CoronaVirus : कोरोना विरोधातील लढाईचे हे परिणाम कसे दुर्लक्षित करावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 12:11 AM2020-03-27T00:11:34+5:302020-03-27T00:12:09+5:30
CoronaVirus : कोरोनामुळे अनेकांना आपले छंद जपण्याकरिता चांगलाच वेळ मिळाला आहे.
- संदीप प्रधान (वरिष्ठ सहायक संपादक)
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणारे मृत्यू ही चिंताजनक आपत्ती आहे, यात वाद नाही. अनेक बेजबाबदार व्यक्ती विलगीकरणाचा सहजसाध्य उपाय करायलाही तयार नाहीत हे दुर्दैव आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारीवर्ग आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावून या संकटाचा मुकाबला करीत आहे ही समाधानाची बाब आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकटाला जसे भीती, क्लेष, दु:ख, यातनांचे पदर आहेत तसेच जिद्द, आत्मविश्वास, एकजिनसीपणा वगैरे बाबींचे दिलासादायक पदरही आहेत. कोरोनावर मात करण्याचा एकमेव उपाय हा होम क्वारंटाईन हाच असल्याने सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती मुकेश अंबानी, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापासून अनेक नामवंत व्यक्ती, सेलिब्रेटी घराच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त आहेत. दररोज आपण सारेच आपापल्या रुटीनमध्ये व्यस्त असल्याने आपल्याला अनेक गोष्टीकरिता वेळ काढता येत नाही. कोरोनामुळे अनेकांना आपले छंद जपण्याकरिता चांगलाच वेळ मिळाला आहे.
छोट्या पडद्यावर किंवा वेबसीरिजच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करणारे कलाकारही सध्या घरी ‘कैद’ झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या करमणुकीचे वांदे झाले आहेत. लोकांची हीच अडचण ओळखून श्रीरंग गोडबोले यांनी त्यांच्या संस्थेच्यावतीने आॅनलाइन मैफिल जमवली आहे. यामध्ये तासभर वेगवेगळे कलाकार, गायक, कवी मनोरंजन करतात. संगीतकार कौशल इनामदार यांनी त्यांच्या वेबपेजवर ‘कौशल कट्टा’ सुरु केला आहे. अनेक प्रतिथयश गायक या कट्ट्यावर सुरेल मैफिली रंगवत असून कोरोनाच्या भयाने घरात कोंडलेल्यांचा दिवस सुरेल करतात. अमेरिकेतून आल्याने होम क्वारंटाईन झालेले अभिनेते अमेय वाघ हेही दररोज व्हिडीओ तयार करुन रसिकांशी आपली जोडलेली नाळ टिकवून ठेवत आहेत. ठाण्यातील एका संस्थेतर्फे सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने व राजश्री गढीकर हे संस्थेच्या फेसबुक पेजवरुन कथाकथन करुन लोकरंजन करीत आहेत.
लेखक, कवी, नाटककार यांच्याकरिताही ही एकाअर्थी पर्वणी आहे. व्याख्याने, कार्यक्रम, मालिकांचे लेखन वगैरे कामात अनेकांना आपल्या अपूर्णावस्थेतील साहित्यकृती पूर्ण करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे काहींचा कथासंग्रह येऊन दोन वर्षे झाली किंवा गेली सहा-आठ महिने प्रतीक्षा करुनही नाटक पूर्ण झाले नाही, अशी अवस्था होती. लेखिका, कवयित्री नीरजा या सध्या गेल्या दोन ते तीन वर्षांत लिहिलेल्या, परंतु अंतिम न केलेल्या कथांचे लेखन बैठक मारुन करीत आहेत. सुप्रसिद्ध नाटककार जयंत पवार हेही त्यांचे अपूर्ण असलेले नाटक पूर्ण करीत आहेत. नीरजा व पवार यांच्याप्रमाणेच अनेक लेखक, कवी हे आपल्या कलाकृती अंतिम करीत असल्याने कोरोनाचे सावट संपुष्टात येताच साहित्य क्षेत्रात नवीन ग्रंथांची निश्चित भर पडणार आहे. कोरोनाच्या संकटाचे सामाजिक, राजकीय, कौटुंबिक परिणाम हेही अनेक प्रतिभावंतांकरिता साहित्य निर्मितीकरिता प्रेरणादायी ठरणार आहेत.
अनेकदा सेलिब्रेटी हे गळ््यातले ताईत बनतात तसेच त्यांच्या व्यावसायिकतेमुळे घृणेचा विषय ठरतात. मात्र सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या दातृत्वाने कोरोनाच्या संकटात हातावर पोट असलेल्या नाट्यसृष्टीतील कामगारांना दिलासा दिला. शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष सुबोध भावे हेही सध्या सिनेसृष्टीतील तंत्रज्ञ व अन्य गरीब कामगारांना महिनाभराचा किराणा घरपोच करण्याकरिता धडपडत आहेत. अभिनेते जितेंद्र जोशी हे अन्य १५ कलाकारांसोबत कोरोना व लॉकडाऊन याबाबत व्हिडीओ तयार करुन जनप्रबोधन करीत आहेत. आनंद इंगळे यांनी आपल्या फेसबुकद्वारे पुण्यात वास्तव्य करीत असलेल्या वृद्ध दाम्पत्याना औषधे घरपोच केली. प्रवीण तरडे यांनी मराठवाडा, विदर्भातील जे विद्यार्थी पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. सुमारे १५० विद्यार्थ्यांना त्यामुळे दिलासा लाभला आहे.
कोरोनाचे दुष्परिणाम अनेक असले तरी त्याच्या या काही सकारात्मक बाबी पूर्णपणे दुर्लक्षून चालणार नाहीत. प्रत्येक माणूस कुटुंबाला वेळ देऊ लागला, लोकांच्या अंगातील चित्रकला, नृत्यकला यांना बहर आला, सापशिडीपासून कॅरम, पत्त्यांपर्यंतचे खेळ पुन्हा घराघरात खेळले जाऊ लागले. गेल्या काही वर्षांत विरळ होत गेलेला संवाद दाट झाला, वाहने रस्त्यांवर नसल्याने घराच्या खिडकीतून दिसणारे तेच आकाश निळे दिसू लागले, कारखाने बंद असल्याने नदीचे गढूळ पाणी स्वच्छ दिसू लागले. याचे स्वागत न करुन कसे चालेल?