गर्दीच असते. ८ मार्चला महिला दिनाला पंचवीस हजार महिलांचा मेळावा झाला होता. केवळ दोन आठवड्यांपूर्वीची ही गर्दी आहे. सरकारने मोठ्या प्रमाणावर उपाय केलेत. प्रबोधन, प्रसार व प्रचार करण्याचीच सध्या तरी सरकारमध्ये क्षमता आहे. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात वीस-पंचवीस हजारांप्रमाणे महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांत लोक साथीने आजारी पडले तर सरकार कुठंवर पोहोचणार आहे? जनतेनेच हा मानवाच्या अस्तित्वाच्या लढ्याप्रमाणे या साथीच्या आजाराविरुद्ध कंबर कसायला हवी आहे.
सध्या सर्वत्र लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण करण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आवाहन करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद दिला नाही तर कोरोना आजाराच्या साथीच्या दुसºया आणि तिसºया टप्प्यात आपण सापडण्याची शक्यता आहे. त्यासाठी जनतेने हा अस्तित्वाचा स्वातंत्र्यलढा म्हणून हाती घ्यायला हवा आहे. त्यात असंघटित, हातावरचे पोट असणारे चरख्यात सापडावेत, तसे सापडणार आहेत. त्यांना दोन-तीन आठवडे विनाकाम दिवस काढता येतील. मात्र, त्यापेक्षा अधिक काळ तग धरता येणार नाही. या सर्वांना रेशन हवे, गॅस हवा, दूध हवे, भाजीपाला हवा, औषधे हवीत, पाणी हवे, आदी सेवांसाठी धडपड करावीच लागेल. विविध सेवा बंद झाल्या की, महागाई, टंचाई आदींचा कहर होऊ शकतो. त्याचा गैरफायदा घेणारे समाजप्रिय लोक हितवादी नागरिक कमी नाहीत. दहा रुपयांचा मास्क पन्नास-शंभर रुपयांस विकतच आहेत. कधी, कशाचा फायदा करून घेतील याचा भरवसा नाही. टंचाईत पण खिसे कापणारे अनेक जण आहेत. अशा समाजात आपण राहतो आहोत, याचीही जाणीव ठेवायला हवी.
याचा अर्थ अशा संकटसमयी लोक एकत्र आले नाहीत असे नाही. महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी मदत करण्यास हजारो हात पुढे सरसावले होते. मात्र, त्यात मूलभूत फरक आहे. त्या आपत्तीत काही लोक सापडले होते. न सापडलेले बहुसंख्य होते. त्यांना धोका नव्हता. येथे या आजाराच्या साथीतून कोणाची सुटका नाही. मंदिरात जत्रा, आरती किंवा मशिदीत जमून अल्लाला शरण जा. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखला जाणार नाही. नैसर्गिक आपत्तीमध्ये आणि या साथीत हा फरक आहे. कोणी, कोणाला मदत करायची. त्यामुळे भारतातील परिस्थिती अधिकच वेगळी आहे. अमेरिका, इटली, फ्रान्स, स्पेन आदी विकसित देशांना या आजाराच्या साथीला तोंड देताना नाकीनऊ आले आहे.
भारताने फारच सावध झाले पाहिजे. आपला समाज बहुसंख्य असंघटित आहे. मोठ्या प्रमाणात धर्मांध, अंधश्रद्धाळू, गरीब आणि आपमतलबी आहे. त्यात गैर काही मानण्याचे कारण नाही. यासाठीच महापुरातील मदतीशी तुलना केली. ती वेगळी आणि ही वेगळी परिस्थिती आहे. काही ठराविक लोक महापुरात अडकतात. कोल्हापूर जिल्ह्यात इतका प्रचंड महापूर येऊनही एकाचाही मृत्यू झाला नाही. एकजणही उपाशी मेला नाही. मात्र, कोरोनाची साथ कोणाला सोडणार नाही. श्रीमंत असा, गरीब रहा, कोणत्याही जाती-धर्माचे, व्यवसायाचे असा की, व्यापार, उद्योग, कामगार, मजुरी करा. तो पसरला की, आपल्या नाकांद्वारे अंगात शिरणारच! त्यातील कमकुवत लोकांना पहिल्यांदा घेऊन जाणार आहे. सध्याची सरकारची क्षमता आणि व्यवस्था पत्रावळीप्रमाणे उडून जाईल, इतका जनतेचा लोंढा वाढेल. यासाठीच जनतेने दोन-चार आठवडे विश्रांती घ्यावी, या जगाची गती थोडी थांबवावी. ती गती थांबविल्याने ज्यांना जगणे असहाय्य होणार आहे. त्यांना आपण श्रीमंतांनी मदत करावी; कारण ही साथ पसरली की, श्रीमंतांनाही सोडणार नाही. कामधंदे बंद ठेवू, थोडे नुकसान सोसू पण या साथीला रोखू, असाच निर्धार करायला हवा आहे. भारत हा एकमेव देश अशा प्रकारच्या साथीला तोंड देताना दमछाक होणार आहे. यावरून आपण महासत्तेच्या लक्ष्यापासून अद्याप किती दूर आहे हे ओळखायला हरकत नाही.