अवघाची गलबला । फुकाचा धुराळा । कोरोनाच्या नावाने । जमविला गोतावळा ।।
By सुधीर महाजन | Published: March 14, 2020 08:04 PM2020-03-14T20:04:56+5:302020-03-14T20:12:14+5:30
कोणतेही सरकार आव्हानात्मक परिस्थितीचा अंदाज घेऊन सामोरे जाण्यापूर्वी तयारी करीत असते. आग लागल्यानंतर विहीर खोदण्याचा वेडेपणा कोणी करीत नाही.
- सुधीर महाजन
आपण अतिसंवेदनशील झालो आहोत का? एखाद्या आपत्तीला सामोरे जाण्यापूर्वी आपण गर्भगळीत का होतो. समाजाने असे भयभीत होऊन चालणार नाही, एकटा-दुकटा माणूस घाबरला तरी त्याला समाजाचा, आप्तस्वकीयांचा आधार वाटतो; पण जेव्हा समाजच भीतीच्या सावटाखाली सरकायला लागतो त्यावेळी आभासी संकटाचे आपत्तीत रूपांतर होते. त्यावेळी आपल्याजवळ हात-पाय गाळण्याशिवाय पर्याय नसतो, म्हणून समाजाने भयभीत होऊन चालत नाही. ‘कोरोना’च्या साथीने जगभर हात-पाय पसरायला सुरुवात केली आणि दक्षिण गोलार्धापासून उत्तर गोलार्धापर्यंत जगभर भीतीची लहर पसरली. त्याला बळी पडलेल्या संख्येचा आणि त्या देशाच्या लोकसंख्येचा विचार केला, तर बळींचा आकडा पाचावर धारण बसण्यासारखा नाही. चीनमध्ये या साथीचा जोर कमी झाला आहे. अशावेळी या आपत्तीचा सामना करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी लागते, काही खबरदारी घ्यावी लागते आणि जगभरातील शासनकर्ते ती घेत आहेत, कारण ते त्यांचे कर्तव्य आहे.
कोणतेही सरकार आव्हानात्मक परिस्थितीचा अंदाज घेऊन सामोरे जाण्यापूर्वी तयारी करीत असते. आग लागल्यानंतर विहीर खोदण्याचा वेडेपणा कोणी करीत नाही. त्याच प्रमाणे या साथीचा प्रसार रोखण्यासाठी जगभर प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत. कोरोनामध्ये आपल्या देशात आजवर फक्त दोन जणांना प्राण गमवावा लागला. बहुतेक ठिकाणच्या संशयित रुग्णांची चाचणी नकारात्मक आली. सर्दी, पडसे, ताप, खोकला ही लक्षणे इतर साथीच्या किंवा विषाणूजन्य आजाराची असल्याने अशी लक्षणे दिसतात. डेंग्यू किंवा स्वाईन फ्ल्यू, हिवतापाऐवजी कोरोनाची भीती वाटते हा भयगंड किंवा फोबिया निर्माण झाला आहे. आपण वर्षभरातील जिल्ह्यातील साथीच्या रोगात बळी पडलेल्यांची आकडेवारी पाहिली तर औरंगाबाद जिल्ह्यात वर्षभरात स्वाईन फ्ल्यूच्या ६१ रुग्णांपैकी केवळ ४ रुग्णांचा मृत्यू झाला. डेंग्यूच्या ४५९ रुग्णांपैकी १३ जण मृत्यू पावले. आता दुसरे आकडे पाहू. वर्षभरात औरंगाबाद जिल्ह्यात ४७९ रस्ते अपघातांमध्ये ५९३ जणांचा बळी गेला. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत मराठवाड्यात १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
हे वास्तव असताना अपघात, आत्महत्या, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू यांच्या कोणत्याच आकडेवारीने आपण घाबरून जात नाही. अपघात रोज घडतात, बळी रोज जातात, शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही असा मराठवाड्यासाठी एकही दिवस नाही. येथे आपली संवेदना बोथट झाली का, असा प्रश्न पडतो आणि ‘कोरोना’च्या धास्तीने आपण सगळेच भुई धोपाटत बसलो. याउलट भाजी विक्रेते, पेट्रोलपंपावर पेट्रोल भरणारे कर्मचारी, फळ विक्रेते, कंडक्टर असे गर्दीच्या ठिकाणी काम करणारे तोंडाला मास्क लावून, खबरदारी घेत रोजचे व्यवहार पार पाडत आहेत. आरोग्यसेवेतील कर्मचारी चोवीस तास रुग्णांची देखभाल करीत कर्तव्य बजावताना दिसतात. भीतीपोटी एकाही कर्मचाऱ्याने रजा घेतल्याचे उदाहरण नाही. उलट त्यांचे कामाचे तास वाढले आहेत. या सकारात्मक उदाहरणांचे सामान्य माणसाने निरीक्षण केले पाहिजे. कोरोनाची साथ हे संकट आहे; पण हात-पाय गाळण्यासारखे नाही. त्याचा मुकाबला शक्य आहे. तो केला पाहिजे.