CoronaVirus In India : सावधगिरीसह हर्ड इम्युनिटी हाच पर्याय!
By रवी टाले | Published: April 24, 2020 05:17 PM2020-04-24T17:17:05+5:302020-04-24T17:23:04+5:30
जेव्हा ७० टक्के लोकसंख्या बाधित होऊन बरी होईल, तेव्हा कोविड-१९ आजाराने महामारीचे स्वरूप धारण करण्याची शक्यता मोडित निघालेली असेल!
कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीला ३ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यामुळे अस्वस्थता वाढू लागली आहे. टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ होणार हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आता टाळेबंदीच्या आवश्यकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला प्रारंभ झाला आहे. प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांचा स्वर दबका असला तरी, तो उमटू लागला आहे. त्याकडे फार काळ दुर्लक्ष करता येणार नाही. दिवस उलटतील तसा हा स्वर बुलंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय स्थलांतरित कामगारांना आणखी किती दिवस निवाऱ्यांमध्ये डांबून ठेवणार, हादेखील प्रश्न आहेच! त्यांच्यातील अस्वस्थतेची चुणूक मध्यंतरी मुंबईतील वांद्रे रेल्वेस्थानकापुढे दिसली होतीच! त्यांची खाण्यापिण्याची अजिबात आबाळ होत नसल्याचा सरकारी दावा मान्य केला तरी, केवळ अन्न हीच मनुष्याची गरज आणि प्राथमिकता नसते, ही बाबदेखील विसरून चालणार नाही.
या पृष्ठभूमीवर आता पुन्हा एकदा कळप रोग प्रतिकारक शक्ती, म्हणजेच हर्ड इम्युनिटीची चर्चा सुरू झाली आहे. भारतात कोरोनाने शिरकाव केला, तेव्हा सर्वप्रथम हा शब्द चर्चेत आला होता. आता टाळेबंदी आणखी किती दिवस सुरू ठेवणार, या प्रश्नाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हर्ड इम्युनिटी चर्चेत आली आहे. एखाद्या संसर्गजन्य आजारासाठी मोठ्या संख्येतील नागरिकांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याने त्या आजाराचा प्रसार थांबतो, तेव्हा त्या स्थितीला हर्ड इम्युनिटी संबोधले जाते. मग ती रोग प्रतिकारक शक्ती लसीकरणामुळे निर्माण झालेली असो, अथवा त्या आजारासाठी कारणीभूत विषाणू अथवा जीवाणूचा संसर्ग झाल्याने शरीरात अॅण्टी बॉडीज तयार होऊन निर्माण झालेली असो!
जेव्हा अधिकाधिक लोक कोरोना विषाणूमुळे बाधित होतील, तेव्हा कोविड-१९ आजारातून बरे होणाºया लोकांची संख्याही वाढत जाईल. त्यांच्यात कोविड-१९ आजारासाठी रोग प्रतिकारक शक्ती निर्माण झालेली असेल. परिणामी ते पुन्हा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आजारी पडणार नाहीत. अशा तºहेने जेव्हा ७० टक्के लोकसंख्या बाधित होऊन बरी होईल, तेव्हा कोविड-१९ आजाराने महामारीचे स्वरूप धारण करण्याची शक्यता मोडित निघालेली असेल! या स्थितीलाच हर्ड इम्युनिटी म्हणतात.
टाळेबंदीमुळे भारतात कोविड-१९ आजाराच्या प्रसारास मोठ्या प्रमाणात अटकाव झाला असला तरी, दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. यावर्षी देशाचा विकास दर जेमतेम एक टक्क्याच्या आसपास राहण्याची भीती व्यक्त होत आहे. देशात आधीच मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. कोरोना आपत्तीमुळे अनेक लोकांचा रोजगार जाण्याची भीती असून, त्यामुळे बेरोजगारीचा दर आणखी वाढणार आहे. ठप्प पडलेले अनेक उद्योग कदाचित पुन्हा सुरूच होऊ शकणार नाहीत, अशीही आशंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या विकसनशील देशास टाळेबंदीची चैन फार काळ परवडू शकत नाही, असा सूर उमटण्यास आता प्रारंभ झाला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही टाळेबंदी ३ मे पुढे लांबविण्यास त्यांच्या पक्षाचा विरोध असेल, असे स्पष्ट केले आहे.
या पृष्ठभूमीवर, ३ मे नंतर टाळेबंदी न वाढविता हर्ड इम्युनिटीवर विसंबायला हवे, असा मतप्रवाह सुरू झाला आहे. ब्रिटनसारख्या देशांनी हर्ड इम्युनिटी रणनीती अवलंबण्यास विरोध दर्शविला आहे; कारण त्यामुळे कोविड-१९ आजारामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ब्रिटिश सरकारचे मत आहे. हर्ड इम्युनिटीचे समर्थक भारतात तसा धोका नसल्याचा युक्तिवाद करीत आहेत. त्यासाठी ते आकडेवारीचा आधार घेत आहेत. उर्वरित जगाच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचे आणि कोविड-१९ आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण बरेच कमी आहे. दुसरीकडे कोरोना विषाणूची बाधा होऊन बरे होणाºयांची संख्या मोठी आहे. शिवाय ज्यांचा मृत्यू झाला त्यापैकी बहुतांश जण वृद्ध आणि आधीपासून इतर आजारांनी ग्रस्त होते. त्यामुळे भारताने टाळेबंदी उठवून हर्ड इम्युनिटी रणनीतीचा स्वीकार करायला हरकत नाही, असे समर्थकांचे मत आहे.
एखादा देश कितीही विकसित व श्रीमंत असला तरी तो अनिश्चित काळासाठी टाळेबंदी जारी ठेवू शकत नाही. भारत तर एक विकसनशील आणि मोठ्या प्रमाणात गरिबी असलेला देश आहे. त्यामुळे भारताने लवकरात लवकर टाळेबंदी हटवायला हवी, यासंदर्भात दुमत असण्याचे कारणच नाही; मात्र त्याचवेळी नागरिकांना अद्याप औषध वा लस न सापडलेल्या आजाराच्या तोंडी देणेही योग्य होणार नाही. त्यामुळे मधला मार्गच शोधावा लागेल.
टाळेबंदी सुनियोजितरीत्या हटविणे, नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे व वारंवार हात धुणे बंधनकारक करणे, त्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, अनावश्यकरीत्या भटकण्यावर बंधने आणणे, आवश्यक असेल तरच प्रवासाची मुभा देणे, मनोरजंनाचे कार्यक्रम आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांवरील, तसेच धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांवरील बंदी कायम ठेवणे, मोठ्या प्रमाणात लोक जमणाºया विवाह सोहळ्यांवरील बंदी कायम ठेवणे, जोपर्यंत हर्ड इम्युनिटी गाठल्या जात नाही तोवर वृद्धांसाठी टाळेबंदी जारीच ठेवणे, आदी मार्गांचा अवलंब केल्यास, देशाच्या अर्थगाड्यास गती देणे आणि कोविड-१९ आजारावर मात करणे, हे दोन्ही उद्देश साध्य होऊ शकतात. थोडक्यात, सावधगिरीसह हर्ड इम्युनिटी हाच भारतासाठी सुयोग्य पर्याय दिसतो.