Coronavirus : कोरोनाच्या काळोखातील प्रकाशाचे पुंजके

By किरण अग्रवाल | Published: April 23, 2020 08:23 AM2020-04-23T08:23:05+5:302020-04-23T08:27:13+5:30

Coronavirus : कोरोनाच्या संकटाने घाबरून न जाता त्याच्याशी मुकाबला करण्याकरिता शासन-प्रशासन प्रयत्नरत असतानाच सामाजिक जाणिवेचे भान प्रदर्शित अनेक उद्योगपती, संस्था व व्यक्तीही स्वयंस्फूर्तीने पुढे आले आहेत.

Coronavirus: How are people helping each other during the outbreak? | Coronavirus : कोरोनाच्या काळोखातील प्रकाशाचे पुंजके

Coronavirus : कोरोनाच्या काळोखातील प्रकाशाचे पुंजके

Next

किरण अग्रवाल

रोजच्या जगण्यातील नकारात्मक सूर टाळून आयुष्य सुंदर-समाधानी बनविण्यासाठी हल्ली प्रत्येकाकडूनच ‘बी-पॉझिटिव्ह’चे सल्ले दिले जातात. सकारात्मक विचार तेथे अभिप्रेत असतो; पण शब्दांचे संदर्भ बदलताच अर्थही बदलत असल्याने हाच ‘पॉझिटिव्ह’ शब्द जेव्हा कोरोनाच्या बाबतीत उच्चारला जातो तेव्हा कुणाच्याही पोटात भीतीने धस्स होणे स्वाभाविक ठरून जाते. कारण, कोरोनासाठी केल्या जाणाऱ्या चाचणीत एखाद्या संशयिताचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ निघाला म्हणजे मेडिकली तो कोरोनाबाधित गणला जातो. अर्थात, अशाही स्थितीत कोरोनाच्या संकटकाळात आपल्या अर्थविषयक मर्यादांमध्ये अडकून न पडता आपल्या परिने जमेल तो सेवा-सहकार्याचा हात पुढे करणारे आढळून येतात, तेव्हा अशा सेवार्थींचे ‘पॉझिटिव्ह पुंजके’च मानवतेची मशाल अबाधितपणे पेटती राहण्यास मदत करीत असल्याची खात्री पटून जाते.

कोरोनामुळे सध्या संपूर्ण जग चिंतित आहे. जगाच्या पाठीवर दुसरा कोणताही विषय चर्चेत नसून, केवळ कोरोना एके कोराना व त्याला कसा आवर घालायचा, असा प्रश्न सर्वतोमुखी आहे. महासत्ता म्हणून मिरवणारे अमेरिकेसारखे देशही या संकटात उन्मळून पडल्यासारखे बेजार-हतबल झालेले दिसत आहेत. भारतातील बाधितांचा व मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडाही वाढता वाढता वाढतच आहे; पण केंद्र व राज्यातील सरकार अतिशय धाडसाने या आपत्तीचा मुकाबला करीत आहे. काही ठिकाणी, काही बाबतीत म्हणावे तसे वा तितके नागरिकांचे सहकार्य मिळत नाहीये. लॉकडाउनचे उल्लंघन वगैरेही होते आहे; पण या संकटाने अन्य देशात उडवलेला हाहाकार व आपल्याकडील स्थिती याची तुलना करता आपल्याकडे हे संकट ब-यापैकी आटोक्यात असल्याचे म्हणता यावे. यास शासन-प्रशासनासह डॉक्टर्स, नर्सेस, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आरोग्य व स्वच्छता कर्मचारी, पोलीस, सर्वेक्षण करणाऱ्या आशा सेविका आदी सर्वांचेच परिश्रम कारणीभूत आहेत.



महत्त्वाचे म्हणजे, कोरोनाच्या संकटाने घाबरून न जाता त्याच्याशी मुकाबला करण्याकरिता शासन-प्रशासन प्रयत्नरत असतानाच सामाजिक जाणिवेचे भान प्रदर्शित अनेक उद्योगपती, संस्था व व्यक्तीही स्वयंस्फूर्तीने पुढे आले आहेत. पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीत भर घालतानाच अनेकांनी क्वॉरण्टाइन वॉर्ड उभारून देण्यापासून तर अन्नधान्य, सॅनिटायझर्स-मास्क पुरवठा व भुकेलेल्यांना फूड पॅकेट्स उपलब्ध करून देण्याच्या मदतीचा हात पुढे केला आहे. माणुसकी धावून आल्याचा हा प्रत्यय यंत्रणांचेही मनोबल उंचावणारा आहे. यातही नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, हातावर पोट असणारे-श्रमिक व नोकरदारही या संकटाचे मूकदर्शक बनून राहिले नाहीत, तर तेदेखील आपल्या क्षमतेनुसार सेवाकुंडात माणुसकीधर्माची समिधा टाकताना दिसत आहेत; ते अधिक महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे कराव्या लागलेल्या ‘लॉकडाउन’ काळात घरी बसून बसून काय करायचे, असा प्रश्न करणा-यांसमोर वाशिम जिल्ह्यातील कारखेड्याच्या दांपप्त्याने ठेवलेला आदर्श तर खरेच स्तिमित करणारा आहे. तेथील गजानन व पुष्पा पकमोडे या दांपत्याने आपल्या अंगणात या लॉकडाउनच्या २१ दिवसांत २५ फूट खोल विहीर खोदून तिचे पाणी गावक-यांना उपलब्ध करून देण्याची भावना बोलून दाखविली आहे. रिकामपणातल्या या उद्योगाला व श्रमाने साकारलेल्या यशाचा गावकऱ्यांनाही उपयोग करून देण्याच्या भावनेला सॅल्यूटच करायला हवा.

राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील पलसाना येथे वास्तव्यास असणाऱ्या काही मजुरांना कोरोना काळात तेथील एका शाळेत आश्रय देण्यात आला आहे. त्यांच्या राहण्या-खाण्याची सोय तेथे केली गेली आहे. गावक-यांच्या या मदतीचे उतराई होत या मजुरांनी गेल्या ९ वर्षांपासून रखडलेले सदर शाळेचे रंगकाम आपल्या हाती घेत शाळा रंगवून दिली आहे. घराकडे परतण्याचा आग्रह न धरता किंवा खाऊन-पिऊन झोपा न काढता, या मजुरांनी दाखविलेली कृतिशील संवेदना माणुसकीच्या जाणिवेचा पदर घट्ट करणारीच म्हणता यावी. आपल्याकडे महाराष्ट्रातही अशी काही उदाहरणे आहेत, की जे आपल्या क्षमतेनुसार या संकटकाळात मदतीसाठी सरसावले आहेत. पुण्यातील हवेली पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी कविता नम लॉकडाउनमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना स्वखर्चाने सकाळ-सायंकाळी चहा-नास्ता पुरवित आहे. नाशकातील इंदिरानगरात महापालिकेच्या घंटागाडीवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांना दोन शाळकरी मुलांनी हाताने शुभेच्छापत्र बनवून देत त्यांच्या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हे असे जागोजागचे ‘पॉझिटिव्ह’ पुंजकेच खऱ्या अर्थाने ‘सर्वे भवन्तु सुखिना:’चा संदेश देत कोरोनाच्या काळोखात परोपकाराचा प्रकाश पेरत आहेत, अशांचे समाजाकडून कौतुक झाले पाहिजे. कारण तेच या आजच्या संकटाशी लढाई लढताना गरजवंतांच्या पाठीशी सकारात्मकतेचे बळ एकवटून व सेवेचा प्रकाश पसरवून आहेत.

 

Web Title: Coronavirus: How are people helping each other during the outbreak?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.