coronavirus: वादग्रस्त जागांवर ताबा मिळविण्याची चीनची 'ही' योजना; लष्करानं आक्रमक व्हावं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 01:34 AM2020-05-15T01:34:36+5:302020-05-15T08:20:01+5:30

परिस्थितीचा कसा लाभ उठवायचा आणि संधी निर्माण कशी करायची, हे चीनकडूनच शिकण्याची गरज आहे. जग महामारीशी लढण्यात गुंतलेले असल्याने चीनने आपल्या सीमेवर कारवाया करून लष्करी शक्तिप्रदर्शन सुरू केले. अशावेळी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित होणार नाही आणि झालाच तर कोविड-१९ च्या पुढे तो गौण समजला जाईल; हे ओळखण्याचा कावेबाजपणा चीनकडे आहे.

coronavirus: the evils of opportunistic China | coronavirus: वादग्रस्त जागांवर ताबा मिळविण्याची चीनची 'ही' योजना; लष्करानं आक्रमक व्हावं!

coronavirus: वादग्रस्त जागांवर ताबा मिळविण्याची चीनची 'ही' योजना; लष्करानं आक्रमक व्हावं!

Next

कोरोना विषाणू या जागतिक आपत्तीस चीन जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार करीत आले. प्रारंभी त्यांच्या या आरोपाकडे जगाने फारसे गांभीर्याने पाहिले नाही; पण हळूहळू जागतिक पातळीवर चीनविरोधी मानसिकता तयार होताना दिसते. त्यामुळे चीनविषयी रोषाचे वातावरण तयार होत आहे. दुसरीकडे अमेरिका, जपान, जर्मनीसारख्या महासत्तांनी चीनमधील आपली गुंतवणूक काढून घेण्याला सुरुवात केली. चीनऐवजी दुसऱ्या देशांमध्ये ही गुंतवणूक करण्याकडे कल वाढत असल्याने चीनमध्ये अस्वस्थता आहे. कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेत असताना बहुराष्ट्रीय कंपन्या चीनबाहेर जाणे म्हणजे रोजगार गमावणे, असे सरळ साधे गणित आहे. या जागतिक घडामोडींमध्ये चीनमध्ये अंतर्गत धुसफूस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनमधून बाहेर जाणारे उद्योग हे भारत, दक्षिण कोरियासारख्या देशांमध्ये गुंतवणूक करू शकतात. कारण स्वस्त व कुशल मनुष्यबळ या दोन देशांत उपलब्ध आहे. शिवाय राजकीय स्थैर्याची खात्री. विशेष गोष्ट म्हणजे कोणत्याही शेजाºयाशी चीनचे सलोख्याचे संबंध नाहीत व शेजारी राष्ट्रांचा चीनवर विश्वास नाही.

कोरोना विषाणूच्या विरोधात जग लढत असताना सगळीकडचा अंतर्गत संघर्ष थांबला आहे. त्याचवेळी चीनने शेजाºयाविरुद्ध कुरापती सुरू केल्या. भारताच्या सीमेवर त्यांनी लष्कराची जमवाजमव केली आणि ५ मे रोजी पँगाँग सरोवरालगत असलेल्या सीमेवर व ९ मे रोजी सिक्कीममधील नाकू ला सीमेवर कुरापती काढल्या. या दोन्ही ठिकाणी दोन्ही बाजूंचे सैनिक हातघाईवर आले. यात काही सैनिक जखमी झाले. यापूर्वी २०१७ मध्ये डोकलामच्या प्रश्नावर दोन्ही देशांमध्ये ७० दिवस तणावाचे वातावरण होते. यावेळीसुद्धा परवाच्या कुरापतीवर चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याचे वक्तव्य तोंडचोपडेपणाचा उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल. कोविड-१९ च्या विरोधात भारत व चीन एकमेकांच्या सहकार्याने लढा देत असल्याने इतर मुद्द्यांवर राजकारण करण्याची ही वेळ नाही; परंतु चीनच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी चीनचे सैनिक कटिबद्ध आहेत. त्यांचे हे वक्तव्यच परस्पराविरोधी असून, त्यांची सुप्त महत्त्वाकांक्षा त्यातून परावर्तित होते. चीनच्या या कुरापती भारतापुरत्या मर्यादित नाहीत. गेल्या महिन्यात चीनने व्हिएतनामच्या दोन मासेमारी नौका बुडवल्या. दक्षिण चीनच्या समुद्रात चीनच्या नौदलाने पाणबुडीविरोधी हल्ल्याचा सराव केला. सगळे जग कोरोनाशी लढत असताना लष्करी सरावाची ही वेळ नाही. या सरावाबाबत इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री रेत्नो मारसुदाई यांनी आक्षेप नोंदविला. चीनच्या कारवाया तैवान, जपान व दक्षिण कोरिया या देशांनी अनुभवल्या. मार्चमध्ये तर चीनचे लढाऊ विमान दक्षिण कोरियाच्या हवाई हद्दीत शिरले होते.

आपल्या सीमेवरच वादग्रस्त भागात लष्कराने आक्रमक व्हावे, अशाच सूचना बहुतेक चीनच्या सरकारने दिल्या असाव्यात. कारण आज सगळेच देश कोरोनाशी लढण्यात व्यस्त असल्याने सीमेवर थोडेफार गाफील असू शकतात, अशा वेळी घुसखोरी करून वादग्रस्त जागांवर ताबा मिळविण्याची ही योजना असावी. जागतिक महामारीच्या काळातच चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने सर्व सीमांवर शक्तिप्रदर्शन सुरू केले. भारतासाठी सीमेलगतच्या या कुरबुरी किरकोळ गोष्टी नाहीत. आपली ३,४८८ कि.मी. सीमा ही चीनच्या लगत असून, ती दुर्गम हिमालयाने व्यापली आहे. तिचे नैसर्गिक संरक्षण होते, हा समज आता राहिला नाही. उलट घुसखोरीसाठी ती सोयीची आहे. परवा ज्या कुरबुरी झाल्या त्या नाकू ला व पँगाँग या दोन ठिकाणांचे अंतर अडीच हजार कि.मी. आहे. तीन वर्षांपूर्वी डोकलामच्या पेचाच्या वेळी भारतीय सैनिक आक्रमक होते आणि यावेळीसुद्धा त्यांची भूमिका बदलली नाही. हीच चीनची डोकेदुखी आहे. चीनला सैन्याच्या बळावर महासत्ता बनायचे, तसेच आर्थिक महासत्ता म्हणून पुढे यायचे आहे. आर्थिक महासत्ता बनण्यासाठी त्यांनी आपल्या मनुष्यबळाचा वापर करून घेतला आणि जागतिक उत्पादनात अग्रेसर राहिले. एका अर्थाने ब-याच वस्तूंच्या उत्पादनासाठी जग चीनवर अवलंबून राहिले. महासत्ता बनण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब ते करू शकतात. आपल्यासाठी कोरोनासोबतच नवे सीमेवरचे आव्हान निर्माण होऊ शकते.

Web Title: coronavirus: the evils of opportunistic China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.