Corona Vaccination: १०० कोटी लसींची मात्रा पूर्ण झाल्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 05:24 AM2021-10-23T05:24:44+5:302021-10-23T05:25:02+5:30

लसीकरण क्षेत्रात भारताने केलेली कामगिरी लक्षणीय आहे. शंभर कोटी डोसच्या लसीकरणाचा टप्पा गाठताना देशाने इतर देशांनाही मदत केली आहे.

Corona Vaccination what After completion of 100 crore vaccines | Corona Vaccination: १०० कोटी लसींची मात्रा पूर्ण झाल्यावर...

Corona Vaccination: १०० कोटी लसींची मात्रा पूर्ण झाल्यावर...

Next

- डॉ. शशांक जोशी, सदस्य, कोरोना टास्क फोर्स

वैश्विक पातळीवर लसीकरणाचा विचार करता, अन्य आजारांप्रमाणेच आता आपण कोरोना लसीकरणाबाबतही आत्मनिर्भर होऊन सुयश मिळविले आहे. यात दोन घटकांचा मोठा वाटा आहे. लसीच्या उत्पादन कंपन्या आणि लसीकरण मोहीम राबविण्यासाठी मनुष्यबळ तसेच अन्य यंत्रणांचे यात मोलाचे योगदान आहे. देशाची लोकसंख्या १३५ कोटी आहे, त्यानुसार कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या अखेरच्या टप्प्यात २०० कोटी लसी देण्यात येणार आहेत.
देशात १६ जानेवारीला लसीचा पहिला डोस दिला गेला. त्यानंतर २७८ दिवसांनी शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा देशाने पार केला आहे. १०० कोटी डोस देणारा भारत हा जगातला दुसरा देश आहे. चीनने हा टप्पा जून महिन्यात पूर्ण केला होता. या वर्षाच्या शेवटापर्यंत लसीकरण पूर्ण करायचं असेल तर दिवसाला किमान १.२ कोटी लोकांना लस मिळायला हवी. ४५ पेक्षा अधिक वयाच्या सात कोटी लोकांना अजूनही लस मिळालेली नाही. लसीबाबत असलेली उदासीनता आणि तळागाळातल्या प्रत्येकाला लस मिळणे हे भविष्यातील मोठे आव्हान असणार आहे.



लसीकरणाचा वेग देशात सुरुवातीला अतिशय कमी होता. देशात ९६ कोटी लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. लसीच्या वितरणातील अडचणी, उत्पादनातील अडचणी, कोविडची दुसरी लाट यामुळे लसीकरणाची गती काहीशी मंदावली. देशातील पूर्ण लोकसंख्येचे  लसीकरण होण्यासाठी आणखी ९० कोटी डोसची गरज आहे. केंद्र सरकारचे उद्दिष्ट लक्षात घेतले, तर त्यासाठी आता फक्त दोन ते तीन महिनेच शिल्लक आहेत.  

कोणत्याही विषाणूविरोधात जागतिक स्तरावर रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होण्यासाठी अनेक वर्षे जाऊ द्यावी लागतात. मात्र, रोगप्रतिबंधक लसीकरणातील स्थिर वाढ, नव्या लसींसाठी सातत्याने संशोधन आणि कृतिशील उपाययोजनांमुळे सकारात्मक भविष्याचे आश्वासनच मिळाले आहे. कोणतीही लसनिर्मिती करीत असताना चाचणी आणि संशोधनासाठी सामान्यतः काही वर्षे लागतात. कोविड-१९ च्या साथरोगामुळे सुरक्षित आणि प्रभावशाली लसनिर्मितीसाठी जागतिक स्तरावर अभूतपूर्व प्रयत्न करण्यात आले.



लसीकरण क्षेत्रात देशाने केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. यापूर्वीही १९२०पासून म्हणजे गेल्या १०० वर्षांपासून भारताला लस बनवण्याचा अनुभव आहे. जगातील विविध आजारांवरील ७० टक्के लसी भारतात बनतात. भारतीय औषध कंपन्या जगातील विविध आजारांवरील ५० टक्के लसींची मागणी पूर्ण करतात. जगभरातल्या १५० देशांत भारताने बनवलेल्या लसी जातात. भारताने युरोप व अमेरिकेसारख्या विकसित देशांनाही कमी किमतीत विविध आजारांवरील लसी पुरवलेल्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने आतापर्यंत विविध देशांतील आजार बरा करण्यासाठी भारताने बनवलेल्या लसी वापरलेल्या आहेत. भारत कमीत कमी ४० ते ५० पट स्वस्तात औषधं व लसी इतर देशांना देतो.



कोविडमुक्त भविष्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू असताना साथरोगावर जागतिक उपचार होणे अत्यावश्यक बनले आहेत. सध्या औषध व लसींच्या बाबतीत विविध पातळ्यांवर संशोधन सुरू आहे. शिवाय, लवकरच प्रतिबंधक गोळ्यांही चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात असल्याने ही दिलासादायक बाब आहे. याखेरीज, आता करोनाबाधित रुग्णांवर ‘अँटीबॉडी कॉकटेल’ उपचार पद्धती प्रभावी ठरत आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या वापरामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. कोरोनानंतर शासनाचा आरोग्यसेवा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. परिणामी, आरोग्याच्या अर्थसंकल्पापासून ते पायाभूत सेवा सुविधांपर्यंत यंत्रणा गांभीर्याने विचार करू लागली आहे. आपण आता प्रत्येक आजाराविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखत असून व्यवस्थापन व नियंत्रणावर बारकाईने लक्ष देत आहोत. भविष्यात आरोग्यसेवा क्षेत्राच्या दृष्टीने शासनाची यंत्रणा अद्ययावत आणि सक्षम असेल यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
 
शब्दांकन : स्नेहा मोरे 

Web Title: Corona Vaccination what After completion of 100 crore vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.