कोरोनामुळे मेक्सिकोत हजार महिलांचे खून!
By वसंत भोसले | Published: May 5, 2020 05:54 PM2020-05-05T17:54:52+5:302020-05-05T17:56:05+5:30
वसंत भोसले - युद्ध नाही म्हणून शांतता आहे, असे नव्हे. ह्यकोरोना-१९ह्णच्या प्रभावाने ज्या स्वत:च्या घरात सर्वाधिक सुरक्षितता असते, अशा ...
वसंत भोसले -
युद्ध नाही म्हणून शांतता आहे, असे नव्हे. ह्यकोरोना-१९ह्णच्या प्रभावाने ज्या स्वत:च्या घरात सर्वाधिक सुरक्षितता असते, अशा ठिकाणी लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक हिंसाचाराचे प्रकार घडत आहेत. जगभरातील देशांच्या सरकारने यावर लक्ष देणे गरजेचे आहे!ह्ण संयुक्त राष्टÑसंघाचे सरचिटणीस अॅटोनिओ गुट्रेरेस यांचे हे दोन दिवसांपूर्वीचे उद्गार आहेत.
जगभरातील बहुतांश देशांनी मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला. कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्याचा हा सर्वांत प्रभावी उपाय मानला गेला. माणसांनी सामुदायिकपणे एकत्र येऊ नये, जेणेकरून विषाणूचा संसर्ग होणार नाही, त्यासाठी घरी थांबणे, घरातूनच शक्य तेवढे कार्य करणे आणि कुटुंबीयांबरोबर वेळ व्यतीत करणे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येऊ लागली. भारतासह अनेक देशांमधील घरातील वातावरण या लॉकडाऊनमुळे पार बदलून गेले.
सर्वत्र किंवा सर्व घरांमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला, असे अजिबात नाही. तो कधीच असत नाही, पण काही घरात तो नेहमीच असतो. मारझोड, चोरी, दरोडे, खून, बलात्कार, आदी प्रकार रोज होत नाहीत किंवा सर्वांनाच त्याला सामोरे जावे लागते, असे नाही. आपल्या देशात दोन दशकांपूर्वी हुंडाबळीची संख्या मोठी होती. त्यात आता थोडी सुधारणा झाली आहे. घरगुती हिंसा किंवा बलात्काराचे प्रमाण काही कमी झालेले नाही. दोन बातम्यांनी या सर्व घटनांकडे लक्ष वेधले गेले. मेक्सिकोमध्ये गेल्या एक-दीड महिन्यात एक हजार महिलांचे घरगुती हिंसाचारातून खून झाले आहेत.
कोरोनाने फक्त १९७२ जणांचे मृत्यू झाले आहेत. दुसरी बातमी होती की, संयुक्त राष्टÑसंघाचे सरचिटणीस अॅटोनिओ गुट्रेरेस यांनी घरा-घरांत होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात कृती करा, असे आवाहन सर्व देशांच्या सरकारांना केले आहे. संयुक्त राष्टÑसंघाच्या सरचिटणीसांनी काळजी व्यक्त करावी इतकी ही गंभीर समस्या बनली आहे. अनेक देशांनी कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केला आहे. परिणामी लोक घरात बसून आहेत. कोणी काय करते, कोणी आपली हौसमौज करून घेत आहे. वाचन, लिखाण, सिनेमा पाहणे, संगीताचा आस्वाद घेणे, घरकाम करणे आदी गोष्टी चालू आहेत. मात्र, घरगुती तणावाचे वातावरण असलेल्या घरामध्ये महिलांवर अत्याचार किंवा हिंसा करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
भारतात घटस्फोटाचे प्रमाण अल्प आहे. मात्र, पाश्चिमात्य देशात मुलांसह राहणाºया महिलेवर पूर्वाश्रमीच्या पतीने येऊन हल्ला करणे किंवा प्रियकराने वार करणे, दारू पिऊन धिंगाणा घालणे, घरातील मुला-मुलींना त्रास देणे, त्यातून पती-पत्नीमध्ये प्रचंड वादाचे प्रसंग उद्भवणे, आदी घडते आहे. अनेक ठिकाणचे पुरुष दारू किंवा अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. त्याच्या प्रभावाखालीदेखील हिंसा करण्याचे हे प्रमाण अधिक आहे.
भारतातही हे लोण आले आहे. लॉकडाऊनच्या काळात महिलांच्या तक्रारी वाढल्या आहेत, असे राष्टÑीय महिला आयोगाने म्हटले आहे. २७ फेबु्रवारी ते २२ मार्च या काळात महिला आयोगाकडे ३९६ तक्रारी आल्या होत्या. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर म्हणजे २३ मार्च ते १६ एप्रिल या कालावधीत ५८७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. महिला आयोगाकडे प्रामुख्याने दोन माध्यमातून महिला तक्रार करीत होत्या. हेल्पलाईनचा वापर करणे किंवा पोस्टाच्या आधारे लेखी तक्रार पाठविणे हेच मार्ग होते. लॉकडाऊनमुळे ही दोन्ही साधने बंद पडली आहेत. आता इंटरनेटच्या माध्यमातून तक्रारी कराव्या लागतात. भारतातील केवळ एकतृतियांश महिलांना ते उपलब्ध आहे किंवा त्याचा वापर करता येतो, असे महिला आयोगाचे मत आहे. केवळ महिलांतून येणाºया तक्रारीत एकतृतियांश वाढ झाल्याचे दिसते आहे. भारतापेक्षा अधिक कठीण प्रसंग युरोपातील देशात येऊ लागले आहेत.
मेक्सिकोचे उदाहरण ढळढळीत समोर आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनच्या काळात महिलांचे मुडदे पाडूनही हे वाढलेले प्रमाण दहा टक्के आहे, असे मेक्सिको सरकारचे म्हणणे आहे. याचा अर्थ त्या देशात घरगुती हिंसेचे प्रमाण अधिकच आहे, असे दिसते. या हिंसाचाराच्या विरोधात लॉकडाऊन असतानाही महिलांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली आहेत. अशा घटनांचा तपास लवकर करा, हेल्पलाईनची कक्षा वाढवा, रात्री-अपरात्री पोलिसांनी मदत करण्याचे प्रमाण वाढवावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. फ्रान्स सरकारने घरातील हिंसाचाराने बेजार झालेल्या महिलेला बाहेर पडायचे असेल तर, तात्पुरत्या स्वरूपात सरकारी खर्चाने हॉटेलवर राहण्याची व्यवस्था करण्याची योजना जाहीर केली आहे. हॉटेलच्या खोलीचे भाडे सरकार भरते शिवाय खाण्या-पिण्याची गरज असेल, तर भत्ता दिला जातो. आॅस्ट्रेलियाची लोकसंख्या कमी असली तरी, तेथे हिंसाचार आहे. यातून कोणताही देश सुटलेला नाही. आशिया खंडात भारत, थायलंड, आदी देशांत हे प्रमाण अधिक जाणवते. रशियासारख्या पूर्वाश्रमीच्या साम्यवादी देशातही हे प्रमाण खूप आहे.
लॉकडाऊनच्या काळात महिलांच्या इच्छेविरुद्ध गरोदर राहण्याचे प्रमाणही वाढले गेले आहे. एका अंदाजानुसार जगभरात नव्वद लाख महिलांवर इच्छा नसताना गरोदरपणा लादला गेला आहे. अलीकडच्या काळात गरोदर निर्बंधासाठी निरोधचा सर्वाधिक वापर केला जातो, पण लॉकडाऊनमुळे उपलब्धता कमी होणे आणि वाहतूक नसल्याने त्याचा पुरवठा दूरवर न होण्याने हा मार्ग निकामी ठरला आहे. परिणामी गरोदरपणाचा धोका महिलांना स्वीकारावा लागला आहे. ज्याला जगभर अनवॉन्टेड प्रेग्नेन्सी म्हणतात. त्यापैकी हा प्रकार आहे. ज्यांना शक्य आहे किंवा कायद्याने मोकळीक आहे, त्यांना गर्भपात करून घ्यावा लागणार आहे. अनेक देशांमध्ये गर्भपात निषिद्ध मानला गेला आहे. त्यात विकसित देशांचाही समावेश आहे. लॉकडाऊन लवकर उठला, तर ते शक्य होणार आहे. महिलांवरील अत्याचाराच्या या प्रमाणात वाढ होण्याचे विविध प्रकार आहेत.
भारतात किंवा तत्सम् कौटुंबिक तसेच सामाजिक वातावरण असणाºया देशांमध्ये घरातील सर्व सदस्य दिवस-रात्र घरीच असल्याने महिलांवर कामाचा अतिरिक्त बोजाही पडला आहे. कोरोनाच्या भीतीने मोलकरीण किंवा मदतनीस यांना बोलाविता येत नाही. जी अनेक कामे मोलकरणी करून जात होत्या, ते बंद झाले आहे. अशा मोलकरणींच्या घरी असंख्य प्रश्नांचा डोंगर उभा राहिला आहे. नोकरी गेली. बहुतांश भारतीयांची मानसिकता ही कामावर आलात तर पगार!, महिन्यातील चार दिवस मोलकरीण आली नाही तर न चुकता कॅलेंडर रंगवून ठेवतात. तेवढ्या दिवसाचा सरासरी पगार कापून उर्वरित दिला जातो. हे नव्याने सांगायला नको. अनेक मोलकरणींचे पती किंवा घरातील पुरुष हंगामी मजुरीची कामे करतात. त्यांचीही कामे गेली आहेत. उत्पन्नाचे मार्ग खुंटले आहेत.
प्रचंड उकाड्याच्या उन्हाळ्यात छोट्या-छोट्या घरात लॉकडाऊनमुळे घरी बसून ही मंडळी वैतागली आहेत. त्यातून ताणतणाव आला, कौटुंबिक हिंसाचारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. व्यसन न करता येत असल्यानेदेखील पुरुष मंडळी हिंसेचा आसरा घेतात. त्यावरून पती-पत्नींमध्ये आणि मुलांबरोबर वादावादीचे प्रसंग उद्भवतात.
मध्यमवर्गीय कुटुंबात किंवा उच्चवर्गीयांमध्ये विविध छंद जोपासण्याचे प्रकार वाढले आहेत. फेसबुकवरील वॉलवरून चाळत राहिलात तर, तुम्हाला असंख्य प्रकार आढळून येतील. कोण पोह्याचे विविध प्रकार बनवित आहे, कोणी कैऱ्यांचे प्रकार मांडून ठेवले आहेत, कोणाला रांगोळी काढायची आहे, चित्रे काढायची आहेत, आंबोळी बनवायची आहे, रसगुल्ले तयार करायचे आहेत. या सर्वांसाठी महिलांना अधिक कष्टाला सामोरे जायला लागते. अशा फर्माईशवरूनही भांडणे होतात. हा लॉकडाऊन महिलांच्या अंगावर आघात करून जातो आहे. कोणत्याही प्रकारचे काही ना काही परिणाम जाणवतात म्हणतात, तसे आहे. नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्धासारखे प्रकार असोत, त्यात महिलांवर अधिक ताण, अत्याचार होतात. त्याचबरोबर लहान मुलांना प्रचंड ताण-तणावाला सामोरे जावे लागते. आरोग्याचे प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळेच या लॉकडाऊनच्या काळात मेक्सिकोमधील एक हजारहून अधिक महिलांचे खून होण्याचे प्रमाण हे गंभीर आहे. त्याहून कितीतरी अधिक तर गंभीर जखमी किंवा गुप्त मारहाण होण्याचे प्रमाण असणार आहे. समाजातील पुरुषांचे सामाजिकीकरण आणि स्त्री-पुरुष संबंधाचे संतुलन यात खूप दोष आहेत. ते सुधारण्यासाठी अनेक गोष्टी नव्याने शिकाव्या लागणार आहेत. त्यासाठी हा लॉकडाऊन आणि त्याचे जगभरातील महिलांवर झालेल्या परिणामांचा त्या-त्या देशांनी अहवाल प्रसिद्ध करायला हवा आहे. आरोग्य, हिंसा, मानसिक ताण, कौटुंबिक नातेसंबंध, आर्थिक ओढाताण, लैंगिक समस्या, आदी घटकांच्या अनुषंगाने अभ्यास व्हायला हवा आहे. संयुक्त राष्टÑसंघाने यासाठी पुढाकार घ्यायला हवा. तसेच त्या-त्या देशांच्या सरकारनेही पावले उचलली पाहिजेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या माहितीचा शोध घेताना, अनेक बातम्यांमध्ये सरकारच्या संबंधित खात्याची नावे वाचली, मंत्रालयाची नावे वाचली. आपण महिला आणि बालकल्याण खाते म्हणतो, आरोग्य खाते म्हणतो, समाजकल्याण किंवा सामाजिक न्याय खाते वगैरे म्हणतो. विविध देशांमध्ये महिला हिंसाचार खाते, लैंगिक हिंसा खात्याचे मंत्री, कौटुंबिक हिंसाचार खाते, आदी थेट नावे घेऊन मंत्रालये बनविली गेली आहेत. याचाच अर्थ महिला-पुरुष या नात्यातून होणारी हिंसा, अत्याचार, लैंगिक प्रश्न, आदींवर किती लक्ष द्यावे लागते आहे पाहा. तरीसुद्धा अनेक देशांत न्यायव्यवस्था स्वतंत्र केली आहे. चौकशीसाठी स्वतंत्र पोलीस विभाग तयार केले आहेत. बीजिंगच्या जागतिक महिला परिषदेच्या जाहीरनाम्याचा वारंवार उल्लेख केला जातो. त्याला आता पंचवीस वर्षे होऊन गेली. या कालावधीत तंत्रज्ञान बदलले, जीवनमूल्ये बदलली, मानसिकता बदलली,
प्रसारमाध्यमांमध्ये आमूलाग्र बदल झाले, व्हॉटस्अॅप युनिव्हर्सिटीने अनेकांना अर्धशिक्षित किंवा अर्धजागरुकता करून सोडले आहे. जगाच्या कानाकोपºयातील महिला-पुरुष बोलू लागलेत. संबंध वाढवू लागलेत. त्यांना संपर्काचे माध्यम अवकाश प्राप्त झाले आहे. त्यात ते हरवून जात आहेत. लॉकडाऊननंतरचे नवे जग कसे असेल, ते कोणते परिणाम करून जाईल, याचा महिलांनीही गांभीर्याने विचार करावा