स्वयंशिस्त हाच उपचार; गेल्या ५ महिन्याच्या जीवनशैलीत बदलाची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 12:25 AM2020-08-24T00:25:09+5:302020-08-24T07:11:52+5:30

चार महिने सणासुदीचे असले, तरी हे सण साजरे करताना त्याचे सार्वजनिकीकरण टाळण्याची व घरातच सण साजरे करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली. सरकारने निर्बंध उठविले, तरी प्रत्येकाने स्वत:वर निर्बंध घातले पाहिजेत. गेल्या पाच महिन्यांत स्वीकार केलेल्या जीवनशैलीत बदलाची गरज नाही.

Corona: Self-discipline is the treatment; no need to change the lifestyle in the last 5 months | स्वयंशिस्त हाच उपचार; गेल्या ५ महिन्याच्या जीवनशैलीत बदलाची गरज नाही

स्वयंशिस्त हाच उपचार; गेल्या ५ महिन्याच्या जीवनशैलीत बदलाची गरज नाही

Next

सरकारने आजपासून आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवास करण्यास मुभा दिली आहे. म्हणजे आता प्रवासासाठी परवानगीपत्राची आवश्यकता असणार नाही. याचा अर्थ परिस्थिती नियंत्रणात आली आहे, असा घेणे सर्वस्वी चूक आहे. उलट सरकारने अशा बिकट परिस्थितीत ही सवलत दिली. तिचा सन्मान राखण्याची जबाबदारीच सर्वांवर येऊन पडली आहे. आता कोणी अडवणार नाही. महाराष्ट्र शासनाने मात्र अद्याप ई-पासची सक्ती कायम ठेवली आहे. आता यापुढे ऊठसूट भटकण्याच्या वृत्तीला आपणच आवर घातला पाहिजे. म्हणजे सरकारने निर्बंध उठविले असले, तरी प्रत्येकाने स्वत:वर निर्बंध घातले पाहिजेत. नियमांच्या जंजाळामुळे गेल्या पाच महिन्यांत स्वीकार केलेल्या जीवनशैलीत बदल करण्याची अजिबात गरज नाही. कोरोना आटोक्यात नाही आणि सर्वसामान्यांपर्यंत लस उपलब्ध होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल, याची निश्चित तारीख कोणी देऊ शकत नाही.

पहिली लस भारतच तयार करणार व ऑगस्टच्या मुहूर्तावर ती येणार, अशी घोषणाघाई आपण केली आहेच. त्यामुळे कोरोना आटोक्यात आला असे समजू नये. महाराष्ट्राबाबत बोलायचे तर या महिन्याच्या पहिल्या १७ दिवसांत १ लाख ८२ हजार ८२४ रुग्णसंख्या वाढली आणि आजही मृत्युदर ३.३५ टक्के आहे. आरोग्यमंत्र्यांना तो एक टक्क्याच्या खाली आणायचा आहे. दुसरीकडे रुग्णवाढीचा वेग वाढत आहे. जेवढ्या जास्त चाचण्या, तेवढी रुग्णवाढ हे गणित कायम आहे, त्यात बदल नाही. मुंबईचा मृत्युदर ५.५४ टक्के, नंदुरबार ४.४८, सोलापूर ४.३५, अकोला ४.२४, लातूर ३.८३, जळगाव ३.७८ आणि रत्नागिरी ३.५९, अशी टक्केवारी या पहिल्या रांगेतील जिल्ह्याची असून, ती चिंताजनक आहे. रुग्ण शोधण्यासाठी प्रतिपिंड चाचण्याही वाढविण्यात आल्या. सध्या राज्यात दररोज पाच हजारांवर या चाचण्या होत आहेत. रुग्णसंख्या कितीही वाढली किंवा कमी झाली, तरी वस्तुस्थितीचे मोजमाप हे मृत्युदरावरून होत असते. ज्यावेळी हा दर कमी करण्यात आपण यशस्वी होऊ, त्यावेळी कोरोनावर मात करण्यासाठी पहिले पाऊल पडलेले असेल. थोडाफार दिलासा देणारी एक गोष्ट आढळते ती ‘सिरो’ चाचण्यांतून प्रतिपिंड तयार होण्याचे प्रमाण लक्षात येते. पुण्यात ५१ टक्के लोकांमध्ये प्रतिपिंड तयार झाल्याचा निष्कर्ष समोर आला.

Maharashtra to extend lockdown till May 31, areas outside COVID-19 ...
Maharashtra to extend lockdown till May 31, areas outside COVID-19 ...

वेगळ्या शब्दांत सांगायचे, तर या लोकांना संसर्ग झाला होता; पण त्यांनी त्यावर प्रतिकारशक्तीच्या जोरावर मात केली; परंतु प्रतिपिंड तयार होण्याची ही पहिली पायरी आहे, याचा अर्थ आता संसर्ग होऊ शकत नाही, असा सोयीचा घेता येणार नाही. हे वर्तमानाचे वास्तव आहे. त्याचे भान सर्वांनी राखले, तर खऱ्या अर्थाने अरिष्ट काय ते कोसळणार नाही. म्हणूनच देशभर प्रवासाची परवानगी असल्याने पाच महिन्यांच्या विजनवासावर पाणी फेरले जाऊ नये. उलट स्वयंशिस्त पाळण्याची जबाबदारी प्रत्येकावर येऊन पडली आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मर्यादित वापर, गर्दी टाळणे व प्रतिकारशक्ती वाढवून स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे. राज्यातील २८ हजार ३५९ गावांनी आजवर हे नियम कसोशीने पाळल्याचे दिसते. कारण ४३,०२५ गावांपैकी ही २८,३५९ गावे आजही कोरोनामुक्त आहेत. या सर्व गावांनी स्वयंशिस्त पाळली. त्याचे हे फलित आहे. याचे अनुकरण शहरातील कॉलन्या, वस्त्यांनी केले पाहिजे. चित्रपटगृहे, मनोरंजनाचे कार्यक्रम, उपाहारगृहे, हॉटेल यांवरील निर्बंध कायम आहेत. आजच्या निर्णयानंतर यापुढे सरकारने रुग्णालयेही लहान मुले आणि इतर आजारांची पार्श्वभूमी असणाऱ्या कोविड रुग्णांसाठी प्राधान्याने उपलब्ध केली पाहिजेत. लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना घरीच राहून उपचार घेण्यास प्रवृत्त केले पाहिजे. असे बाधित घरीच पथ्यपाणी पाळून कोरोनामुक्त होऊ शकतात, हे औरंगाबाद, नागपूर या शहरांतील अनुभवावरून स्पष्ट झाले आहे. गणरायाच्या आगमनापासून चार महिने सणासुदीचे असले, तरी ते साजरे करताना त्याचे सार्वजनिकीकरण कसोशीने टाळण्याची आणि घरातच सण साजरे करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडली. आपले व आसपासच्या लोकांचे यातच हित आहे. यापासून एवढा बोध घेऊन जीवनशैलीची नवी स्वयंशिस्त परंपरा आपण निर्माण केली पाहिजे.

Web Title: Corona: Self-discipline is the treatment; no need to change the lifestyle in the last 5 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.