coronavirus: कोरोनावरील उपाय: रोगमुक्त रुग्णाचा रक्तद्रव?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 03:50 AM2020-05-14T03:50:29+5:302020-05-14T03:51:05+5:30
कोरोना हा विषाणू त्यांच्या विषाणू जगात नवा नाही. ‘इन्फ्लुएन्झा’ या रोगाचे विषाणू कोरोना या गटातीलच आहेत पण या विषाणूंमधील अनुवंशिक घटकांमध्ये सातत्याने उत्परिवर्तने म्हणजे म्युटेशन्स होत असतात.
- शरद पांडुरंग काळे
(निवृत्त वैज्ञानिक भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई)
सध्या करोना विषाणूच्या जगभरच्या प्राबल्यामुळे लोक हैराण झाले आहेत. सर्व जगातील व्यवहारदेखील थंडावले आहेत. ‘अत्यावश्यक सेवा’ पुरविणारी मंडळी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपली सेवा देत आहेत. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांसमोर उपासमारीचे संकट आहे. टीचभर पण म्हणता येणार नाही इतक्या छोट्या या सजीव, निर्जिव जगातील दुवा समजला जाणा-या आदिकणांनी समस्त मानवजातीला शरणागत करून सोडले आहे. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी घरातच लपून बसण्याची वेळ मानवावर आली आहे, त्यामुळे निसर्गाचा प्रकोप किती भयानक आहे याची प्रचिती येते.
कोरोना हा विषाणू त्यांच्या विषाणू जगात नवा नाही. ‘इन्फ्लुएन्झा’ या रोगाचे विषाणू कोरोना या गटातीलच आहेत पण या विषाणूंमधील अनुवंशिक घटकांमध्ये सातत्याने उत्परिवर्तने म्हणजे म्युटेशन्स होत असतात. असाच उत्परिवर्तित ‘कोविड १९’ हा विषाणू आता जो कोरोना वेगाने जग व्यापत चालला आहे, त्यासाठी जबाबदार आहे. त्याचेही ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ हे तीन उपगट (स्ट्रेन) असावेत, असे विश्लेषणात्मक अभ्यासाने सुचविले आहे. या विषाणूंच्या रोगजनक कार्यप्रणालीवर अजून फारसा प्रकाश पडला नाही. विविध पेशींकडे आॅक्सिजन वाहून नेणाºया रक्तातील हिमोग्लोबिन या प्रथिनांच्या कामात तो अटकाव करत असला पाहिजे, या निष्कर्षाप्रत संशोधक आले आहेत. या विषाणूंच्या रक्तातील प्रादुर्भावाने शरीरातील प्रतिकारयंत्रणा रक्तात प्रतिद्रव्ये (अँटीबॉडीज) निर्माण करते तसेच शरीरात प्रतिकार प्रथिनांची (इम्युनो ग्लॉब्युलिन्स)ची पण निर्मिती होत असते. कोरोना आजारातून नुकत्याच बºया झालेल्या रुग्णाच्या शरीरात या दोन्ही प्रकारच्या रेणूंची उपलब्धता बऱ्यांपैकी प्रमाणावर असू शकते म्हणून जर या बºया झालेल्या रुग्णांच्या शरीरातील रक्त घेऊन त्यातील पेशी बाजूला करून उरलेला रक्तद्रव औषध म्हणून कोरोनाग्रस्त रुग्णाच्या शरीरात रक्तामध्ये मिसळला तर त्यातील प्रतिद्र्रव्ये आणि प्रतिकार प्रथिन रेणू कोरोना विषाणूंशी लढाई करून त्यांना नेस्तनाबूत करतील या उद्देशाने अमेरिकन संशोधक पथकाने हा प्रयोग हाती घेतला आहे.
कोरोनामधून नुकत्याच बºया झालेल्या रुग्णांच्या शरीरातील रक्तद्रवाचा वापर औषध म्हणून होईल का हे पाहण्यासाठी अमेरिकेतील मेयो क्लिनिक, जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, वॉशिंग्टन विद्यापीठ, आईन्स्टाईन मेडिकल सेंटर आणि इकान स्कूल आॅफ मेडिसीन यासारख्या प्रथितयश संस्थांमधील संशोधकांनी एकत्र येऊन एफ. डी. ए. आणि काही औद्योगिक भागीदारांच्या साहाय्याने प्रयोगांना सुरुवात केली. इंग्लंडमधील राष्ट्रीय आरोग्य सेवेतील संशोधकांनी देखील देशभरातील २३ रक्तपेढ्यांमध्ये बºया झालेल्या कोरोना रुग्णांच्या शरीरातील रक्तद्रव्य गोळा करून त्याच्या वैद्यकीय चाचण्या सुरू केल्या. टाकेडा, सी.एस.एल., बेहरिंग, बायोटेस्ट, मायक्रोसॉफ्ट, आॅकट फॉर्मा, एल.एफ.बी. आणि बायो प्रॉडक्टस या औद्योगिक आस्थापनाही त्यात सामील झाल्या आहेत आणि सामान्यांना सहज उपलब्ध होतील अशी अब्रँड औषध निर्मिती ते करणार आहेत.
ही औषधे पॉलिक्लोनल (विविध प्रकारच्या पेशी समूहांपासून) अँटीबॉडीजवर आधारित असतील. यातील एक प्रथिन ‘हायपर इम्युनोग्लोब्युलिन’ हे असेल आणि बºया झालेल्या अनेक रुग्णांचा रक्तद्रव एकत्रित करून त्यापासून त्याची निर्मिती करण्यात येईल. आणखी एका प्रयोगात गाय किंवा बैल यांच्या शरीरात कृत्रिम गुणसूत्र टाकून तिथे या मानवी प्रतिद्र्रव्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाईल तसेच प्रयोगशाळेतील मानवी पेशी समूहाचा (सेल लाईन्स) वापर ‘सार्स कोव्ह २’ या विषाणूंच्या अनुवंशिक द्रव्याला विरोध करू शकणाºया प्रतिद्रव्यांच्या निर्मितीसाठी करण्यात येईल. पण या जागतिक साथीचा प्रसार जितक्या वेगाने होत आहे त्याच्याशी ह्या प्रयत्नांमधून लढाई हे काळाचेच आव्हान आज आपल्यासमोर आहे. चीनमधील दोन प्रयोगांमध्ये अनुक्रमे ५ आणि १० रुग्णांवर ही उपचारपद्धती वापरली होती, त्यातील पहिल्या प्रयोगातील पाचही रुग्ण ठीक झाले, तर दुसºया प्रयोगात सर्व दहा रुग्ण ठीक झाले होते. त्यादरम्यान त्यांच्यासारखीच स्थिती असलेल्या पण ही उपचारपद्धतीचा वापर होऊ न शकलेल्या दहा रुग्णांपैकी तीन दगावले तर एक बरा झाला आणि बाकीच्या सहा रुग्णांमध्ये काही बदल आढळला नव्हता.
बाल्टिमोर येथील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील रेणवीय सूक्ष्मजीवशास्त्र आणि प्रतिकार विज्ञान शाखेचे प्रमुख डॉ. कॅसाडेव्हील यांच्या मते उपचारांचा हा एकमेव उपलब्ध असलेला पर्याय वापरण्याखेरीज गत्यंतर नाही. कारण रोग अतिशय वेगाने पसरतो आहे. ह्या उपचारपद्धतीमधील जोखीम अगदीच नगण्य स्वरूपाची आहे, मात्र फायदा झाला तर खूप आहे.
ही उपचारपद्धती नेमकी कधी वापरली तर फायदा होईल? रोगाची लक्षणे दिसू लागली आणि निदान झाले की लगेचच रक्तद्र्रव उपचारप्रणाली वापरली तर तिचा नक्कीच फायदा होईल, पण वूहानमधील प्रयोगांमध्ये रोगाच्या अतिप्रगत अवस्थेतदेखील या उपचारांचा फायदा झाला होता. सन २००२-०४ मध्ये आलेल्या ‘सार्स’च्या साथीतदेखील असा रक्तद्रव्याचा वापर मर्यादित स्वरूपात केला गेला होता आणि तो यशस्वी झाला होता; पण नंतर ती साथच संपली! अमेरिकेत दि. ३० एप्रिल २०२० पर्यंत ७७७४ रुग्णांनी या उपचारपद्धतीसाठी होकार दर्शविला होता आणि त्यातील ३८०९ रुग्णांना हे उपचार दिले गेले आहेत. यातील एक अडचण अशी असेल की बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा प्रत्यक्ष रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. या सर्व रुग्णांसाठी असे रक्तद्र्रव्य पुरेसे होईल का? त्यासाठी अधिकाधिक रुग्ण बरे व्हायची वाट पाहावी लागेल. शिवाय बरे झालेले सारेच रुग्ण रक्तदान करण्यासाठी पात्र असतील का हाही प्रश्न आहे. रक्तद्रव्य गोळा करताना त्यात रोगजंतू नाहीत याची खात्री करून घ्यावी लागेल नाहीतर रोगापेक्षा उपचार भयंकर ठरायचे!
sharadkale@gmail.com