coronavirus: अग्रलेख - लॉकडाऊनचे डोहाळे थांबवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 07:23 AM2021-03-29T07:23:07+5:302021-03-29T07:24:24+5:30
coronavirus : संपूर्ण देशाला हा प्रश्न पडलाय, की केवळ महाराष्ट्रातच इतक्या प्रचंड प्रमाणात रुग्ण का सापडत आहेत? पश्चिम बंगाल, तामिळनाडू या मोठ्या राज्यांसह केरळ, आसाम, पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकीची धुमाळी सुरू आहे. हजारो, लाखोंच्या जाहीर सभा होताहेत. तिथे रुग्णांचे प्रमाण नसल्यासारखे आहे.
सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडिओत खेड्यातला सामान्य माणूस कोरोना विषाणूचे संक्रमण आटोक्यात आणण्याचा उपाय सांगतो - देशात सगळीकडे एकावेळी निवडणूक जाहीर करून टाका. व्हायरस निवडणुकीत येतच नाही. तो बिहार निवडणुकीत आला नाही आणि पाच राज्यांच्या निवडणुकांमध्येही दिसत नाही. यातील गमतीचा भाग सोडा; पण संपूर्ण देशाला हा प्रश्न पडलाय, की केवळ महाराष्ट्रातच इतक्या प्रचंड प्रमाणात रुग्ण का सापडत आहेत? पश्चिम बंगाल, तामिळनाडू या मोठ्या राज्यांसह केरळ, आसाम, पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकीची धुमाळी सुरू आहे. हजारो, लाखोंच्या जाहीर सभा होताहेत. तिथे रुग्णांचे प्रमाण नसल्यासारखे आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात चाचण्या अधिक होतात किंवा महाराष्ट्र अधिक शहरी लोकसंख्येचे राज्य आहे, अन्य राज्ये व विदेशाशी अधिक संपर्क असलेले संपन्न, पुढारलेले राज्य आहे, हा यावरील युक्तिवाद म्हणजे स्वत:चीच फसवणूक केल्यासारखे आहे. तामिळनाडूत महाराष्ट्रापेक्षा अधिक नागरीकरण आहे. केरळचा परदेशांशी संपर्क अधिक आहे आणि मुंबईप्रमाणेच कोलकत्यातही पोट भरण्यासाठी आलेल्या परप्रांतीयांची संख्या मोठी आहे. शहरी लोकसंख्या हेच कोरोना विस्फोटाचे कारण असेल तर बुलडाण्यासारख्या ग्रामीण जिल्ह्यातील रोजच्या सरासरी हजार रुग्णांमागे काय कारण आहे?
कोविड-१९ विषाणूच्या संक्रमणाची दुसरी लाट पहिलीपेक्षा अधिक दाहक आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये पहिला उद्रेक टोकाला पोहोचलेला होता. तेव्हाचे बाधित व मृत्यूचे आकडे आता मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव आदी शहरांनी कधीच मागे टाकले आहेत. मृत्यूही वाढत आहेत आणि त्या त्या शहर, जिल्ह्याचे प्रशासन तसेच राज्य सरकार एका मागोमाग एका ठिकाणी लॉकडाऊन लावून, टाळेबंदी करून या उद्रेकाला अटकाव करू पाहात आहे. लोकांना कडक शिस्त लावण्याऐवजी लॉकडाऊनचे कागदी घोडे नाचविले जात आहेत. लॉकडाऊन हा उपाय नाही, असे म्हणायचे व प्रशासकीय अपयश लपविण्यासाठी तोच अतिरेकी उपाय अंमलात आणायचा, असा विरोधाभास आहे. लाॅकडाऊनमुळे कोरोना विषाणूचे संक्रमण थांबत नाही, हे नागपूर शहरातील १५ मार्चपासूनच्या लॉकडाऊनने स्पष्ट झाले आहे. त्याआधी अमरावती शहर असेच बंद ठेवण्यात आले. त्याचाही फारसा परिणाम झाला नाही. अकोल्यात त्यामुळे निर्णय बदलावा लागला. तरीही औरंगाबादला लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. लोकही आता लॉकडाऊनला जुमानत नाहीत. ‘पाठीवर मारा; पण पोटावर मारू नका’, ही सार्वत्रिक भावना आहे. गेल्यावर्षी कित्येक महिने टाळेबंदीमुळे घरात अडकून पडल्याचा, उपासमारीचा अनुभव गाठीशी असल्यामुळे घरात भुकेने टाचा घासून मरण्यापेक्षा विषाणूमुळे मरू, असा विचार लोक करू लागले आहेत. गावे, जिल्हे, शहरे अशी महिनोन्महिने बंद राहिल्यामुळे अर्थकारण कसे कोलमडले, लोकांचे किती हाल झाले, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सामान्य माणूस, त्याचे व्यवसाय, उद्योग अजून त्यातून सावरलेले नाहीत. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला अजूनही सरकारकडे पुरेसे पैसे नाहीत. खासगी व्यवसाय व उद्योगांच्या दुरवस्थेची तर कल्पना न केलेली बरी. तरीही लॉकडाऊनच्या रूपाने संबंधितांना भिकेचे डोहाळे लागले आहेत.
अशा संक्रमणाची साखळी तोडण्याची एक शास्त्रोक्त प्रक्रिया आहे. बाधित व्यक्ती कुणापासून संक्रमित झाली व बाधा झाल्यानंतर कुणाकुणाच्या संपर्कात आली, याचा शोध घेण्याला ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ म्हणतात. अशा संपर्कातील सगळ्या व्यक्तींच्या चाचण्या व सगळ्या बाधितांचे विलगीकरण, अर्थात ‘टेस्टिंग’ व ‘आयसोलेशन’ हे पुढचे टप्पे. असे केले तर इंग्रजीत ज्याला ‘पीक’ म्हणतात तसा बाधित रुग्णांचा आलेख लवकर सर्वोच्च पातळीवर पोहोचतो. दरम्यान, संसर्गाची साखळी तुटते. आलेखही घसरायला लागतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चाचण्या होताहेत हे खरे. पण, त्यापैकी किती चाचण्या या शास्त्रोक्त प्रक्रियेतून आहेत, हे स्पष्ट नाही. ही परिस्थिती पाहता, महाराष्ट्राच्या कारभाऱ्यांनी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनच्या मोहातून बाहेर पडण्याची, ती पळवाट सोडून देण्याची खूप गरज आहे. परवा, १ एप्रिलपासून ४५ वर्षांंवरील सर्वांना सरसकट लसीकरण सुरू होत आहे. तेव्हा राज्याच्या विविध भागातील कोविड-१९ उद्रेकाचा अभ्यास, संक्रमणाची साखळी तोडण्याची शास्त्रोक्त पद्धत आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण, या मार्गाने गेलो, तोंडावर मास्क व सामाजिक अंतराची कडक अंमलबजावणी केली, लॉकडाऊनचा अतिरेक टाळला व साथरोग विज्ञानाचा मार्ग पत्करला तरच नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात थोडी सुखाने होईल.