Corona Vaccination: पालकांच्या मनातला भीतीचा अडथळा कसा ओलांडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 05:31 AM2021-10-18T05:31:20+5:302021-10-18T05:31:44+5:30
मुलांना संसर्ग होऊन गेला असेल, तर मग लस कशासाठी? - असा प्रश्न विचारणाऱ्या पालकांना ‘लसवंत मुले म्हणजे सुरक्षित घर’ हे पटवून द्यावे लागेल!
- डॉ. अमोल अन्नदाते, बालरोग तज्ज्ञ (reachme@amolaannadate.com)
कोव्हॅक्सिन लसी लहान मुलांना देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी ३५.३ % हिस्सा हा ०- १४ व ४१ % ० ते १८ वयोगटाचा असल्याने कोरोना महामारीचे नियोजन हे लहान मुलांच्या लसीकरणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून लहान मुलांसाठी लसीला परवानगी मिळणे महत्त्वाचे आहे; पण परवानगी मिळणे व देशातील प्रत्येक मुलापर्यंत लस पोहोचणे यातील अंतर मोठे आहे.
लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम राबविताना सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे – पालकांच्या मनातील भीती दूर करणे. मोठ्या व्यक्तींसाठी लसीकरण मोहीम सुरू होऊन १० महिने उलटून गेले; पण अजून मोठ्यांमध्ये भीती व गैरसमजांमुळे लस न घेतलेल्यांची संख्या बरीच आहे. लसीची परिणामकारकता व सुरक्षितता सिद्ध होऊनही अजून लसीच्या भीतीचे पूर्ण उच्चाटन झालेले नाही. म्हणून बालरोगतज्ज्ञ, शाळा, शिक्षक व राजकीय, सामाजिक नेत्यांना प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याला लस देण्यासाठी प्रेरित करणारी वेगळी सामाजिक मोहीम राबवावी लागणार आहे. सिरोर्व्हेप्रमाणे देशातील ५० ते ६० % लहान मुलांना हा संसर्ग होऊन गेला आहे. मग कोरोना संसर्ग होऊन गेला असताना लस कशासाठी, असा प्रश्न पालक विचारत आहेत. संसर्ग होऊन गेला असला तरी कोरोना हा कांजण्याच्या आजाराप्रमाणे आयुष्यभर कायमची प्रतिकारशक्ती बहाल करीत नाही. तसेच नव्या व्हेरियंटस्ने परत संसर्ग होऊ शकतो. कोरोनाच्या नैसर्गिक संसर्गापेक्षा लस शाश्वत व दीर्घकालीन प्रतिकारशक्ती देते.
५० ते ६० % मुलांना कोरोना होऊन गेला असे म्हटले तरी ही ५० % मुले कोण हे शोधण्यासाठी प्रत्येकाची रक्त तपासणी करणे जिकिरीचे आहे. लहान मुलांमध्ये कोरोना सौम्य स्वरूपाचा असतो व मृत्युदर अत्यंत कमी आहे; पण तो अगदी शून्य नाही हे लक्षात घेता लहान मुलांना लस आवश्यक आहेच. बालमृत्यूची अनेक कारणे आ वासून उभी असताना त्यात कोरोनाच्या कारणाची भर परवडणारी नाही. लहान मुलांमध्ये कोरोनाचा आजार गंभीर नसला तरी एमआयएससी ही संसर्ग संपल्यावर चार आठवड्यांनी काही मुलांमध्ये होणारी गुंतागुंत जीवघेणी ठरत आहे व याचे उपचारही महागडे आहेत. हे टाळण्यासाठी लसीकरण हाच उपाय आहे. सौम्य आजार असला तरी लहान मुले घरातील इतर मोठ्या व्यक्तींना व त्यातच आजी-आजोबांसाठी संसर्गाचा महत्त्वाचा स्रोत आहे. दुसऱ्या लाटेनंतर मुलांचा घराबाहेर वावर वाढला आहे व लक्षणविरहित मुले सुपर स्प्रेडर ठरत आहेत. हे लसीकरण करण्याचे एक मोठे कारण आहे.
‘लसीकृत/लसवंत मुले म्हणजे सुरक्षित घर’ अशी नवी घोषणा आता लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाबाबतीत शासनाने द्यावी. पहिल्या टप्प्यात हृदयाचे आजार, किडनीचे आजार, कॅन्सर, थॅलेसिमियासारखे रक्ताचे आजार, मतिमंद व मानसिकदृष्ट्या विकलांग व दिव्यांग मुलांना प्राधान्य देऊन लसीकरण सुरू करावे. यानंतर गरोदर मातांच्या मुलांना व तिसऱ्या टप्प्यात सर्व मुलांना अशा प्रकारे लसीकरण मोहीम पूर्ण करता येईल. वयोगटाच्या बाबतीत आधी १० ते १८ व त्यानंतर २ ते १० वर्षे असे प्राधान्यक्रम ठरविता येतील. २ ते ७ वर्षे वयोगटाला लस देणे हे बालरोगतज्ज्ञांचे विशेष कौशल्य आहे. या वयोगटासाठी देशभरातील बालरोगतज्ज्ञांची मदत घेत झपाट्याने लसीकरण होऊ शकते. कारण इतर लसीकरणासाठी रोज अनेक बालके बालरोगतज्ज्ञांकडे येतात. त्यावेळी आधी कोरोनाची लस व त्यानंतर इतर लसी अशी विनंती बालरोगतज्ज्ञ पालकांना करू शकतात.
लहान मुलांच्या बाबतीत मात्र लसीची किंमत कमी करून जास्तीत जास्त खाजगी बालरोगतज्ज्ञांना या मोहिमेत सामावून घेतल्यास लहान मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढेल. त्यासाठी सध्या खाजगी रुग्णालयाला लसीकरणाची परवानगी व लस साठा मिळविण्याची किचकट प्रक्रिया सोपी करावी लागेल. जोपर्यंत प्रत्येक जण सुरक्षित नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही या तत्त्वाला अनुसरून हर्ड इम्युनिटी मिळविण्यासाठी लहान मुलांचा लसीकरण कार्यक्रम तातडीने राबवावा लागेल.