लस खरी की खोटी? - चीनमध्ये घबराट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 07:39 AM2021-07-22T07:39:10+5:302021-07-22T07:40:29+5:30
कोरोनाचा विषाणू पहिल्यांदा चीनमध्ये निर्माण झाला आणि तिथेच पहिल्यांदा लसही आली.
कोरोनाचा विषाणू पहिल्यांदा चीनमध्ये निर्माण झाला आणि तिथेच पहिल्यांदा लसही आली. आपल्याकडे लस तयार झाल्याबरोबर चीननं ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’ मोहीम सुरू केली. ‘केवळ आम्हीच तुम्हाला वाचवू शकतो,’ असा आव आणताना अनेक देशांना आपली लस देऊ केली आणि त्यांना आश्वासनही दिलं की कोरोना प्रतिबंधासाठी ही लस अतिशय उपयुक्त, प्रभावी आणि सुरक्षित आहे. कोरोनावर त्या वेळी लस उपलब्ध नव्हती आणि लसीचा प्रभावीपणाही माहीत नव्हता.
त्यामुळे अनेक देशांनी ‘आपत्कालीन स्थिती’ म्हणून चीनकडून लस घेतली. पण, हे सारेच देश आता पस्तावताहेत. मंगोलिया, सेशल्स, बहारीन आणि चिली हे देश तर अक्षरश: तोंडावर आपटले होते. कारण या देशांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेण्यात जगात आघाडी घेतली होती; पण याच देशांत नंतर कोरोनाची साथ खूप वेगानं पसरली. चिनी लस घेऊन पस्तावलेले असे जवळपास ९० देश आहेत. चीननं मात्र हे आरोप खोडून काढले, आपली लस अतिशय उपयुक्त आहे, असाच दावा केला होता. पण त्यांचा दावा किती पोकळ होता, हे आता दिसून येत आहे. कारण खुद्द चीनला आणि चीनमधील लोकांनाच आपल्या लसीविषयी साशंकता आहे. ज्यांना लसीच्या दोन्ही मात्रा दिल्या होत्या, त्यांच्यातही नंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला. ‘सिनोफार्म’ आणि ‘सिनोवॅक बायोटेक’ या चिनी कंपन्यांनी ही लस तयार केली होती. आता चिनी सरकारच आपल्या ज्या नागरिकांनी चिनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना जर्मनीच्या लसीचा ‘बूस्टर डोस’ देण्याचा विचार करीत आहे.
मुख्य म्हणजे चीनमध्येच आपल्या लसींविरुद्ध आवाज उठवला जात आहे. तेही सर्वसामान्य लोकांकडून नव्हे, तर तज्ज्ञांकडून. या वर्षीच्या एप्रिल महिन्यात सर्वांत पहिला आवाज उठवला तो गावो फू यांनी. ही साधीसुधी व्यक्ती नाही. ‘चायनाज सेंटर फॉर डिसिज कंट्रोल’ या प्रख्यात संस्थेचे ते प्रमुख आहेत. चिनी लसी फारशा प्रभावशाली नाहीत असं म्हणताना, वेगळ्या लसींचा वापर करावा की काय, याबाबत आम्ही विचार करीत आहोत, असंही फू म्हणाले. अर्थात यामुळे लोक प्रचंड हादरले, त्यावरून वादविवाद सुरू झाल्यानंतर फू यांनी आपलं विधान मागे घेतलं.
पण, त्याचा उलटाच परिणाम झाला आणि चिनी लसी खात्रीशीर नाहीत यावर लोकांचा अधिकच विश्वास बसला. चीनच्या म्हणण्यानुसार, लसीच्या दोन्ही मात्रा घेणाऱ्या लोकांची संख्या जवळपास १४० कोटी आहे. हे सगळेच लोक आता हादरले आहेत.
ज्या नागरिकांचे लस घेणं बाकी आहे, तेही मोठ्या संभ्रमात पडले आहेत. इतक्या मोठ्या लोकसंख्येला लस देऊन झालेली असली तरी चिनी सरकार मात्र किमान २०२२ पर्यंत तरी आपल्या सीमा खुल्या करण्यास तयार नाही. यावरूनही चीन स्वत:च आपल्या लसीबाबत साशंक आहे, हे सिद्ध होतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. जर्मनीच्या ‘बायोएनटेक’ या कंपनीनं ‘एमआरएनए’ नावाची लस तयार केलेली आहे. ती कोरोनावर ९५ टक्के प्रभावी आहे असं म्हटलं जातंय. अमेरिका आणि युरोपमध्येही या लसीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आणि अजूनही करण्यात येत आहे. ही लस जर्मनीची असली तरी चीनमधील फोसून या कंपनीला ही लस तयार आणि वितरित करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे ही कंपनी आता लसीचा ‘बूस्टर डोस’ तयार करेल. त्याचवेळी ‘बायोएनटेक’ ही लसीची मूळ निर्माती जर्मन कंपनी मात्र चीनमध्ये लस तयार करण्याची सरकारी परवानगी मिळण्यासाठी अजूनही वाट पाहात आहे.
चिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा ‘नवा डोस’, ‘कॉमिरनाटी’ या नव्याच नावानं बाजारात येणार आहे. इंडोनेशियामधील अनेक लोकांनीही चिनी लस घेतली होती. त्यातल्या जवळपास तब्बल चारशे डॉक्टर, नर्सेसनी चीनच्या सिनोवॅक या लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या होत्या, तरीही त्यांना पुन्हा कोरोना झाला. त्यामुळे तिथल्या सर्व हेल्थवर्कर्सना आता ‘मॉडर्ना’ कंपनीच्या लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे.
चीनमध्ये ‘बायोएनटेक’ या जर्मन कंपनीची जी लस आता देण्यात येणार आहे, ती कोरोनाचा अटकाव करण्यासाठी ९५ टक्के समर्थ असून, डेल्टा या व्हेरिएंटपासून ८४ टक्के बचाव करते, तसंच ९६ टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापासून वाचवते, असं म्हटलं जात आहे.
‘मंकी बी’ व्हायरसचा पहिला मृत्यू
कोरोना साथीनं सगळ्या जगभर उच्छाद मांडलेला असतानाच चीनमध्ये ‘मंकी बी’ व्हायरसमुळे जगातला पहिला मृत्यू झाला आहे. बीजिंगमध्ये राहणारी ५३ वर्षे वयाची ही व्यक्ती जनावरांची डॉक्टर होती. मानवावर प्रयोग करण्याआधी जनावरांवर प्रयोग आणि संशोधन करणाऱ्या संस्थेत हे डॉक्टर कार्यरत होते. मार्च महिन्यातच संशोधनासाठी त्यांनी दोन माकडांवर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर एक महिन्यातच त्यांच्यात ‘मंकी बी’ व्हायरसची लक्षणं दिसायला लागली; आणि त्यातच त्यांचा अंत झाला. आता हा व्हायरसही जगभर पसरणार का, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.