Coronavirus: मध्यमवर्ग आणि महिलांना कोरोनाचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 12:14 AM2021-04-27T00:14:06+5:302021-04-27T00:14:13+5:30

कोरोनाकाळात श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, उच्च मध्यमवर्ग मध्यम वर्गात, तर मध्यमवर्ग खाली दारिद्र्यात ढकलला जात आहे!

Coronavirus: Coronavirus strikes middle class and women | Coronavirus: मध्यमवर्ग आणि महिलांना कोरोनाचा तडाखा

Coronavirus: मध्यमवर्ग आणि महिलांना कोरोनाचा तडाखा

Next

- राही भिडे

कोरोनाची दुसरी लाट सध्या जोरात आहे. या लाटेचा नकारात्मक परिणाम भांडवली बाजारासह अन्य क्षेत्रावरही होत आहे. त्यामुळे ‘आहे रे आणि नाही रे ‘ वर्गातील दरी रुंदावते आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, उच्च मध्यमवर्ग मध्यम वर्गात जातो आहे आणि मध्यमवर्ग दारिद्र्यात ढकलला जात आहे. गरीब आणि दारिद्र्यरेषेखालच्या नागरिकांची संख्या वाढत असली, तरी सर्वात वाईट परिस्थिती मध्यमवर्गाची आणि महिलांची झाली आहे.

पहिल्या लाटेच्या वेळी संपूर्ण देशभर टाळेबंदी होती. आता महाराष्ट्रासह काही राज्ये मर्यादित टाळेबंदीच्या नावाखाली कडक निर्बंध लावत आहेत. कोरोनाच्या विळख्यात गरीब अधिक अडकले. सरकारी योजनांतून कोरोनावर उपचार केले जात नाहीत. ज्यांना विमाकवच आहे, त्यांच्यावरही कॅशलेस उपचार केले जात नाही. त्यामुळे अनेकांवर घर-दार, जमीन-जुमला, दागिने विकायचा प्रसंग येतो आहे. 
 या महासाथीच्या तडाख्यात भारतातील सुमारे तीन कोटी २० लाख लोक मध्यम वर्गातून बाहेर फेकले गेल्याचा अहवाल अमेरिकास्थित ‘प्यू रिसर्च सेंटर’ने प्रसिद्ध केला आहे.

कोरोना महासाथीत नोकरी जाणे, वेतन कपात होणे, इंधन दरवाढ, महागाई तसेच व्यवसाय बंद करावा लागल्याने मध्यम वर्गाला तडाखा बसला.  गरिबांच्या लोकसंख्येत सात कोटी ५० लाखांची भर पडल्याचेही हा अहवाल सांगतो. भारतात ८६ टक्के पुरुषांची आणि ९४ टक्के महिलांची मासिक कमाई दहा हजार रुपयांपेक्षा कमी आहे. शिक्षण आणि आरोग्यावर आपण सुमारे १.२५ टक्के खर्च करतो. ४० टक्क्यांपेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. दरवर्षी लाखो लोकांना गंभीर आजारांसाठी औषधे घेण्यास पैसे नसतात, ते अधिक गरीब बनतात. जगातील सर्वांत गरीब देशांपैकी २६ देशांपेक्षा भारतात आठ राज्यांमध्ये सर्वांत गरीब राहातात.

कोरोनामुळे औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन कमी झाले. बाजारपेठा बंद असल्यामुळे अत्यावश्यक आणि गरजेच्या वस्तूंशिवाय दुसरे काही खरेदी केले जात नाही. अशावेळी आर्थिक उतरंडीवर अगदी शेवटच्या, हातावर पोट असलेल्या व्यक्तीला त्याची झळ टाळेबंदी सुरू होताक्षणीच बसली. गेल्या महिन्यांत बेरोजगारीचा दर आठ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. बेरोजगारी आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे. सरकारचेही आर्थिक स्रोत आटू लागले आहेत. थांबलेले अर्थचक्र गतिमान करण्यासाठी बराच वेळ खर्ची करावा लागेल आणि याच वेळेत आर्थिक विषमता वाढत जाईल. 

कोविडच्या साथीचा महिलांवर झालेला परिणाम हा पुरुषांहून कितीतरी पटीने अधिक आहे.  रोजगार, आरोग्य आणि सुरक्षा या बाबतीत त्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. अर्थचक्राला पुन्हा गती मिळत असताना, महिलांनी गमावलेले रोजगार त्यांना पुन्हा  मिळणे कठीण झाले आहे. कोविड कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी वेढलेल्या महिलांना कामावर जाणेही अवघड होऊन बसले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली, तर अर्धी लोकसंख्या कामाविना राहील आणि देशाची उत्पादकता कमी होईल.

‘फोर्ब्स’च्या अहवालानुसार भारतात एकूण अब्जाधीशांची संख्या १४० आहे. मागील वर्षी ती १०२ होती. या सर्व अब्जाधीशांची एकूण संपत्ती सुमारे ४४.२८ लाख कोटी रुपये आहे. या अब्जाधीशांमध्ये तीन अब्जाधीशांची एकूण संपत्ती या १४० अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीपैकी २५ टक्के आहे. त्यामध्ये अंबानी आणि अदानी यांचा समावेश आहे. या अब्जाधीशांपैकी २४ अब्जाधीशांनी कोरोना साथीच्या काळात आरोग्यसेवा क्षेत्रात सर्वाधिक कमाई केली. कोरोनाने श्रीमंतांना अतिश्रीमंत करण्याचा सपाटा लावलाय, मध्यमवर्गातले लोक मात्र खाली ढकलले जात  आहेत!

बऱ्याच अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे, की कोरोनाच्या लाटेत बड्या भांडवलदारांचा नफा वाढला आहे. त्यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाच्या नावाने अनेक लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले.  जे आधीपासून कामगार होते, त्यांचे वेतन कमी झाल्यामुळे भांडवलदारांना फायदा झाला. भारतातील गरीब- श्रीमंतांमधली दरी कोरोनाने आणखीच रुंद केली आहे!  संकटकाळात आर्थिक विषमता वाढीला लागते, असे डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद करून ठेवले होते... त्यांचे शब्द आज खरे होताना दिसत आहेत! 
 

Web Title: Coronavirus: Coronavirus strikes middle class and women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.