Corona Virus: हे काय ?... पुन्हा मास्क घालायचा की काय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 10:28 AM2023-09-15T10:28:24+5:302023-09-15T10:29:04+5:30

Corona Virus:जगातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोविडच्या रुग्णांमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे. या देशांमध्ये अमेरिकेचाही समावेश आहे. परिस्थिती आधीसारखी नसली, तरीही संसर्गाच्या वातावरणात आपले विद्यार्थी सुरक्षित राहावेत यासाठी अमेरिकेतील काही शाळांनी पुन्हा मास्क-सक्ती सुरू केल्याच्या बातम्या आहेत.

Corona Virus:: What is this?... Should I wear a mask again or what? | Corona Virus: हे काय ?... पुन्हा मास्क घालायचा की काय ?

Corona Virus: हे काय ?... पुन्हा मास्क घालायचा की काय ?

googlenewsNext

जगातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोविडच्या रुग्णांमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे. या देशांमध्ये अमेरिकेचाही समावेश आहे. परिस्थिती आधीसारखी नसली, तरीही संसर्गाच्या वातावरणात आपले विद्यार्थी सुरक्षित राहावेत यासाठी अमेरिकेतील काही शाळांनी पुन्हा मास्क-सक्ती सुरू केल्याच्या बातम्या आहेत.  अलाबामा राज्यातील समटर परगण्यातील एका शाळेने मुलांनी, शिक्षकांनी आणि अभ्यागतांनी मास्क घातल्याशिवाय शाळेच्या आवारात येऊ नये, असा नियम केला. आणि मुलांच्या काळजीपोटी घेतलेल्या या निर्णयाला पालकांकडूनच मोठ्या प्रमाणात विरोध झाला.
अर्थात, अमेरिकेतील मास्कची सक्ती आणि तिला होणारा विरोध ही काही नवीन घटना नाही. २०२० सालापासूनच अमेरिकन नागरिक मास्क या विषयाकडे वेगळ्या नजरेने बघत आलेले आहेत.

तशी २०२० सालच्या सुरुवातीपासून कोरोनाची थोडी थोडी चर्चा जगभरात सुरू झाली होती. आणि मग कोणाला काही कळायच्या आत  अक्षरशः जीवघेणी लाट जगभरात ठिकठिकाणी येऊ लागली. एकानंतर एक देश लॉकडाऊन जाहीर करायला लागला. लॉकडाऊनमुळे घरात डांबून राहिलेले अनेक लोक रोजचा रुग्णसंख्येचा आकडा बघायचे. त्यावरून परिस्थितीचं गांभीर्य जोखायचे. किती चाचण्या झाल्या, किती लोक पॉझिटिव्ह आहेत, किती लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागतं आहे आणि किती मृत्यू झाले आहेत हे रोजचे चर्चेचे विषय झाले होते.

हाताला काम नाही, कमाईचं साधन बंद पडलेलं, प्रवास करायला बंदी, शाळा बंद, कॉलेजेस बंद अशा परिस्थितीत, लस तयार होण्यापूर्वी लोकांना घरातून बाहेर पडायला आणि आयुष्य रुळावर आणायला सगळ्यात जास्त मदत केली ती दोन गोष्टींनी… एक म्हणजे मास्क आणि दुसरं म्हणजे सॅनिटायझर! सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा आणि हात वारंवार सॅनिटाइझ करा या सूचना तर अनेक देशांतील सरकारं देत होतीच, पण बहुतेक ठिकाणी या दोन गोष्टींची सक्तीही करण्यात आली होती.

मात्र, मास्क घालण्याची सक्ती ही गोष्ट अमेरिकेत आरोग्याच्या परिघातील न राहता तिचा राजकीय मुद्दा झाला. अनेक अमेरिकन नागरिकांना तो त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घातलेला घाला वाटला. मास्क घातल्यामुळे कोरोनापासून कुठलंही संरक्षण मिळत नाही अशी भूमिका अनेकांनी घेतली. इतकंच नाही, तर कोविड १९ असा कुठलाही आजार मुळात अस्तित्वातच नाही, हे एक जागतिक कटकारस्थान आहे असं म्हणणारेही अमेरिकेत अनेक लोक होते आणि आहेत. त्यावेळी त्यातील टोकाच्या लोकांनी ‘कोविड पार्टीज’ आयोजित केल्या होत्या. त्यात लोक मुद्दाम एकत्र जमत असत. त्यावेळी त्यातील अनेकांनी लागण होऊन जीव गमावला, तरीही त्यातील अनेकांनी त्यांची भूमिका सोडली नाही.

कोविडच्या २ वर्षांच्या काळात अमेरिकेत मास्कबद्दल जी धुमश्चक्री झाली तीच आता काही शाळांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पुन्हा होताना दिसते आहे. मेरीलँड येथील एका शाळेने बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी काही दिवस मास्क सक्तीचा केला. न्यू यॉर्क राज्याने जरी मास्क सक्ती केलेली नसली, तरी तिथल्या गव्हर्नरने शाळांमधून एन ९५ आणि केएन ९५ या प्रकारचे मास्क वाटण्याची योजना जाहीर केली आहे. मेरीलँडच्या शाळेने मुलांनी मास्क घातलाच पाहिजे, असं सांगितल्यानंतर टेड क्रूझ नावाच्या माणसाने ट्विटरवर म्हटलं आहे, “तुम्हाला तुमच्या इच्छेने मास्क घालायचा असेल तर घाला. पण आमच्या मुलांना त्यापासून दूर ठेवा.” हे लिहिण्यासाठी त्याने क्ले ट्रॅव्हिस नावाच्या व्यक्तीच्या ट्विटचा आधार घेतला आहे. क्ले ट्रॅव्हिसने शाळेच्या सूचनापत्रकाचा फोटो टाकून वर लिहिलं आहे, “मेरीलँडमधल्या मॉंटगो मेरी परगण्यातील एका शाळेतील काही मुलांची कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या शाळेने मुलांना शाळेत मास्क घालणं सक्तीचं केलं आहे. ते पुन्हा मास्क घालून तुमच्या मुलांच्या मागे येत आहेत. हे पत्र वाचा. हा मूर्खपणा पहा.” 

अमेरिकेत मास्कसक्तीला असणाऱ्या विरोधाला राजकीय रंग आहे. रिपब्लिकन पक्षाने सुरुवातीपासून मास्कसक्तीच्या विरोधात भूमिका घेतली. कोविड काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या  डोनाल्ड ट्रम्प यांनी  स्वतः कित्येक महिने सार्वजनिक ठिकाणी मास्क घातलेला नव्हता. रिपब्लिकन पक्षाचे पाठीराखे असलेल्या नागरिकांनीही मास्क घालण्याविरुद्ध जाहीर भूमिका घेतली होती.

कशाला हवाय तो मास्क ?
अमेरिकेतल्या शाळांनी त्यांच्या आवारात केलेल्या मास्कसक्तीला विरोध करणारे बहुतांश लोक हे रिपब्लिकन पक्षाचे पाठीराखे आहेत. मास्क सारख्या खरंतर केवळ सार्वजनिक आरोग्याशी निगडित विषयाचं अमेरिकेत पूर्णपणे राजकियीकरण झालं आहे. इतकं, की डोनाल्ड ट्रम्प अजूनही  सांगतायत,  त्यांना जर पुन्हा निवडून दिलं तर ते कधीही मास्कची सक्ती करणार नाहीत.

Web Title: Corona Virus:: What is this?... Should I wear a mask again or what?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.