coronavirus: खरंच पोलिसांच्या काठीने कोरोना मरेल...?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 03:54 AM2020-05-14T03:54:24+5:302020-05-14T03:55:05+5:30

कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अजूनतरी अक्सीर इलाज सापडलेला नाही. जगभरातील शेकडो वैज्ञानिक डोळ्यांत तेल घालून कोरोना प्रतिबंधक लस शोधून काढण्याच्या कामात गुंतले आहेत.

coronavirus: Corona will really die with a police stick ...? | coronavirus: खरंच पोलिसांच्या काठीने कोरोना मरेल...?

coronavirus: खरंच पोलिसांच्या काठीने कोरोना मरेल...?

Next

- नंदकिशोर पाटील
(लोकमत, कार्यकारी संपादक)

टिकटॉक नामक एका सोशल मीडिया अ‍ॅपवर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एक मुलगा रस्त्यावर उभा राहून बराच वेळ हातवारे करत असतो. समोरून येणारा एकजण त्याला विचारतो, ‘अरे, असं काय करतोयस?’ त्यावर तो म्हणतो, ‘असे केल्याने कोरोना येत नाही.. कोरोना!’ गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या असेच काहीसे सुरू आहे. कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अजूनतरी अक्सीर इलाज सापडलेला नाही. जगभरातील शेकडो वैज्ञानिक डोळ्यांत तेल घालून कोरोना प्रतिबंधक लस शोधून काढण्याच्या कामात गुंतले आहेत. जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून लस सापडल्याची बातमी येते आणि ती वाचून आपणांस हायसे वाटते; पण आपला हा आनंद क्षणभंगुर ठरतो, कारण लगेच दुसरी बातमी येऊन धडकते, ‘कोरोनावर लस शोधणे कठीण!’ हिवताप, एचआयव्ही या रोगांवर तरी अजून कुठे लस सापडलीय. तरीही जगरहाटी चालूच आहे की! आपणही या नव्या महामारीतून वाचू, अशी दुर्दम्य इच्छाशक्ती असलेली माणसं मग नानाप्रकारचे काढे पिऊन या लॉकडाऊनच्या काळातील एकेक दिवस ढकलत आहेत. मरण हेच अमर आहे, हे वैश्विक सत्य प्लेग, कोरोनासारख्या महामारीतून पुन्हा-पुन्हा अधोरेखीत होत असताना मरणावर विजय मिळविण्याचे प्रयत्न मानवाने थांबविले नाही. मानसिक, आर्थिक वा कौटुंबिक तणावातून होणाºया आत्महत्यादेखील या कोरोना संकटकाळात थांबलेल्या आहेत. यावरून
मानसशास्त्रज्ञांनी काढलेला निष्कर्ष मोठा गमतशीर आहे. त्यांच्या मते, माणसांकडे जशी संकटावर मात करण्याची वृत्ती उपजतच असते; तशी संकट ओढावून घेण्याची मानसिकता फक्त मनुष्यप्राण्यातच असते.
कोविड-१९ ही वैश्विक महामारी असल्याची अधिकृत घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली त्या दिवसापासून या महामारीला रोखण्यासाठी जगभरात जे प्रयत्न सुरू आहेत, ते पाहिल्यानंतर अंधारात चाचपडताना होणारी धडपड आठवते. संगणकक्रांती आणि इंटरनेट नामक महाजालाने जग जोडले गेल्यानंतर माणसं संवादी झाली; पण सामूहिकदृष्ट्या दुरावली गेली. कोरोनाने हा दुरावा अधिकच रुंद केला. त्यातून मग फिजिकल
डिस्टंसिंग आले. माणसांनी माणसांचा संपर्क टाळला, तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो, असं जगभरातील तज्ज्ञ सांगू लागल्यानंतर आपणांस आपल्याच सावलीची भीती वाटू लागली. माणसांची घरकोंडी झाली; पण सतत चार भिंतीआड राहण्याची सवय नसल्याने लॉकडाऊन तोडून माणसं घराबाहेर पडली. काहींना ते अपरिहार्य होते; पण बहुसंख्याकांना पाय मोकळे केल्यावाचून राहवेना झाले आणि तिथूनच पोलिसांची भूमिका सुरू झाली.
तसेही आपल्या देशाला आपत्ती तशी पाचवीला पुजलेली. प्लेग, भूकंप, महापूर आणि त्सुनामीसारख्या विनाशकारी आपत्तींना आपण आजवर तोंड दिलेले आहे. मात्र, कोरोनासारख्या वैश्विक महामारीचा पूर्वानुभव नसल्याने या संकटाचा सामना करताना सगळ्या यंत्रणांचा गोंधळ उडालेला दिसतो. १९९३ साली ओडिसात आलेल्या चक्रीवादळानंतर केंद्र सरकारने नैसर्गिक आणि मानवी आपत्तीच्या धोक्यांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. मात्र एवढे पुरेसे नाही, हे २००४ साली आलेल्या त्सुनामीमुळे उघड झाले. आपत्ती निवारणासाठी राष्टÑीयस्तरावर कायदा करण्याची निकड निर्माण झाली. त्यातूनच मग २५ डिसेंबर २००५ रोजी राष्टÑीय आपत्ती निवारण कायदा झाला. जागतिक पातळीवर देखील आकस्मिक आपत्तींना तोंड देण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. जगभरात एक गोष्ट निश्चित मानली गेली की, आपत्ती आल्यानंतर केल्या गेलेल्या कार्यवाहीपेक्षा धोका कमी करण्यासाठी केलेली कार्यवाही महत्त्वाची असते. कोरोनाच्याबाबतीत हेच सूत्र जगभर लागू करण्यात आले आणि त्यातून फिजिकल डिस्टंसिंग राबविण्यास सुरुवात झाली. परंतु भारतात मात्र हे शारीरिक अंतर पाळले जाते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, त्यांनाच कोरोना रखवालदारांची भूमिका देण्यात आल्याने त्यांची पुरती दमछाक झाली. महाराष्टÑात तब्बल एक हजाराहून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. दुर्दैवाने काही पोलीस कर्मचारी या महामारीचे बळी ठरले. आपणांस पोलिसांची गरज भासते, कारण कोणीतरी दंडुका उगारल्याखेरीस आपण वठणीवरच येत नाही. ज्या चीन, अमेरिका, स्पेन, इटलीत कोरोनाने हाहाकार माजविला, तिथे पोलिसांना ‘कोरोना स्पेशल ड्युटी’ देण्यात आल्याचे दिसून येत नाही. ज्या दिवशी आपण जबाबदार नागरिकांची भूमिका पार पाडू, त्यादिवशी पोलिसिंग थांबेल आणि कोरोनाही हद्दपार होईल!

Web Title: coronavirus: Corona will really die with a police stick ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.