Coronavirus : बास झाली आता धार्मिक कट्टरता!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 12:42 AM2020-03-25T00:42:27+5:302020-03-25T00:43:09+5:30

coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात या प्रश्नाचे गांभीर्य लोकांसमोर परखडपणे मांडले. या महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी नागरिकांनी काय करायला हवे, हेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले.

Coronavirus: Bass has now become religious bigotry! | Coronavirus : बास झाली आता धार्मिक कट्टरता!

Coronavirus : बास झाली आता धार्मिक कट्टरता!

Next

- पवन के. वर्मा
(राजकीय विश्लेषक)

ज्यावेळी कोरोना महामारीसारखे संकट जगावर उद्भवते तेव्हा ते संकट लोकांना वेगळ्या तºहेने वागायला भाग पाडते. ‘काही बदल करण्याची गरज नाही,’ या भावनेने जुन्या पद्धतीप्रमाणे लोकांनी चालत राहणे हे आत्मघातकीपणाचे ठरू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात या प्रश्नाचे गांभीर्य लोकांसमोर परखडपणे मांडले. या महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी नागरिकांनी काय करायला हवे, हेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले. या प्रयत्नांचा मुख्य गाभा सामाजिक अंतर राखणे हा आहे. व्यवहारात त्याचा अर्थ होतो की लोकांनी मोठ्या समूहात एकत्र येणे किंवा डझनभर लोकांनी एकत्र बसणे हे सध्यातरी टाळायला हवे.

याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. त्यासाठी शाळा, कॉलेजेस, मॉल्स, चित्रपटगृहे आणि काही प्रमाणात सरकारी कार्यालयेसुद्धा बंद करण्यात आली आहेत. बिगर सरकारी संस्थादेखील लोकांनी एकत्र येणे टाळण्यावर भर देत आहेत. त्याला अपवाद फक्त मुस्लिम मौलवींचा आहे. शुक्रवारचा नमाज मशिदीतच व्हायला हवा अशी त्यांची आग्रही भूमिका आहे. दुसरा अपवाद दिल्लीतील शाहीनबाग येथे रस्त्यावर धरणे आंदोलन करणाऱ्या महिलांचा आहे.

मी असे म्हटल्यावर उदारमतवादी विचारांचे लोक मी केवळ मुस्लिम समाजाला टार्गेट केले, असा आरोप करण्याची शक्यता आहे. पण तसे म्हणणे म्हणजे सत्याचा विपर्यास करण्यासारखे आहे. मी जरी हिंदू असलो आणि हिंदू असण्याचा मला अभिमान जरी असला तरी मी सर्व धर्मांच्या आणि संप्रदायांच्या विचारांचा आदर करीत असतो; पण सर्व धर्मांविषयी आदर बाळगणे म्हणजे मी म्हणतो तेच खरे, असा माझा अट्टाहास नाही. त्यामुळे अयोध्या येथे रामनवमीस होणारा मेळा रद्द करण्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नकार देताच मी त्यावर टीकाही केली होती. आता त्यांनीच तो मेळा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने मला हायसे झाले. योगी आदित्यनाथ यांच्यासारखा कडवा हिंदू अनेक वर्षांपासून लोकांमध्ये लोकप्रिय असलेला रामनवमीचा मेळा कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी जर रद्द करतो, तर शाहीनबाग येथे आंदोलन करणाऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घ्यायला काय हरकत आहे? सध्याचे कोरोना विषाणूचे संकट दूर झाल्यावर आपले निषेध आंदोलन त्या महिला पुन्हा सुरू करू शकतात!

तसेच मुस्लिम मौलवींनीसुद्धा आपल्या धार्मिक बांधवांना शुक्रवारचा नमाज मशिदीत एकत्रितपणे करण्याऐवजी प्रत्येकाने आपापल्या घरातच नमाजाचे पठण करावे, असे का सांगू नये? भारतातील महत्त्वाची हिंदू देवालये ज्यात तिरुपती बालाजी, सिद्धिविनायक मंदिर, पुरीचे मंदिर यांचा समावेश होतो, त्यांनी देवालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक तेथे हजारो भाविक दररोज दर्शनासाठी जमा होत असताना श्रद्धाळू लोकांसाठी धार्मिक श्रद्धा आणि रीतिरिवाज महत्त्वाचे असतात, याची मला जाणीव आहे; पण कधी कधी राष्टÑीय आणि आंतरराष्टÑीय संकटाच्या वेळी या श्रद्धाळू लोकांनीही लोकांच्या हितासाठी शहाणपणा दाखवून निर्णय घेण्याची गरज असते. स्वत:च्या धार्मिक पद्धती बदलण्याची लोकांची तयारी नसते, अशावेळी त्या त्या धर्माच्या नेत्यांनी पुढे होऊन विद्यमान परिस्थितीत जो निर्णय योग्य असेल तो घेण्यास लोकांना भाग पाडले पाहिजे.

सी.ए.ए. आणि एन.आर.सी.च्या विरोधासाठी दिल्लीच्या शाहीनबाग येथे आंदोलन करणाºयांना तो अधिकार नक्कीच आहे. घटनेनेच त्यांनी हमी दिली आहे. या आंदोलनाला विकृत वळण देण्याचा जो प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे तो चुकीचा आहे. त्या ठिकाणी आंदोलन करणाºया ज्येष्ठ महिलांचा निर्धार निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. त्यांचे आंदोलन करणे राष्ट्रविरोधी अजिबात नाही. दिल्लीच्या कडक थंडीतही त्यांच्या निर्धाराला बाधा पोहचली नव्हती, पण अशा आंदोलनात जेव्हा मोठ्या संख्येने समाज एकत्र येतो तेव्हा कोरोना विषाणूविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यासमोर धोका निर्माण होतो. कारण त्यांच्या एकत्र येण्याने हा रोग पसरण्याचा धोका जास्त असतो. तेव्हा त्या धोक्याकडे आंदोलनकर्त्यांनी लक्ष द्यायला हवे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हुकूम काढून पन्नासपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. त्या हुकमाचे पालन व्हायला हवे. जामिया मिलिया येथे आंदोलन करणाºयांनी त्या आंदोलनाचे पालन केले आहे. शाहीनबाग येथील आंदोलनकर्त्यांनीही त्यांचे अनुकरण करायला हवे.

सध्याचा काळ धार्मिक ध्रुवीकरणाचा असून सध्याच्या सरकारचे त्यातील योगदान लक्षणीय आहे. पण प्रत्येक गोष्टीकडे धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षतेला विरोध या भूमिकेतून पाहण्याची गरज नाही. धर्मनिरपेक्षतेवर ज्यांना विश्वास आहे त्यांनी ‘मानवतेच्या दृष्टिकोनातून अल्पसंख्याकांनी वागायला हवे,’ हे सांगण्याचे धाडस दाखवायला हवे. राष्टÑपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, ‘मानवनिर्मित धार्मिक, वांशिक आणि प्रादेशिक भेदभावांना न जुमानता कोरोना विषाणू हा हल्ला करीत असतो. सध्या उपस्थित झालेल्या या संकटाच्या वेळी आपण सर्वजण केवळ मानव आहोत, याची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी.’ कारण ‘मानवता परमो धर्म:’ हीच प्रत्येक धर्माची शिकवण आहे. हा मूलभूत धडा सामुदायिक होण्याची गरज आहे.

Web Title: Coronavirus: Bass has now become religious bigotry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.