Coronavirus:...मग असा ठपका ठेवायची वेळ भावी पिढीने आणू नये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:34 PM2020-05-04T23:34:57+5:302020-05-04T23:35:11+5:30
आजच्या स्थितीत आपल्या राजकारणाचे चित्र कसे असायला हवे व त्याच्या मर्यादा कशा ठरवायला हव्यात, हा मोठाच प्रश्न आहे.
डॉ. अश्वनी कुमार
राष्ट्रीय लॉकडाऊनच्या कालावधीत आणखी वाढ केल्यामुळे ‘कोरोना’ देशातून लवकर काढता पाय घेईल, या विषयीच्या आशा मावळल्या आहेत. तसेच राष्ट्रीय चिंताही वाढली असून आता पुढे काय, याविषयी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. अनेक स्थलांतरित कामगार आपली बायको, मुले आणि चीजवस्तूंसह अन्नाविना, डोक्यावर छप्पर नसताना, आरोग्याच्या सुखसोयी नसताना आपल्या घराच्या दिशेने वाटचाल करीत असलेले दिसत आहेत. सुरत आणि मुंबई येथे सरकारकडून पुरेशी काळजी घेत नसल्याबद्दल त्यांनी निषेधही व्यक्त केला.
महामारीमुळे राजकारण संपुष्टात येईल वा लोकशाहीच्या तत्त्वांचा विनाश होईल असे नाही; पण अशा आव्हानांचा सामना करताना रचनात्मक संवाद सुरू करण्याची पंतप्रधानांची जबाबदारी आहे, हेही विसरून चालणार नाही. राष्ट्रीय संवाद सुरू केल्याने सत्तेविषयी संघर्ष सुरू होईल, असे समजण्याचे कारण नाही.
पण तबलिगी जमातच्या काही लोकांनी बेजबाबदार वर्तन केले म्हणून त्या समाजाला सरसकट दोषी ठरवणे योग्य होणार नाही. राज्य सरकारांनी उपेक्षितांसाठी काम करण्याची जबाबदारी घटनेने त्यांच्यावर टाकलेली आहे. अशावेळी विरोधकांचे वर्तनसुद्धा देशाला अस्थिर करणारे नसावे, अशीच कुणीही अपेक्षा करील. सध्याच्या कामात पंतप्रधानांना संशयाचा फायदा मिळू शकतो, हे खरे असले तरीही सर्वच पक्षांनी राजकीय मतभेदांचा त्याग करून या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज व्हावे. यावेळी आपण परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे असून, नव्या जगात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झालो आहोत. अशावेळी आपण भपकेबाज अक्षमता दाखवली किंवा लोभी संधिसाधूपणा केला, असा ठपका ठेवायची वेळ भावी पिढीने आणू नये.
आजच्या स्थितीत आपल्या राजकारणाचे चित्र कसे असायला हवे व त्याच्या मर्यादा कशा ठरवायला हव्यात, हा मोठाच प्रश्न आहे. त्याचा आरंभ अग्रक्रम निश्चित करून करायला हवा आणि निर्णयात झालेल्या चुकांची कबुली देण्याचा प्रांजळपणा दाखवायला हवा. सार्वजनिक आरोग्यासाठी, वैद्यकीय संशोधनासाठी आणि आरोग्यसेवा देणारी व्यवस्था उभारण्यासाठी आपण कमी तरतूद केली, हे मान्यच करायला हवे. तसेच मानवाच्या स्थितीविषयीही संवेदनशीलता बाळगलेली नाही, हेही तितकेच खरे आहे. आपल्या पूर्वजांनी मानवी जीवन कसे परस्परात गुंतलेले आहे, याविषयी जाण ठेवण्याचे जे शहाणपण बाळगले होते त्याला आपण सोडचिठ्ठी दिली. आधुनिकता स्वीकारण्यातच आपण धन्यता मानली.
सध्याची अवस्था पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात झालेला ºहास, मिळून-मिसळून राहण्याच्या तत्त्वांचा केलेला त्याग आणि सामाजिक व वैयक्तिक जीवन यांचा समतोल साधण्यातील अभावामुळे निर्माण झालेली आहे. आपण कौटुंबिक संवाद व मित्रता यांची उपेक्षा केल्यामुळे सध्याचा पेचप्रसंग उभा झाला आहे. अध्यात्माच्या आधारावर मानवता बाळगणाऱ्या या समाजाकडून कर्तव्यावर असणाºया डॉक्टरांवर हल्ले का केले जातात आणि कामावर असलेल्या पोलिसाचा हात तलवारीने छाटून टाकण्याचे धाडस का केले जाते, हा प्रश्न आपण स्वत:ला विचारायला हवा. समाजातील हा विसंवाद दूर करण्याचा आपल्या राजकारणाचा हेतू असायला हवा.
आपण हे वास्तव समजून घेतले पाहिजे आणि टीका करून दोषारोपण करण्याचे टाळायला हवे. कल्याणकारी समाजनिर्मितीच्या दिशेने वाटचालीच्या दृष्टीने आपण राजकारणाचे शुद्धिकरण करून त्याची दिशा ठरवायला हवी. ‘राजकारण्यांच्या असमंजसपणाने विनाश ओढवतो’, असे इतिहासकार कुमारस्वामी यांनी जे विचार व्यक्त केले आहेत, ते लक्षात ठेवायला हवे. आपल्या व्यवस्थेतील उणिवा जाणून घ्यायला हव्यात. आपले अग्रक्रम चुकीचे आहेत आणि भुकेच्या विरोधातील उपाय चुकीच्या गृहितकांवर आधारित असल्याने ही स्थिती ओढवली आहे, हे समजून घ्यायला हवे. आपल्या नेतृत्वाने भविष्याविषयी लोकांच्या मनात आशा निर्माण करायला हव्या व त्याची पूर्तता करण्याची क्षमता दाखवायला हवी.
न्यायपूर्ण समाजनिर्मिती करणे हेच आपले उद्याच्या काळासाठीचे उद्दिष्ट हवे. लोकांच्या दु:खावर फुंकर घालून त्यांना मदत करण्याची भूमिका असायला हवी. आर्थिक क्षमता व सामाजिक न्याय या दोहोंनी हातात हात घालून वाटचाल करायला हवी. सर्वांना समानतेने न्याय लागू व्हायला हवा. हा समाज वृद्धांचे संरक्षण करणारा असावा व व्हेंटिलेटरच्या अभावामुळे जीवन वा मृत्यू यातून निवड करण्याची वेळ व्यक्तीवर येऊ नये, मानवी जीवनाचा सन्मान राखला जावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जे स्वत:च्या प्राणांचे मोल द्यायला तयार असतात त्यांच्या त्यागाविषयी कृतज्ञ असायला हवे.
सध्याच्या आव्हानाला आपण कशाप्रकारे तोंड दिले, याविषयीचे मत पुढील पिढ्या व्यक्त करणार आहेत. तेव्हा पूर्वीच्या घटनांपासून योग्य बोध घेऊन आपण भविष्याच्या दिशेने वाटचाल करायला हवी. त्यासाठी सध्याच्या आव्हानाचा एकजुटीने सामना करायला हवा. त्यातून लोकशाही संस्था मजबूत होईल. लोकांच्या प्रेमाच्या व कृतज्ञतांच्या आधारावरच लोकशाहीची सत्ता उभी असते, हे पंतप्रधानांनी समजून घ्यावे. सध्याच्या पंतप्रधानांनी लोकांना सन्मानाने जगता यावे यासाठी राज्य सरकारांशी व राजकीय नेत्यांशी संवाद साधण्याचे काम केले, ही त्यातल्यात्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल. त्याला लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला. इतिहास घडविण्याची जबाबदारी एखाद्या पुरुषावर वा स्त्रीवर येऊन पडत नाही. मानवतेच्या रक्षणाचा हा लढा सर्वांनी मिळून लढायचा आहे. त्यातून मिळणारे यश साºया जनतेचे सामूहिक यश असेल, हेही विसरून चालणार नाही.
(लेखक सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत)