कोरोनाचा खात्मा होईल; पण एका अटीवर...
By अतुल कुलकर्णी | Published: January 4, 2022 08:08 AM2022-01-04T08:08:58+5:302022-01-04T08:11:21+5:30
कोरोना वाढू द्यायचा नसेल आणि त्यासंदर्भातील गैरप्रकार टाळायचे असतील तर प्रत्येकाने भानावर आले पाहिजे..
-अतुल कुलकर्णी, संपादक, लोकमत, मुंबई
घरकाम करणाऱ्या एका मुलाच्या गावाला भुताने झपाटले म्हणून कोरोनाची लस घ्यायला कोणी तयार नाही. त्यासाठी गावातल्या पुजाऱ्याने सांगितलेल्या दक्षिणेसह १० ते १५ हजारांचे साहित्य आणून पूजा घातली गेली. रात्री सगळ्यांनी पूजेचे साहित्य दाराबाहेर ठेवायचे, दरवाजे बंद करून डोळे मिटून बसून राहायचे. रात्रीतून सगळे साहित्य नाहीसे झाले तर ते त्या भुताने नेले असे समजायचे. दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या दारासमोरचे साहित्य नाहीसे झाले होते. लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पुजारी म्हणाला, असेच भूत दुसऱ्या गावातही आहे, तुमची पूजा करून मी ते सोडवायला जाणार आहे, त्यामुळे माझी कोणी वाट पाहू नका... त्या गावात कोरोना किती नीट झाला याचा कोणीही तपास केलेला नाही. एकीकडे ग्रामीण भागात ही मानसिकता, तर दुसरीकडे शहरांमध्ये टोकाची बेफिकिरी आली आहे.
आम्हाला काही होत नाही असा दावा करायचा. विनामास्क बिनदिक्कत फिरायचे ही बेफिकिरीच मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये बोकाळली आहे. परदेशातून परत आलेल्यांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला असतानाही असे लोक बिनधास्त बाहेर फिरतात. माझ्यात कोणतीही लक्षणे नाहीत असे म्हणत इतरांना कोरोनाचा प्रसाद देत फिरतात. त्यांना स्वतःची, त्यांच्या घरची आणि आजूबाजूची कसलीही फिकीर नाही. कालच मुंबई विमानतळावर एका गृहस्थाची तपासणी केली तेव्हा ते पॉझिटिव्ह निघाले, तर त्यांनी आपल्या तपासणी पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरटीपीसीआर करायला नकार दिला. त्यांना जबरदस्तीने सेव्हन हिल हॉस्पिटलला ॲडमिट करावे लागले. या अशा वागण्याने आपण आपले आणि संपूर्ण समाजाचे स्वास्थ्य धोक्यात आणत आहोत याचाही कोणाला फिकीर नाही. आज जरी मुंबईत रोज सहा ते आठ हजार रुग्ण निघत असले तरी त्यातील ९० टक्के लोक कमी लक्षणांचे आहेत. त्यांना हॉस्पिटलची गरज नाही, मात्र जसे रुग्ण वाढत जातील तशी लोकांमध्ये भीती वाढत जाईल. ही वाढती भीतीच जीवघेणी ठरणारी आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी या आजाराची वाढ कशी होईल हे स्पष्ट केले आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या २ लाखांपर्यंत जाईल. ज्या दिवशी ८० लाख रुग्णसंख्या होईल त्या दिवशी १ टक्का लोक मृत्यूमुखी पडतील, असे गृहीत धरले तरी मरणाऱ्यांची संख्या ८० हजार होईल. ही आकडेवारी काहीशी भीतिदायक असली तरी त्याची कारणे शोधली तर त्यातील वास्तव लक्षात येईल.
मुंबईत १९ डिसेंबर रोजी ३३६ रुग्ण होते. ही संख्या २ जानेवारी रोजी ८०३६ झाली आहे. १५ दिवसात जर हा वेग असेल तर येणाऱ्या काळात ही संख्या गुणाकार पध्दतीने वाढत जाईल. त्यातून रुग्णांमध्ये भीती निर्माण होईल. ही भीतीच येणाऱ्या काळात जीवघेणी ठरेल. त्याचेही कारण साधे सरळ आहे. जसजशी रुग्णसंख्या वाढत जाईल तशी लोकांमधील अस्वस्थता वाढीस लागेल.
प्रत्येकाला दवाखान्यात जावे वाटेल. वरपर्यंत पोहोच असणारे किंवा पैसेवाले ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड अडवून ठेवतील. खासगी हॉस्पिटलमध्ये अशांचा भरणा होईल आणि ज्यांना खरोखरच गरज आहे अशांना ना ऑक्सिजन मिळेल, ना व्हेंटिलेटर. कारण मुळातच या साधनांची संख्या आजही मर्यादित आहे. त्यामुळे ही भीतीच येत्या काळात रुग्ण वेगाने वाढल्यास जीवघेणारी ठरेल.
हे टाळायचे असेल तर प्रत्येकाने खाडकन भानावर आले पाहिजे. स्वत:ची नाही तर निदान आपल्यावर अवलंबून असणाऱ्या आई, बाप, मुलाबाळांच्या काळजीपोटी का होईना, मास्क लावला पाहिजे. गरज नसेल तर फिरणे थांबवले पाहिजे. विनाकारण बोंबलत वाट्टेल तेथे विनामास्क फिरणाऱ्यांना पोलिसांनी फटके हाणले पाहिजेत. जे लोक प्रामाणिकपणे नियम पाळत आहेत त्यांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार या मूठभर टारगटांना बिलकूल मिळू नये.
यासाठी आपणही अशा लोकांना दिसेल तेथे टोकले पाहिजे. खडसावून जाब विचारला पाहिजे. त्यांचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकले पाहिजेत. जे नेते विनामास्क फिरत आहेत त्यांचेही फोटो ‘#नियमांचीएैशीतैशी’ असे लिहून व्हायरल केले पाहिजेत तर आणि तरच कोरोनाचा खात्मा होईल. अन्यथा, हे दुष्टचक्र थांबणे महाकठीण आहे.