CoronaVirus : महामारीने स्वत:च्या फेरमूल्यांकनाची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 02:15 AM2020-03-27T02:15:51+5:302020-03-27T05:50:49+5:30
CoronaVirus : इंग्लंडचे प्रमुख सल्लागार सर पॅट्रिक वॉलन्स यांच्या मते, देशातील ६० टक्के लोकांना कोरोनाची बाधा व्हायला हवी, ज्यामुळे भविष्यात अशा रोगाचा सामना करण्याची अंतर्गत शक्ती लोकांमध्ये निर्माण होईल व ते सामूहिकपणे अशा रोगाचा प्रतिकार करण्यास सक्षम बनतील.
- संतोष देसाई
(फ्युचरब्रँंड्स ग्रुप चे एमडी आणि सीईओ)
कोरोना व्हायरससारख्या महामारीमुळे आपण आपल्या आरोग्याकडे कशा तºहेने पाहतो, यातच केवळ बदल होणार नाही तर आपल्या जीवनाविषयीच्या आकलनातही आमूलाग्र बदल होणार आहे. तसेच आपणास अनेक प्रश्नांचा विचार करणे भाग पडणार आहे ज्यावर आपण पूर्वी फारसा विचार केला नव्हता. उदाहरणार्थ, इटलीमध्ये अशी परिस्थिती उद्भवली आहे की, रोग्यांच्या वाढत्या संख्येमुळे तेथील आरोग्याची यंत्रणा अशा टोकाला पोहचली आहे की, डॉक्टरांसमोर कुणास उपचार करून वाचवायचे आणि कुणाला मरू द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी कोणत्या व्यक्तीची समाजाला गरज आहे, कोणाची कुटुंबाला अधिक गरज आहे याचा विचार करून कुणाला अधिक काळ जगवायचे, याचा निर्णय घ्यावा लागत आहे. त्या तुलनेत इंग्लंडमध्ये जो दृष्टिकोन पाहावयास मिळतो त्याचेच अनुकरण बहुतांश राष्ट्रे करू लागली आहेत.
इंग्लंडचे प्रमुख सल्लागार सर पॅट्रिक वॉलन्स यांच्या मते, देशातील ६० टक्के लोकांना कोरोनाची बाधा व्हायला हवी, ज्यामुळे भविष्यात अशा रोगाचा सामना करण्याची अंतर्गत शक्ती लोकांमध्ये निर्माण होईल व ते सामूहिकपणे अशा रोगाचा प्रतिकार करण्यास सक्षम बनतील. आपण कितीही प्रतिबंधात्मक उपाय योजले तरी सध्याची स्थिती आपण टाळू शकत नाही, असा त्यामागचा विचार आहे. संपूर्ण शहराला लॉकडाऊन केल्याने तात्पुरता फायदा दिसून येईल, पण त्यानंतर कोरोना व्हायरसचे पुन्हा जोमाने पुनरागमन होण्याची शक्यता आहे. पण अनेक लोकांना या रोगाची लागण झाली तरच लोक या रोगापासून मुक्त होण्यास सक्षम होतील. त्यानंतर या रोगाची लागण होण्याची क्षमता कमी होईल व त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
पण असा विचार करणे म्हणजे फार मोठ्या धोक्याचा सामना करण्यासारखे आहे. सर्वप्रथम वृद्धांची काळजी घेण्याची आणि जे लोक रोगाला सहज बळी पडू शकतात त्यांच्याकडे लक्ष पुरविण्याची गरज वाटणे स्वाभाविक आहे; पण तसे करण्यात अनेक अडचणी आहेत. वृद्ध माणसे सहसा कुटुंबात वास्तव्य करीत असतात आणि घरातील तरुण मंडळी त्यांच्याकडे लक्ष पुरवीत असतात. तेव्हा त्यांना कुटुंबापासून वेगळे पाडून त्यांचे संरक्षण करणे सोपे नाही. एकदा कोरोना फ्लूची बाधा झाली की त्यानंतर आपले शरीर त्यापासून पुन्हा बाधित होण्यापासून मुक्त राहण्याची क्षमता प्राप्त करते, असेही गृहीत धरले जाते; पण ही बाब वैद्यकीय दृष्टीने सिद्ध झालेली नाही. उलट चीन आणि जपानमध्ये अशा काही केसेस आढळल्या जेथे लागण झालेली व्यक्ती पुन्हा कोरोनाने बाधित झालेली आढळली. तेव्हा हा दृष्टिकोन योग्य होता की चुकीचा होता, हे कालांतराने कळणार आहे.
या रोगावर मात करण्याचे औषध अद्याप गवसलेले नाही त्यामुळे त्या रोगाच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवणे एवढेच आपण सध्या करू शकतो. या व्हायरसवर वाढत्या तापमानाचा काय परिणाम होतो हेही पुरेसे समजलेले नाही. तसेच सध्या जे प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत तेच भविष्यात कामी पडतील हेही ठामपणे सांगता येणार नाही. सध्या लोकांच्या प्रवासावर आणि एकत्र येण्यावर जी बंधने घालण्यात आली आहेत ती उठवल्यावर हा रोग पुन्हा जोमाने उफाळून येईल का? की तो या पृथ्वीवरून कायमचा नाहीसा होईल? या रोगाची चाचणी, त्यावरील उपचार, त्यासाठी हॉस्पिटलध्ये ठेवण्याची गरज आणि रोगी गंभीर झाला तर आवश्यक त्या सोयींची उपलब्धता याविषयी सध्या तरी साशंकताच आहे. या रोगाचा वेगाने होणारा प्रसारही अनाकलनीय आहे. रोगाची लागण झालेल्यांची संख्या प्रत्येक ४-५ दिवसांनी हजारोंच्या प्रमाणात वाढत असते. इटलीमध्ये याचे प्रत्यंतर पाहायला मिळाले. विकास कसा होतो, या कल्पनेपलीकडचे हे सारे दिसून आले. येथे बाधित व्यक्तींची गुणिलेनी वाढ होत आहे.
इतक्या वेगाने रोग जेव्हा पसरतो तेव्हा त्यावरची आपली प्रतिक्रिया त्या प्रमाणात पाहायला मिळत नाही. सध्या अशी स्थिती आहे की, आपण अशावेळी जी कृती साधारणपणे करतो, त्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात कृती करण्याची गरज असते. या महामारीवर नियंत्रण ठेवताना आपले दैनंदिन जीवन कमालीचे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे जी कृती करण्याची गरज आहे असे जेव्हा तज्ज्ञांकडून सांगण्यात येते तेव्हा तशी कृती करताना अनेक राष्ट्रांना संघर्ष करावा लागत आहे. कोरोना व्हायरस सध्या आपल्याला जे शिकवीत आहे ते प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा फारच कमी आहे. त्याच्यावर ताबा मिळवीत असताना आपल्या विकासासाठी आपल्याला अधिक पैसे मोजावे लागत आहेत. पण कोरोना व्हायरस हा काही आकाशातून आलेला नाही. आपल्या कृतीचेच ते फळ आहे. हवामान बदलामुळे जे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्याचाच तोही एक भाग आहे. आपण कृत्रिम बुद्धिमत्तेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत असताना इतर व्हायरस आपल्यावर आक्रमण करून आपल्याला आश्चर्याचा धक्का देत आहेत.
सध्या जो पेचप्रसंग निर्माण झाला आहे त्यामुळे आपल्या ज्ञानाचा पोकळपणा दिसून आला आहे, तसेच आपल्या जीवनाचे क्षणभंगुरत्वही सिद्ध झाले आहे. एका लहानशा विषाणूने आपल्याला आपल्या जीवनासह सगळ्या गोष्टींचा फेरविचार करण्यास भाग पाडले आहे. या महामारीमुळे आपण सर्वच गोष्टींचे पुनर्मूल्यांकन करायला हवे आणि स्वत:साठी नवा मार्ग निश्चित करायला हवा. त्यादृष्टीने पुुढील काही महिने हे कसोटीचे असणार आहेत. या आव्हानानंतर पुढे जे घडेल तेच आपले भवितव्य ठरविणार आहे.