Corona Vaccination : लसींचे कॉकटेल करावे का? : पुरावे आणि प्रश्न!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 07:59 AM2021-08-17T07:59:58+5:302021-08-17T08:00:15+5:30
Corona Vaccination : लसी मिसळल्यास रोगप्रतिकारक प्रतिसाद वाढतो, असे अभ्यास असले, तरी शास्त्रज्ञांना दुर्मीळ दुष्परिणामांबाबत उत्तरे आणि पुरावे हवे आहेत.
- डॉ. अमित द्रविड
(विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ)
कोविड -१९ संसर्गाविरूद्ध संपूर्ण जगात लसीकरण सुरू आहे. कोविड -१९ च्या अनेक प्रकारच्या लसी आहेत. ज्यात निष्क्रिय व्हायरस (कोव्हॅक्सिन), व्हर्च्युअल वेक्टर-आधारित (एस्ट्राझेनेका-कोविशिल्ड, जॉन्सन अँड जॉन्सन, स्पुटनिक व्ही) आणि आरएनए-आधारित (फायजर आणि मॉडर्ना) यांचा समावेश आहे. कोरोनाच्या नव्या उपप्रकारांपासून संरक्षण वाढवणे आणि लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यावर मार्ग काढणे या दोन उद्देशांनी कोविड -१९ लसींचे मिश्रण करण्याबाबतची नवी चर्चा सुरु आहे. या प्रयोगाच्या यशस्वीतेबाबत व्यापक पुराव्यांचा अभाव आहे.
लस मिसळण्याची ही संकल्पना काही नवीन नाही. एचआयव्ही, मलेरिया, इबोला आणि इन्फ्लूएन्झासह अनेक आजारांसाठी ही पध्दत वापरली गेली आहे. इबोलासाठी दोन वेगवेगळ्या लसी दिल्याने परिणामकारकता वाढल्याचे दिसले. मिक्स-अँड-मॅच अभ्यासासाठी कारणीभूत ठरली ती ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेका! या लसीमुळे रक्त गोठण्याच्या दुर्मिळ तक्रारी (पन्नास हजारात एक या प्रमाणात ) समोर आल्या. मार्च २०२१ मध्ये काही युरोपियन देशांनी काही वयोगटांमध्ये या लसीचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला.
या गटात ज्यांनी ही लस घेतली होती, त्यांना दुसऱ्या डोससाठी वेगळी लस दिली गेली. ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेका आणि फायझर-बायोटेक लसीचे मिश्रण केल्याने जास्त मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचे आढळले. दोन लसींचे मिश्रण केल्याने ३७ पट अधिक neutralizing antibody आणि चौपट अधिक रोगप्रतिकारक T cell तयार झाल्या. असेच परिणाम जगभरातील अन्य काही अभ्यासातही मिळाले. भारतातील छोट्या अभ्यासात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस (अपघाताने) एकत्र केले गेले; अभ्यासाअंती त्याची सकारात्मक प्रतिक्रिया दिसली. तथापि, लस-मिश्रणाच्या यशस्वीतेबाबत ठामठोक निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी या चाचण्या अत्यंत मर्यादित आहेत.
अर्थात, आजवर जगभरात झालेल्या कोरोना लसीच्या कॉकटेलच्या कोणत्याही “मिक्स-अँड-मॅच” चाचण्यांनी अद्यापतरी गंभीर दुष्परिणाम नोंदवलेले नाहीत. कॉम-सीओव्ही अभ्यासानुसार लसींचे मिश्रण केल्यास वृद्ध लोकसंख्येमध्ये ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, अस्वस्थता यासारखे अधिकचे दुष्परिणाम दिसू शकतात. कॉम्बिव्हॅक अभ्यास सांगतो, की एकाच लसीच्या दोन शॉट्सपेक्षा मिश्र लसीकरणाचे दुष्परिणाम अधिक दिसत नाहीत.
आतापर्यंतच्या मिक्स-अँड-मॅच लसीकरणाच्या अभ्यासात सहभागी असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे. याचा अर्थ ही ‘नमुना संख्या’ रक्त गोठण्यासारख्या गंभीर दुष्परिणामांच्या अभ्यासासाठी बरीच मर्यादित आहे. शिवाय दोन वेगवेगळ्या लसींचे आयुर्मान (शेल्फ लाइफ) आणि साठवणुकीच्या अटींमधला फरक लक्षात घेता अतिरिक्त जटिलता येते, ते वेगळेच! लस मिश्रणामध्ये नियामक यंत्रणांच्या निर्देशांच्याबाबतीतही गुंतागुंत होऊ शकते.
भारतात कोविशिल्ड (पहिला डोस) आणि कोव्हॅक्सिन (दुसरा डोस) एकत्र करून व्यापक अभ्यासाचे नियोजन केले जात आहे. फिलिपाईन्समध्ये, देशात इतर सहा लसींसोबत कोरोना-व्हॅक (सिनोव्हाक, चीन) एकत्र करून अभ्यास सुरू आहे. कोविशिल्ड आणि स्पुतनिक व्ही यांच्याही संयोगांची चाचणी होईल.
१६ जानेवारी २०२१ रोजी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू झाली. निम्मे वर्ष सरून गेल्यानंतर १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत भारताने आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ ९% लोकांचे पूर्ण लसीकरण केले आहे. भारतातील लसीकरण मोहिमेची हीच गती राहिल्यास संपूर्ण लसीकरणासाठी अनेक वर्षे लागतील. लसींच्या मिश्रण प्रयोगामुळे भारत आणि लस-तुटवड्याचा सामना करणाऱ्या अनेक देशांच्या लसीकरण मोहिमेला मदत होऊ शकते.
इंग्लंडचा सार्वजनिक आरोग्य विभाग तर म्हणतो, उपलब्ध नाही म्हणून त्याच लसीचा दुसरा डोस न देण्यापेक्षा वेगळी कोविड -१९ लस देणे चांगले! एकुणातच, लस वितरणातली सध्याची जागतिक विषमता दूर होण्यासाठी लस-मिश्रणाच्या प्रयोगांना यश मिळण्याकडे सर्वांचे लक्ष आहे. तथापि, लस मिसळण्याच्या सर्व प्रयत्नांचे कडक दक्षतेखाली मूल्यांकन करण्याला मात्र पर्याय नाही. क्लिनिकल ट्रायल मोडमध्ये सुरक्षा आणि कार्यक्षमतेबाबत अधिक पुरावे हाती येणे अनिवार्य आहे.
ameet.dravid@gmail.com