Corona Vaccine : हनुमानाची संजीवनी गुटी आणि भारताचे कोव्हॅक्सिन! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 06:06 AM2021-02-09T06:06:06+5:302021-02-09T06:10:02+5:30

Corona Vaccine : भारताने आपल्या शेजारी देशांना कोविड लसी 'भेट' म्हणून पाठवल्या. ही व्हॅक्सीन डिप्लोमसी 'सॉफ्ट पॉवर' लढ्यातले अचूक पाऊल आहे!

Corona Vaccine: Lord Hanuman's Sanjeevani and India's Covaxin | Corona Vaccine : हनुमानाची संजीवनी गुटी आणि भारताचे कोव्हॅक्सिन! 

Corona Vaccine : हनुमानाची संजीवनी गुटी आणि भारताचे कोव्हॅक्सिन! 

googlenewsNext
ठळक मुद्देब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी समग्र विश्वसमुदायापुढे भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी रामायणातील संजीवनी गुटीच्या गोष्टीतील प्रतिकचित्र वापले.

>> वैशाली करमरकर
(आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ)

प्रत्येक भाषेत स्थळकाळानुसार काही विशिष्ट शब्दसमुच्चय जन्म घेतात. त्यांचा दुसऱ्या भाषेत अनुवाद करणे दुरापास्त होते. ‘सॉफ्ट पॉवर’ हा इंग्रजी शब्द याच जातकुळीतला! सॉफ्टपॉवरचा विरुद्धअर्थी शब्द म्हणजे हार्ड पॉवर. एखाद्या देशाकडे असलेली लष्करी क्षमता म्हणजे हार्ड पॉवर तेव्हा सॉफ्ट पॉवर म्हणजे आपल्या कौटीलीय अर्थशास्त्रात म्हटलेले ‘साम’ किंवा ‘दान’ असे लष्करेतर मार्ग! शेजारी राष्ट्रे, मित्रराष्ट्रे यांच्यावर प्रभाव किंवा दबाव टाकण्यासाठी आखलेली दीर्घ पल्ल्याची धोरणसूत्रे म्हणजे एखाद्या देशाची सॉफ्ट पॉवर.

आजच्या विश्वसमूहात रहाताना प्रत्येक देशाला आपले स्वत:चे असे प्रभावक्षेत्र किंवा दबावक्षेत्र तयार करण्याची आणि त्याचे वर्तूळ वाढवत ठेवण्याची आत्यंतिक निकड आहे. स्पर्धा जीवघेणी आहे. संघर्ष अटळ आहेत. शस्त्रस्त्रे अधिकाधिक संहारक बनत चालली आहेत त्यामुळे ‘दंड’ ‘भेद’ याकडे जाण्याआधी ‘साम’ आणि ‘दान’ या परिघात देशाचे परराष्ट्रधोरण आखणे अनिवार्य आहे. त्यामुळे सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीला आज अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.

आपली पृथ्वी फक्त एक. खाणारी तोंडे सात अब्जाच्यावर पोहोचलेली. नांदणारे देश दोनशेच्या आसपास. प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेला भूगोल वेगळा. आपले शेजारीपाजारी देश, दुरवरचे नातलग देश यांच्याशी सलोखा निर्माण करणे महत्त्वाचे. सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीमागे अनेकविध उद्देश असतात. आपल्या देशाचा सकारात्मक प्रभाव पाडुन सीमारक्षणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठींबा मिळवता येतो. जागतिक मंचावर विश्वासार्हता संपादन करता येते. व्यापार-उदीमात पृथ्वीवरच्या साधनसंपत्तीला पुरेसा वाटा मिळवता येतो. न पाहिल्या, न देखल्या दुरस्थ जनसमूहावर आपलं संमोहन घालता येतं. अशा या सॉफ्टपॉवर निर्मितीचं सुद्धा एक तंत्र आहे. चिनी तत्ववेत्ते कन्फ्युशिअस यांनी एका चपखल रूपकातुन हे तंत्र विशद केलं आहे. अजस्त्र खडकावर सतत थेंबथेंब पाणी टाकत राहिलं तर अनेक वर्षानंतर या अभेद्य खडकाची अवस्था छिन्नभिन्न होऊ शकते. पुढचा मार्ग सुकर होतो. अपरिचीत जनमानसाचा कल आपल्याकडे वळवण्यासाठी आणि त्यावर कब्जा मिळवण्यासाठी भलेही अनेक वर्षे लागोत; पण मग त्यावर मिळविलेली पक्कड जबरदस्त असते-  अशी असते सॉफ्ट पॉवरची शक्ती. अलीकडच्या इतिहासातली त्याची दोन उदाहरणे-

भारत स्वतंत्र होऊन साठेक वर्षे लोटली तरी भारतातील अनागोंदी बघुन सरती पिढी विषादाने म्हणत असे - ‘यापेक्षा इंग्रजांचे राज्य परवडले’ आजही बहुतांशी लोकांना मातृभाषेतील शिक्षण हा विचार पटत नाही. इंग्रजी माध्यम म्हणजे यशाची गुरुकिल्ली वाटते. दूरदर्शनपेक्षा बीबीसीचे वृत्तांकन खात्रीलायक वाटते. कालीदासापेक्षा शेक्सपीयर वाचलेला असणे महत्त्वाचे वाटते.  याचे कारण ‘भारताचा भाषिक आणि सांस्कृतिक कणा मोडण्यासाठी’ इंग्रजांनी 18व्या शतकापासून राबविलेले सॉफ्टपॉवर धोरण. फ्रेंच, इंग्रजी वसाहतवादाची शिकार झालेल्या जगातील इतर सर्व देशांची नेमकी हीच अवस्था आहे. त्यांच्यापाशी सुद्धा स्वत:चे नॅरेटीव्ह (कथ्य) नाही. इंग्रजांनी / फ्रेंचानी ठरवला तोच त्यांचा इतिहास आणि तोच त्यांचा भूगोल.

दुसरे उदाहरण सोव्हिएट युनियनच्या विभाजनाचे. सॉफ्टपॉवरची माध्यमे म्हणजे संगीत, पेहेराव, खाणेपिणे, भाषा, सिनेमे, मूल्ये इत्यादी! अमेरिकन संगीत, अमेरिकन वाड्:मय आणि हॉलीवुड सिनेमे यातुन अर्निबध स्वातंत्र्य हे अमेरिकन मूल्य उ:श्वसित होत असते. ही तीन साधने सोव्हीएट युनियनच्या नागरिकांवर सतत ठिबकत ठेवून अमेरिकेने दूर बसून रशियाची शकले शकले केली. बर्लिनची भिंत पडली. या सर्वासाठी लष्कराची गरजच पडली नाही. अशी ही सॉफ्टपॉवरची किमया!

आज कोविड-19 या महामारीच्या निमित्ताने परराष्ट्र धोरणातील सॉफ्ट पॉवरचे महत्त्व पुन: एकदा अधोरेखित होत आहे. लससंशोधन, लसनिर्मिती आणि लसीकरण मोहिमा या उधाणात गरीब-श्रीमंत, विकसित-अविकसित असे सर्व देश एकाच होडीतले प्रवासी बनले आहेत. तसे पहाता या पृथ्वीवर पूर्वीपासून अनेक महामाऱ्या आल्या आणि गेल्या; मात्र त्यातल्या प्रत्येकवेळी त्या संबंधातील ज्ञानाच्या किल्ल्या पाश्चात्य देशांच्या घट्ट मुठीत होत्या. ते देणारे होते. उर्वरित जग त्यांच्या कृपेची वाट पहात घेणाऱ्याच्या भुमिकेत होते. आजची परिस्थिती वेगळी आहे. एकेकाळचे गरीब, आश्रीत देश-भारत आणि चीन - या महामारीतून उठुन कामाधामाला लागले सुद्धा! परंतु अजुन युरोप-अमेरिकेतील मृत्युचे तांडव ओसरण्याचे कोणतेही चिन्ह नाही. वूहानमुळे सर्व विश्र्वसमुदाय चीनकडे अत्यंत संशयी नजेरेने पहात आहे. आपल्या नागरिकांच्या आरोग्याच्या किल्ल्या चीनकडे सोपवाव्या अशा मन:स्थितीत फारसे देश नाहीत. चिनी संशोधनातील अपारदर्शकता भयावह आहे.

ही पोकळी भारतीय धोरणतज्ज्ञांनी नेमकी हेरली. आपली व्हॅक्सीन डिप्लोमसी विचारपूर्वक आखली. 22 जानेवारी 2021 र्पयत देशभर दहा लाखावर लसीकडे पुर्ण झाली. जुलैर्पयत तीस कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणार आहे. त्यासाठी साडेपाच लाख आरोग्यसेवक प्रशिक्षीत करण्यात आले. देशभर 29,000 कोल्डस्टोरेजेस उघडली. भारतवासीयांचे लसीकरण करताकरता आपला शेजारी भूतान या देशाकडे एक लाख पन्नास हजार डोस भेट म्हणुन रवाना झाले. मालदीव एक लाख, नेपाळ दहा लाख, बांगलादेश वीस लाख, म्यानमार पंधरा लाख, असे डोस देणगी स्वरूपात भारताकडून दिले गेले. मॉरीशस, सेशेल्स या इवल्या इवल्या देशांर्पयत पन्नास हजार डोसांची भेट पोहोचली. हा लेख प्रसिद्ध होईर्पयत अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांकडे लाखो डोस देणगी स्वरुपात रवाना झाले असतील.

ब्राझील या देशाने चीननिर्मित सिनोफार्म ही लस विकत घेतली खरी. पण ट्रायल्समध्ये फक्त पन्नास टक्के रोग्यांवर ती यशस्वी झाली. हे लक्षात येताच ब्राझीलने भारताकडे वीस लाख डोसांच्या खरेदीची मागणी नोंदविली. भारतीय कोव्हिशिल्ड त्वरीत ब्राझीलकडे पाठवले गेले. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी समग्र विश्वसमुदायापुढे भारताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी रामायणातील संजीवनी गुटीच्या गोष्टीतील प्रतिकचित्र वापले. सोशल मिडीयात हनुमानाची कथा आणि "धन्यवाद भारत" हे आपल्या भाषेतले शब्द जगभर निनादले. भारताची सॉफ्ट पॉवर अधोरेखित झाली. भारताचे प्रभावक्षेत्र झपाट्याने पसरले.

Image result for Hanuman Sanjeevani vaccine

त्याचे स्पष्ट पुरावे मिळू लागले. नवरचित अमेरिकन सरकारकडुन शाबासकीची थाप जगजाहीर झाली. ब्राझील पाठोपाठ मोरोक्को या देशाने वीस लाख कोव्हीशिल्ड डोसांची मागणी नोंदविली. ब्रिटन आणि बेल्जीयमने विक्री करार केले. डोमिनीका या देशाकडून आलेल्या तातडीच्या मागणीला  भारताने तत्पर प्रतिसाद दिला. दक्षिण अफ्रिका, केनिया, नायजेरिया, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती येथुन लसीच्या मागणीचा ओघ वाढतोच आहे.

इतिहासाने दिलेली संधी नेमकी ओळखणे, यात राजकीय नेतृत्वाचा कस लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही दूरदृष्टी दाखवली. परराष्ट्रधोरणातील सॉफ्टपॉवरचे महत्त्व कायम ओळखले आणि त्यानुसार भारताचे प्रभावक्षेत्र सतत वाढते ठेवले. आपल्या परराष्ट्र धोरणात झालेला हा बदल सुखावह आहे, वेगळा आहे. वेगळा अशासाठी की, आजवरचा भारताच्या सॉफ्टपॉवर डिप्लोमसीचा प्रवास कर्मधर्मसंयोगाने घडला. त्यात सातत्य नव्हते, शिस्त नव्हती, आखणी नव्हती, स्वयंप्रेरित प्रयत्न नव्हते. जग महायुद्धाने पोळलं म्हणुन एकदम गांधी आणि अहिंसा याकडे जग ओढलं गेलं. व्हिएतनाम युद्धातील नरसंहाराला कंटाळलेली पाश्चात्य पिढी हिप्पी बनून ध्यानधारणेकडे वळु लागली. अनिवासी भारतीयांच्या निमित्ताने भारतीय खाद्यसंस्कृती, पेहेराव, बॉलीवुडची नृत्ये, कुंभमेळा हे विषय भारताच्या संदर्भात आकर्षणबिंदु ठरले. परंतु विश्वसमुदायाकडुन 21 जून हा जागतिक योगसाधनेचा दिवस म्हणुन मान्य करून घेणे, यात सॉफ्टपॉवर नावाचे स्वयंप्रेरित धोरणसूत्र आहे.

आपली ही घोडदौड चालु असताना चीन स्वस्थ बसलेला नाही. जॉर्डन, टर्की, अल्जेरिया, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापुर, थायलंड, फिलिपीन्स, पाकिस्तान, युक्रेन, सॅबेरिया या देशांना चीनने लस विकली. देणगीदाखल दिली नाही. हा फरक ठळकपणे जगापुढे आला. जगाच्या नकाशावर भारत आणि चीन या देशांनी आपल्या प्रभावक्षेत्राखाली आणु पाहिलेल्या देशांचे स्थान पाहिले तर त्यामागची भूराजकीय धोरणे आरशासारखी लख्ख दिसतात. चीनसाठी लष्करी विस्तारवाद महत्त्वाचा आहे. शिवाय रोड अॅण्ड बेल्ट या व्यापारमार्गाच्या निमित्ताने ऋणको देशांना सावकारी तत्त्वावर लुबाडणे हा अजेंडा चीनला नेटाने पुढे रेटायचा आहे.

- तहान लागल्यावर पाणी पिणे म्हणजे प्रकृती.
- आपण तहानलेले असूनही इतर तहानलेल्यांना पाणी देणे म्हणजे संस्कृती. 
- आपली तहान पुरती भागलेली असूनसुद्धा दुसऱ्याचे पाणी हिसकावून घेणे ही विकृती.

- भारत आणि चीन यांच्या वृत्तीतला फरक ओळखण्याइतका चाणाक्षपणा विश्वसमुदायाकडे नक्कीच आहे. भारताची ही व्हॅक्सीन डिप्लोमसी म्हणजे अत्यंत दूरदृष्टीने राबविलेले आणि चमकदारपणे यशस्वी ठरलेले परराष्ट्र धोरण सुत्र आहे, भारताच्या सॉफ्टपॉवरचे सबलीकरण आहे हा मूळ मुद्दा.

- प्रत्येक भारतीयाने सॉफ्टपॉवरच्या परिप्रेक्ष्यात जगातील घडामोडी बघणे आणि त्याचा अन्वयार्थ लावणे ही काळाची गरज आहे हे निश्चित. जागतिकीकरण या शब्दाचा हा सुद्धा अर्थ आहे नाही का?

Web Title: Corona Vaccine: Lord Hanuman's Sanjeevani and India's Covaxin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.