‘रात्रीच्या राजा’च्या डोक्यावर कोरोनाचा उपाशी बोजा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 06:44 AM2020-09-22T06:44:19+5:302020-09-22T06:45:11+5:30
कोरोना महामारीत सरकारने लोककलावंतांना कुठलीही मदत केली नाही. याच्या निषेधार्थ तमाशाची पंढरी समजल्या जाणाºया नारायणगाव (जि. पुणे) येथे तमाशा कलावंतांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
- सुधीर लंके । आवृत्तीप्रमुख, लोकमत, अहमदनगर
‘बाजार मोठा, लवकर गाठा’ असे सांगत बिगीबिगीने बाजाराला निघणाऱ्या तमाशातील गवळणींच्या रोजगाराची वाट यावर्षी कोरोना महामारीने रोखली. मात्र, एरव्ही फेटे, पागोटे वर करून या कलेची मजा लुटणाऱ्यांनी व राजसत्ता चालविणाºयांनीही या कलावंतांची कोरोनाकाळातील दशा अद्याप समजावून घेतलेली नाही. गावोगावच्या जत्रा आणि उरुसच यावर्षी लॉकडाऊनमुळे बंद झाले. परिणामी राज्यातील एकाही तमाशा फडाला खेळ करता आला नाही. पश्चिम महाराष्टÑात तमाशा ठप्प झाला, तसा कोकणात दशावतार आणि विदर्भात खडी गंमत. एवढेच नव्हे जागरण गोंधळ, भारूड, पोवाडे, आंबेडकरी जलसे या कला सादर करणाºया कलावंतांसोबत वासुदेव, पोतराज, नंदिवाले, गारूडी, डोंबारी या आणि इतर भटक्या कलावंतांचीही उपासमार झाली. मात्र, केंद्र अथवा राज्याचे कुठलेही पॅकेज या कलावंतांबाबत कोरडेठाक आहे.
कोरोना महामारीत सरकारने लोककलावंतांना कुठलीही मदत केली नाही. याच्या निषेधार्थ तमाशाची पंढरी समजल्या जाणाºया नारायणगाव (जि. पुणे) येथे तमाशा कलावंतांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. महाराष्टÑ राज्य तमाशा फडमालक कलावंत विकास मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या उपस्थितीत हे उपोषण झाले. तमाशा ही महाराष्टÑाची लोककला समजली जाते. मात्र, या कलेची एवढी वाताहात झाली की आजमितीला राज्यात छोटे-मोठे मिळून १३४च्या आसपासच तमाशा फड जिवंत आहेत. यातही मोठे केवळ १२ फड आहेत, असा तमाशाचे अभ्यासक डॉ. संतोष खेडलेकर यांचा दावा आहे. मोठ्या तमाशा फडात ९० ते १०० तर लहान फडात २० ते २५ कलाकार असतात. राज्यात आजमितीला हे पाच ते सहा हजार कलावंत असतील. दसरा ते अक्षय्यतृतीया या काळात २२५ दिवस तमाशा फड गावोगावी जातात. ग्रामीण भागात आजही लोकानुरंजनाचे हे प्रभावी साधन मानले जाते. मात्र यावर्षी एकाही तमाशा फडाला यात्रेची सुपारी मिळालेली नाही. ‘आम्ही गावांचे मनोरंजन करतो. मात्र, दरवर्षी आम्ही ज्या गावात जातो त्या गावांनीदेखील आम्हाला कोरोनाकाळात पैशांची मदत केली नाही. काही गावांनी मदत दिली, मात्र ती पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाची सुपारी म्हणून’ अशी खेडकर यांची खंत आहे.
हेच दु:ख कोकणात दशावतार या लोककलेच्या वाट्याला आले आहे. कार्तिक पौर्णिमा ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोकणात दशावतारचे प्रयोग गावोगावी होतात. विविध पौराणिक पात्रांचे रूप धारण करत हे कलाकार पौराणिक कथा सादर करत मनोरंजन करतात. एका कंपनीत वीस कलावंत असतात. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दशावतारच्या सुमारे चाळीस कंपन्या आहेत. हे आठशे कलावंत कोरोनामुळे घरी बसून आहेत. ‘रात्रीचा राजा, सकाळी डोक्यावर बोजा’ अशी या कलाकारांची एरव्हीदेखील व्यथा असते. म्हणजे रात्री राजाचे पात्र करणारा दशावतारी कलाकार सकाळी डोक्यावर दशावतारांचा पेटारा घेऊन पुढील गावी मार्गस्थ झालेला असतो. या कलावंतांना कोरोनाच्या काळात सरकारने काहीच मदत केलेली नाही, अशी दशावतारी कलावंत दादा राणे कोनस्कर व पार्सेकर दशावतारी कंपनीचे मालक प्रभाकर पार्सेकर यांची खंत आहे. काही राजकीय पक्षांनी मदत केली, मात्र ती जुजबी स्वरूपात. विदर्भातही खडी गंमत सादर करणारे कलावंत बेरोजगार झाले आहेत.
लग्नसमारंभात सनई, संबळ, पिपाणी वाजवत किंवा आधुनिक बँड पथक स्थापन करून पोट भरणाºया कलावंतांवरही संक्रांत आली. कला केंद्र चालविणाºया कलाकारांचा व्यवसायही ठप्प आहे. त्यांनाही मदत नाही. पंतप्रधानांनी ‘लोकलसाठी व्होकल’ असा नारा दिला. राज्यानेही मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमातून व्यवसायासाठी अर्थसाहाय्य करणारी योजना आणली. मात्र, या योजनांमध्ये लोककला हेदेखील रोजगाराचे साधन आहे, त्यासाठी कर्ज दिले जावे, हा विचारच कोठे दिसत नाही. परिणामी तमाशा, दशावतार या कंपन्यांना अथवा कलावंतांना बँका दारात उभे करत नाहीत. सरकारचे या कलावंतांसाठी खास असे महामंडळही नाही. काही पॅकेजेस सरकारने पूर्वी दिली, मात्र ती कलावंतांऐवजी कंपन्यांना दिली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी तमाशा कलावंतांसाठी जीवनगौरव पुरस्कार सुरू केला. पहिला जीवनगौरव पुरस्कार देण्यासाठी ते स्वत: उपस्थित होते. तमाशा महोत्सव, तमाशा पॅकेज त्यांनी सुरू केले. त्यांच्यासारखी सांस्कृतिकदृष्टी कुणी दाखवली नाही, अशी या कलाकारांची भावना आहे. योगायोगाने त्यांचे पुत्र अमित देशमुख हेच सध्या सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत.. ते या कलावंतांची वाट मोकळी करतील का?