CoronaVirus : 'लढाई', 'युद्ध' वगैरे डोक्यातून काढून टाका; कोरोनाला टाळता येत नसेल तर किमान अंगावर घेऊ नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 05:24 AM2021-04-17T05:24:10+5:302021-04-17T05:24:42+5:30
CoronaVirus: ‘कोरोनाविरुद्ध लढाई’ करून कोणाला हरवायचंय आपल्याला? ते लढाईचं आधी डोक्यातून काढून टाका, कारण या भीतीमध्ये एक संधी आहे!
- डॉ. मोहन आगाशे
(ख्यातनाम कलावंत, ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ)
कोविडचे थैमान सुरू झाल्यापासून सगळ्यांच्या मनात भीतीचे श्वापद आहे..?
कोविडची भीती का तर ते आपण जन्ममरणाशी निगडित केलंय. मरणाची भीती जिंकली नाही तर आपण काहीच करू शकणार नाही. म. गांधींनी दक्षिण आफ्रिकेत सगळ्यात पहिल्यांदा अन्यायाविरोधात आवाज उठवला तेव्हा एक जण म्हणाला, ‘पटतंय मला. मी या कारणासाठी मरायला तयार आहे.’ गांधींना तेच हवं होतं; मारायला नव्हे, मरायला तयार असलेले लोक! स्वत:च्या मरणाची भीती वाटते तो दुसऱ्याला समजवायला नाही, मारायला तयार होतो. भीतीतून तुम्ही फक्त स्वत:चा विचार करता. आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य हे की ती आपल्याला स्वत:च्या पलीकडं नेते. पूर्वी शिक्षण आणि वैद्यक याचे पैसे घ्यायला तत्त्वत: मनाई होती. आणि अशा व्यवस्थांचं रक्षण करणं ही समाजाची जबाबदारी असायची. जीवनाला शिक्षण व आरोग्यामुळं अर्थ लाभतो. त्या अर्थातून आपण समाजाशी, मुळात निसर्गाशी अधिक जोडले जातो. याचाच विसर पडल्यामुळं निसर्ग बिथरलाय. निसर्गाशी तादात्म्य पावायचं सोडून बुद्धिवादी अहंमन्य माणूस त्याला ‘हरवायला’ निघालाय. घर, गाड्या, आयुर्मान अशी प्रत्येक गोष्ट त्याला जास्त हवीय. हा हावरटपणा आत्मकेंद्रितता वाढवतो. म्हणून भीती वाटते. तिचं मूळ प्रत्येकानं आपल्या पातळीवर शोधायला हवं.
भीतीचं हिलिंग कसं करायचं?
विज्ञानाच्या प्रगतीनं माणसाचं आयुर्मान वाढलं, पण दिवसेंदिवस त्याच्यातलं नि निसर्गातलं अंतर वाढत गेलं. भूकंप, त्सुनामी, जागतिक तापमान बदलामुळं ढळलेलं ऋतुचक्र यातून निसर्ग सतत या असमतोलाचा संदेश देतो आहे. ऐकण्यासाठी आपले कान, मन तयार नाहीत. मग, आता हा व्हायरस आला. ‘कोरोनाविरोधातली लढाई’ असं म्हणत माध्यमांनी चित्र रंगवलं या साथीचं. हे युद्ध नव्हे की कुणालातरी हरवून जिंकायचं! ते लढाईचं डोक्यातून काढून टाकू आपण तर बरं! निसर्ग आणि मानव यांनी हातात हात घालून चालावं व त्यातून जे घडू शकेल त्याला प्रगती म्हणावं. मुळात संपूर्णपणे निरोगी आपण आयुष्यात कधीही नसतो. तो एक युटोपिया आहे. या सगळ्यांवर विचार करायची संधी आत्ता लॉकडाऊनमुळे मिळालीय, ती घेतली की भीती उरणार नाही. घरात पाहुणे आले की त्यांचं हवंनको बघून आपण त्यांची बोळवण करतो. तसं कोरोनाला टाळता येत नसेल तर किमान अंगावर घेऊ नये, आपण. यश म्हणजे नेमकं काय यावर विचार करायची उसंत आपण घेतली नाही. आता मिळालेल्या विरामाचा उपयोग करू या! आयुष्याचा दर्जा मरण पुढे ढकलण्यात नसून आयुष्य अर्थपूर्ण करण्यात आहे. ‘दिल मांगे मोअर’ हे जे धृपद होऊन बसलंय तिथं चॅलेंज दिलं जावं. माहितीच्या स्फोटामुळं अज्ञानाचं सुख गेलं. भीती व ज्ञान या दोहोंतली भीती प्रबळ झाली. कारण कुठल्या माहितीत सच्चेपणा आहे हे ठरवणं कठीण झालं. चोहोबाजूंनी घेरत चाललेला हावरटपणा कमी करून आपण नक्की काय करतो आहोत हे समजून घेण्यासाठी एकाग्र झालो तर भीती राहाणार नाही. आणि काही प्रश्नांची उत्तरं अनुभवात असतात, शब्दांत नव्हे, हे आहेच!
‘टू कन्सिडर पेशंट अॅज ए पार्टनर इन ट्रीटमेंट’ असं म्हणता तुम्ही पण आता ते बदलतंय...
कारण डॉक्टर्स कॉर्पोरेट सिस्टीमचे गुलाम झालेत. स्वत:ला पटतात ते निर्णय घेण्याची परवानगी त्यांना नाही. ती व्यावसायिकांची मक्तेदारी झालीय. ते नफ्याचा विचार करून धोरणं आखणार. ज्या व्यवस्था आपली काळजी घेतात त्यांची काळजी समाजानं घ्यायची हे बंध आपल्या जगण्यात पूर्वी होते. ‘मास्क घातला नाही तर पाचशे नव्हे पाच हजार दंड करू!’ हे काय? कशाही गोष्टींचे पैसे करायचे या विचारसरणीनं गोंधळ वाढतो. अपराधभाव कमी होत जातो. नियमांचं भ्रष्टाचारमुक्त अवलंबन होत नसतं तेव्हा पैसा हीच सत्ता होते. जगण्याची मूलभूत मूल्यं देणारं शिक्षण नाहीसं झालं तेव्हा विवेकबुद्धीही गेली. ती गेली की भीती वाटणारच.
मनाच्या आरोग्यासाठी ‘माईंड जीम’ काढायची कल्पना होती तुमची...
शरीर बळकट करण्यासाठी आपण व्यायाम करतो, पण मनाचं काय? शरीर ‘मॅटर’ आहे, ते त्या नियमांना जागणार, नष्ट होणार. वाद्य जातं, संगीत टिकतं. गीतेतही तेच सांगितलं आहे. आई माझ्यासाठी स्वयंपाक करते व मी मन लावून जेवतो तेव्हा जास्त आनंद तिला होतो. स्वत:च्या आनंदात दुसऱ्याचा सहज सहभाग या गोष्टी अॅब्स्ट्रॅक्ट आहेत. हा आनंद रोकडा पैसा खर्च करून मिळत नाही. आपण जे खातो यावर शरीराची वाढ ठरते तसंच आपण माणसांशी कसे वागतो, ती आपल्याशी कशी वागतात, आपण जे वाचतो, ऐकतो या सगळ्यांची गोळाबेरीज हे मनाचं खाद्य. साहित्य नि कला ही प्रोटीन्स. त्यातून विवेकनिष्ठ निर्णय होतात. स्वत:च्या मनाला असा रियाझ देणं अधिकच गरजेचं होऊन बसलंय. जगणं व त्यात अर्थ आणणं त्यातून साधेल.
मुलाखत : सोनाली नवांगुळ