coronavirus: लॉकडाऊननंतर सिनेसृष्टीच्या उभारीसाठी गाळावा लागणार घाम
By अजय परचुरे | Published: May 15, 2020 01:07 AM2020-05-15T01:07:08+5:302020-05-15T01:08:23+5:30
कोरोनाचं संकट भारतात आल्यावर सर्वांत प्रथम बंद झाले ते मॉल व चित्रपटगृहे. त्यामुळे या चित्रपटगृहांत चालणाºया करोडो रुपयांच्या सिनेमांचे शूटिंगही अनिश्चित काळासाठी संपूर्णपणे ठप्प झाले आहे.
- अजय परचुरे
(वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, मुंबई)
कोरोनाचं संकट भारताच्या मानगुटीवर असं काही घट्ट बसलं आहे की, प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही हे संकट निवळायचं नाव घेत नाहीय. सरकारी आघाड्यांवर सर्वतोपरी प्रयत्न जरी सुरू असले, तरी दिवसेंदिवस परिस्थिती मात्र हाताबाहेर जात आहे. यात भारतातील छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांना कोरोनारूपी महारोगाचा चांगलाच फटका बसला आहे. लॉकडाऊनरूपी क्रिया संपल्यानंतर या उद्योगधंद्यांचे वारू किनाऱ्याला लागतील की नाही, याबद्दल साशंकता निर्माण होऊ लागली आहे.
कोरोनाचं संकट भारतात आल्यावर सर्वांत प्रथम बंद झाले ते मॉल व चित्रपटगृहे. त्यामुळे या चित्रपटगृहांत चालणाºया करोडो रुपयांच्या सिनेमांचे शूटिंगही अनिश्चित काळासाठी संपूर्णपणे ठप्प झाले आहे. लॉकडाऊनचा काळ वाढतच चालल्याने बॉलिवूडसह भारतातील सर्व प्रादेशिक चित्रपटसृष्टीचे दिवसागणिक नुकसान वाढतच चालले आहे. शूटिंग पुन्हा कधी सुरू होईल? लॉकडाऊन कधी संपेल? चित्रपटगृहे सुरू होतील का? या प्रश्नांची उत्तरं मिळतच नसल्याने होणाºया नुकसानीकडे आ वासून पाहण्याच्या पलीकडे या इंडस्ट्रीला सध्या तरी काही पर्याय दिसत नाही.
१९ मार्चपासून बॉलिवूड इंडस्ट्री पूर्ण ठप्प आहे. चित्रपटच नव्हे, तर छोट्या पडद्यासाठी आणि वेबसाठी बनविल्या जाणाºया मालिकांचं शूटिंगही पूर्ण बंद आहे. त्यातच लॉकडाऊन कालावधीत वाढ झाल्याने फिल्म इंडस्ट्रीला होणाºया नुकसानीचा आकडा हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे. लॉकडाऊन जाहीर झालं तेव्हा ३१ मार्चपर्यंत चित्रपटसृष्टी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी या कालावधीत ७५० ते ८०० कोटींचं नुकसान होईल, असा अंदाज होता; पण आता लॉकडाऊनचा कालावधी दोन महिन्यांच्या जवळपास आल्याने चित्रपटसृष्टीचं नुकसान सुमारे २५०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हे लॉकडाऊन जर जूनपर्यंत गेलं, तर हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणू आणि त्यामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे फिल्म इंडस्ट्रीला प्रामुख्याने दोन-तीन प्रकारचे नुकसान होणार आहे. पहिले म्हणजे शूटिंग पूर्ण बंद आहे. त्यामुळे संबंधित सर्वच घटकांचे मोठे नुकसान होत आहे. दुसरे म्हणजे जे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत; पण त्यांचं प्रदर्शन होऊ शकत नाही, अशा परिस्थितीत निर्मात्यांनी गुंतविलेल्या पैशांचा परतावा होणार नाही व कर्जावरील व्याज मात्र वाढत जाईल. याशिवाय जे चित्रपट अजूनही पूर्ण व्हायचे आहेत, त्यांनी गुंतविलेल्या पैशांचा परतावा लवकर मिळणार नाही आणि घेतलेल्या कर्जावर व्याजही वाढत जाणार आहे.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बॉक्स आॅफिस पूर्ण बंद असल्याने प्रचंड नुकसान होत आहे. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहे सुरू करायला वेळ लागेल. चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतरही प्रेक्षक लगेचच चित्रपटगृहांत येण्याची शक्यता कमी आहे. कारण, कोरोनाची भीती त्यांच्या मनात सतावत असणारच. याशिवाय अनेकांचे उत्पन्नाचे साधन बंद आहे. काहीजणांचे कामही जाऊ शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रेक्षक चित्रपटगृहांत येतील की नाहीत, याबाबत साशंकता आहे. एकूणच कोरोनामुळे जे वातावरण तयार झाले आहे, ते पाहता फिल्म इंडस्ट्री मूळ पदावर यायला आणखी बरेच महिने लागतील.
चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून या मनोरंजनसृष्टीला पुन्हा उभारी देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वं आखत आहेत. कोरोनाचा जोर जूनअखेर बंद झाला तर जुलैपासून सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हो, पण याला सरकारी परवानग्या मिळण्याचीही तितकीच गरज आहे. चित्रीकरणाच्या ठिकाणी मोजकी माणसं तैनात ठेवणे. सॅनिटायझर, मास्क यांचा वापर, डॉक्टरांचे पथक तैनात ठेवणे, तसेच आठ तासांच्या वर काम न करणे, असे काही कडक नियम येण्याची शक्यता आहे. भरमसाट सिनेमांची निर्मिती न करता मोजक्याच सिनेमांची निर्मिती करणे क्रम:प्राप्त ठरणार आहे. काही मल्टिप्लेक्स मालकांनीही आपल्या सिनेमागृहांत सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेऊन आसनव्यवस्थेमध्ये बदल करायला सुरुवात केली आहे. याचाच अर्थ भविष्यात चित्रपटगृहांत आसनक्षमता कमी होणार आहे. कमी आसनक्षमतेमुळे तिकिटांचे दरही वाढतील. अशा वेळेत आधीच बिकट अवस्थेत असलेला मराठी सिनेमा कितपत तग धरेल हाही प्रश्न अधोरेखित होणार आहे. यात दक्षिण भारतीय सिनेमाने खूप आधी झेप घेतली आहे. दक्षिणेकडील राज्यांतील राज्यकर्त्यांनी मनोरंजन विश्वातील निर्मात्यांना त्यांच्या रखडलेल्या कामांचं पोस्ट प्रॉडक्शन काम काही निर्बंध पाळून सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्याचप्रकारे काही निर्बंध पाळून सरकारने मुंबईतील चित्रीकरण, पोस्ट प्रॉडक्शनच्या कामांना हळूहळू का होईना परवानगी द्यावी, असा सूर चित्रपटसृष्टीत आळवायला सुरुवात झाली आहे. फक्त सिनेमा, डेलीसोपवर अवलंबून असणारी कलाकार, तंत्रज्ञ, कामगार मंडळी मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांच्याकडे लक्ष देणेही गरजेचं आहे. तेव्हा करोडोंचं नुकसान होत असलेल्या या मनोरंजन विश्वाला वाचविण्यासाठी काही कठोर नियम पाळून त्यांना परत उभं करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करणे अत्यंत निकडीचे झाले आहे.