Coronavirus: ‘लॉकडाऊन’मुळे वसुंधरेचे पांग फिटले!
By गजानन दिवाण | Published: April 21, 2020 04:25 AM2020-04-21T04:25:17+5:302020-04-22T16:42:54+5:30
आज ‘कोरोना’शी लढतो आहोत. उद्या आणखी कुठल्यातरी आजाराशी लढावे लागेल. म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध जाऊन पुन्हा लढत बसायचे की निसर्गाशी जुळवून विकास साधायचा, हे आपण ठरवायचे आहे.
- गजानन दिवाण, उप वृत्तसंपादक, लोकमत, औरंगाबाद
निसर्गासाठी वेगळे काही करण्याची अजिबात गरज नाही. आपण निसर्गामध्ये फारशी लुडबुड न करणे हेच त्याच्यासाठी खूप काही केल्यासारखे आहे; पण माणसाचा स्वभाव फार विचित्र म्हणायचा. उदाहरणार्थ विकासाच्या नावाखाली हजार झाडे पैसे खर्चून तोडायची आणि त्याची भरपाई म्हणून लाखो रुपये खर्चून दुसरीकडे ती लावायची. यामुळे आपले समाधान भले होत असेल. निसर्गाची हानी त्यामुळे भरून निघत नाही. आताच्या ‘कोरोना’ संकटाने ते दाखवून दिले आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात माणसाने निसर्गात काहीच लुडबुड न केल्याने अलीकडच्या काही वर्षांत यंदा प्रथमच वसुंधरेने मोकळा श्वास अनुभवला असावा.
‘अर्थ डे नेटवर्क’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, तब्बल ५० वर्षांपासून दरषर्वी २२ एप्रिल हा दिवस ‘वसुंधरा दिन’ म्हणून पाळला जातो. १९७० च्या दशकात आधुनिक पर्यावरण चळवळीचा जन्म हा दिवस साजरा करण्यातून झाला, असे मानले जाते. तेलगळती, कारखाने आणि ऊर्जा प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण, विनाप्रक्रिया विषारी पदार्थ फेकून देणे, कीटकनाशकांचा वाढता वापर, जंगलांचा, मोकळ्या जागांचा आणि वन्यसृष्टीचा नाश हे पर्यावरणासंदर्भातील प्रश्न तेव्हा होते. आज ५० वर्षांनंतरही कायम आहेत. काही प्रश्नांचे स्वरूप बदलले, तर काही नव्या प्रश्नांची भर पडली. शिवाय विकासासाठी माणूस अधिक झपाटल्याने प्रदूषणाचा प्रश्न आणखी भयंकर बनला आहे. याविषयी जागृती निर्माण झाली असली तरी विकासाची गती थांबवून आम्हाला हे करायचे नाही. म्हणजे हवेच्या वेगाने विकास करायचा आणि निसर्गही वाचवायचा अशी मानसिकता घेऊन आम्ही पळत सुटलो आहोत. म्हणूनच हे प्रदूषण थांबवायचे कसे, यावर वेगवेगळ्या परिषदांच्या माध्यमातून जगभर वेगवेगळ्या ठिकाणी दरवर्षी चिंतन होत असते. नियमावली तयार केली जाते. हाती काय पडते, ते आपण पाहतच आहोत.
या प्रदूषणाची किंमत आपण किती मोजतो? ती प्रचंड अफाट आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार, हवा, जमीन आणि पाणी यातील प्रदूषणामुळे २०१६ साली ९० लाख अकाली मृत्यू झाले. जगभरातील एकूण मृत्यूपैकी १६ टक्के मृत्यू या प्रदूषणामुळे झाले. यातील ९२ टक्के मृत्यू हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये दिसून आले. पैशांमध्येच बोलायचे झाल्यास केवळ प्रदूषणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ५.७ ट्रिलियन यूएस डॉलर्स म्हणजेच जागतिक जीडीपीच्या ४.८ टक्के किंमत मोजावी लागली. हे सारे थांबविणार कसे?
याचे उत्तर प्रचंड प्रगती केलेल्या कुठल्याच देशाला आतापर्यंत मिळू शकले नाही. त्यामुळे स्वत: निसर्गानेच ते आपल्याला दिले आहे. ‘कोरोना’मुळे लॉकडाऊन असल्याने ‘न भूतो न भविष्यती’ प्रदूषण कमी झाले आहे. एकतर रस्त्यांवर आधीसारखी वाहने दिसत नाहीत. औद्योगिक क्षेत्रात २४ तास न थकता प्रदूषण सोडणारे धूरकांडेही सुरू नाहीत. अनेक कंपन्यांमधून नद्यांमध्ये जाणारे प्रदूषित पाणीही नाही. डोंगर पोखरले जात नाहीत. खाणींमध्ये काम सुरू नाही. यामुळे आपल्या मानवी जगताची आर्थिक चाके रुतली, हे खरेच; पण यामुळे मूळ निसर्ग अनुभवायला मिळत आहे, हे नाकारून कसे चालेल? घड्याळाच्या अलार्मशिवाय डोळे न उघडणारा मनुष्यप्राणी आता भरवस्तीतदेखील पक्ष्यांच्या चिवचिवाटाने झोपेतून जागा होत आहे. मानवी वस्तीजवळ कधीच न दिसणारे फ्लेमिंगोसारखे पक्षी आता मुक्त संचार करताना दिसत आहेत. मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कच्या शेजारी अनेक प्राण्यांची वर्दळ वाढली आहे. ताडोबा-अंधारीसारख्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये माणसांचाच आणि त्यांच्या जिप्सीचा राबता दिसायचा. आज या जंगलांमध्ये पक्षी-प्राणी मुक्तपणे वावरताना दिसत आहेत. बिबट्यांचा मानवी वस्त्यांजवळील राबता वाढला आहे. मोर कधी नव्हे इतके रस्त्यांवर दिसत आहेत. लाजाळू प्राणीही मुक्तपणे दर्शन देऊ लागले आहेत. पाणवठ्यांवरील पक्ष्यांची-प्राण्यांची संख्या वाढली आहे. एवढेच नाही तर धूळ, प्रदूषण थांबल्याने सर्दी, पडसे, तापाचे रुग्ण घटले आहेत. यासाठी आम्ही माणसांनी काय केले? काहीच न केल्याचा म्हणजे ‘स्टे अॅट होम’ राहिल्याचा हा चांगला परिणाम. लवकरच ‘कोरोना’च्या संकटावर आम्ही मात करूच. त्यानंतर आर्थिक संकटावरही मात करू. मात्र, यासाठी किंमत कुठली मोजायची, हे आधी ठरवायचे आहे. निसर्गानेच आम्हाला ही संधी दिली आहे. आधीप्रमाणेच पुन्हा निसर्ग ओरबाडून आम्ही विकास साधणार असू, तर आपल्यावरील आर्थिक संकट दूर होईलही; पण निसर्गाच्या हस्तक्षेपामुळे येणारी संकटे कधीच थांबणार नाहीत.
आज ‘कोरोना’शी लढतो आहोत. उद्या आणखी कुठल्यातरी आजाराशी लढावे लागेल. म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध जाऊन पुन्हा लढत बसायचे की निसर्गाशी जुळवून विकास साधायचा, हे आपण ठरवायचे आहे. म्हणजे निरोगी जीवनासाठी एक पैसा खर्च करायचा की रोग झाल्यानंतर एक रुपया उधळायचा, हे आपल्याला ठरवायचे आहे. स्वच्छ हवेची किंमत आम्ही आजही ओळखू शकत नसू, तर भविष्यकाळ यापेक्षाही वाईट राहणार आहे.