आजचा अग्रलेख: सांताक्लॉज, सबुरी दे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 01:14 PM2021-12-25T13:14:45+5:302021-12-25T13:15:09+5:30

मागीलवर्षी सांताक्लॉज कुणाच्या घरी गेला नाही आणि समजा त्याने दार वाजवले असते तरी लॉकडाऊनमुळे किती जणांनी दार उघडले असते देव जाणे.

corona situation in the world and patience from santa claus | आजचा अग्रलेख: सांताक्लॉज, सबुरी दे!

आजचा अग्रलेख: सांताक्लॉज, सबुरी दे!

Next

मागीलवर्षी सांताक्लॉज कुणाच्या घरी गेला नाही आणि समजा त्याने दार वाजवले असते तरी लॉकडाऊनमुळे किती जणांनी दार उघडले असते देव जाणे. ज्यांनी गिफ्टच्या मिषाने दार उघडले असते त्यांनी सर्वप्रथम सांताक्लॉजच्या हातावर सॅनिटायझरचे दोन थेंब टाकले असते. त्याने त्याच्या सफेद दाढीवर उतरवलेला मास्क त्याला नाकातोंडावर चढवायला लावला असता. त्याने दिलेल्या गिफ्टवरही फवारणी केली असती. मग ते गिफ्ट उघडून पाहिले असते. 

कारण गतवर्षी याच सुमारास ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वाढू लागली होती व परिणामी आपल्याकडील निर्बंध घट्ट झाले होते. त्या तुलनेत आता निर्बंध शिथिल झाल्याने बराच मोकळेपणा आला आहे. नाताळच्या खरेदीकरिता मॉल, दुकानांत गर्दी आहे. ठिकठिकाणी खरेदीचा उत्साह आहे. हॉटेल, रिसॉर्ट, बीच येथे नाताळ व नववर्षाच्या स्वागताकरिता जय्यत तयारी सुरू आहे. २०२१ या वर्षाला बाय बाय करण्याची वेळ आता जवळ आली आहे. गेले दीड वर्ष आपण साऱ्यांनी कोरोनाच्या नजरकैदेत असल्यासारखे काढले. मागील वर्षी घरात राहूनच नववर्ष साजरे केले. त्यानंतर मार्चपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. 

मार्च ते जून या कालावधीत या लाटेने देशात अक्षरश: मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. त्यानंतर रुग्णांची संख्या कमी झाली. अगोदर देशात लसीकरणाबाबत शंकाकुशंकांमुळे टाळाटाळ केली जात होती. मात्र, दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाकरिता रांगा पाहायला मिळाल्या. वाढते लसीकरण व नैसर्गिकरीत्या आलेली सामूहिक प्रतिकारशक्ती याच्या बळावर आपण व्यवहार सुरळीत केले. बाजारपेठा, हॉटेल, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे, सिनेमागृहे, नाट्यगृहे असे टप्प्याटप्प्याने खुले झाले. आता आपण सर्वत्र गर्दी पाहतो. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या घटलेली असल्याने आपल्या साऱ्यांमध्ये बेपर्वाई आली आहे. अनेक जण मास्क न लावता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता बिनदिक्कत संचार करताना दिसतात. ज्यांच्यावर कोरोना नियमांचे पालन करवून घेण्याची जबाबदारी आहे त्यांनी हटकले तर वाद करतात, वेळप्रसंगी हातघाईवर येतात. विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदारांनाही मास्क घालायला भाग पाडण्याकरिता उपमुख्यमंत्र्यांना ‘दादागिरी’ करावी लागते, हे दुर्दैव आहे. 

दुसऱ्या लाटेत आप्तेष्टांचे मृत्यू झाल्याने आपली पाचावर धारण बसली होती, याचाही अनेकांना विसर पडला आहे. नाताळ व नववर्षाचे सेलिब्रेशन म्हणजे तर सैलसर वर्तणुकीचा अलिखित परवाना अशीच काहींची समजूत असते. त्यामुळे सेलिब्रेशन करताना बेधुंद वर्तनाचा धोका असल्याने राज्य सरकारने समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे अशा ठिकाणी गर्दी करण्यास मज्जाव केला आहे.  हॉटेलमध्ये जाऊन गर्दी करण्यापेक्षा घरच्या घरी कुटुंबासमवेत नववर्ष साजरे करा, हे जर यंत्रणा सांगत असतील तर त्यात गैर नाही. कोरोनाकाळात आपण वेगवेगळ्या माध्यमांद्वारे आप्तेष्टांशी संवाद साधण्याचे तंत्रज्ञान स्वीकारले आहे. त्याचा वापर करून नाताळ व नववर्षाचा आनंद साजरा करता येऊ शकेल. गेल्या काही दिवसांत ब्रिटन, अमेरिका आदी देशांत ओमायक्रॉन व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. ओमायक्रॉन अतिघातक की अतिसौम्य याबाबत तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. परंतु विषाची जशी परीक्षा पाहता येत नाही, त्याप्रमाणे ओमायक्रॉनबाबत परीक्षा पाहणे चुकीचे ठरेल. आपण गाफील राहून जल्लोषाची गर्दी करून आणि समजा या नव्या व्हेरिएंटयमुळे पुन्हा नदीपात्रात मृतदेह तरंगण्याची परिस्थिती उद्भवली तर कपाळाला हात लावून बसण्याची वेळ येईल. 

लसीकरणाबाबतही तशीच बेफिकिरी काही लोकांकडून सुरू आहे. देशातील ८० टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस दिला आहे. मात्र, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ५६ टक्के आहे. दोन डोसमधील अंतर हा मुद्दा जरी ग्राह्य धरला तरी दुसऱ्या डोसची मुदत उलटून जाऊनही अनेकांनी तो घेतलेला नाही. आता ओमायक्रॉनच्या धास्तीने लोक पुन्हा लसीकरण केंद्रांकडे वळू लागले आहेत. लोकांच्या या बेदरकारीमुळे लस फुकट जात आहे. दिवाळीपासून घर, वाहन खरेदी वाढली आहे. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कपात झालेले पगार आता कुठे पूर्ववत होऊन मोडलेले आर्थिक गणित जुळवले जात आहे. ओमायक्रॉन येणार असेल तर येईलच. मात्र, आपली बेपर्वाई त्या व्हेरिएंटच्या घातकतेला हातभार लागणारी ठरणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सांताक्लॉजने यंदा घरोघरी यावे व लोकांना सबुरीच्या वर्तनाचा सल्ला द्यावा, तरच २०२२ मध्ये आपण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकलेली असेल.
 

Web Title: corona situation in the world and patience from santa claus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Christmasनाताळ