coronavirus: कोरोनाविरोधातील लढ्यात भारत जगासाठी आदर्श

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 04:47 AM2020-05-13T04:47:48+5:302020-05-13T04:48:09+5:30

‘कोरोना’संदर्भात मोदींनी जे झटपट आणि योग्य निर्णय घेतले, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, आता भारताचा विश्वास समस्यांना बगल देण्यावर नव्हे, तर आव्हाने समर्थपणे पेलण्यावर आहे.

coronavirus: India is ideal for the world in the fight against coronavirus | coronavirus: कोरोनाविरोधातील लढ्यात भारत जगासाठी आदर्श

coronavirus: कोरोनाविरोधातील लढ्यात भारत जगासाठी आदर्श

Next

- जे. पी. नड्डा
(राष्ट्रीय अध्यक्ष,
भाजप)

‘कोविड-१९’विरुद्धच्या वैश्विक लढाईत भारताने सर्र्व जगाला आदर्श घालून दिला आहे. याचे सर्वांत प्रमुख कारण म्हणजे सध्या भारताचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्यासारख्या सशक्त व्यक्तीच्या हाती आहे. त्यांनी अगदी योग्य वेळी ‘लॉकडाऊन’ लागू केले एवढेच नव्हे, तर त्यांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’ आणि कोरोना योद्ध्यांचा सन्मान हा जनमानसाचा जणू मंत्र बनविला. पंतप्रधानांची दूरदृष्टी, कणखर निर्णय आणि मदतीसाठी योजलेले चहूमुखी उपाय यामुळे कोरोना विषाणू १३० कोटी लोकसंख्येच्या भारतात घट्ट पाय रोवू शकलेला नाही. कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात संपूर्ण जग भारताची प्रशंसा करीत आहे आणि भारताकडे एक उदाहरण म्हणून पाहात आहे.
‘कोरोना’संदर्भात मोदींनी जे झटपट आणि योग्य निर्णय घेतले, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, आता भारताचा विश्वास समस्यांना बगल देण्यावर नव्हे, तर आव्हाने समर्थपणे पेलण्यावर आहे. एप्रिलच्या सुरुवातीस अन्य देशांवर अवलंबून असलेल्या भारतात आज दररोज अडीच लाख ‘पीपीई किटस्’चे आणि दोन लाख ‘एन-९५’ मास्कचे उत्पादन होत आहे. लवकरच आपण याबाबतीत चीनलाही मागे टाकू. आता पुरेसे व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. कोणतीही परिस्थिती हाताळता यावी यासाठी पाच लाखांहून अधिक ‘आयसोलेशन बेड’ व पुरेशा संख्येने ‘आयसीयू बेड’ही सज्ज झाले आहेत. रेल्वेनेही त्यांच्या हजारो प्रवासी डब्यांमध्ये ‘आयसोलेशन बेड’ची व्यवस्था केली असून, ही सोय देशभरातील २१५ रेल्वे स्टेशनवर उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अल्पावधीत आरोग्यसेवा गरजेनुसार कशी ‘अपग्रेड’ केली याचेच हे उदाहरण आहे.
मार्चच्या अखेरीस चाचण्यांच्या कमी प्रमाणावरून चिंता व्यक्त केली जात होती; पण गेल्या दोन दिवसांत १.६० लाखांहून अधिक चाचण्या केल्या गेल्या आणि चाचण्यांची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवून आतापर्यंत १५ लाखांहून अधिक चाचण्या केल्या गेल्या आहेत. मृत्यूचे प्रमाण स्थिर ठेवण्यातही आपण यशस्वी झालो आहोत. आपला ‘कोराना’चा मृत्यूदर दक्षिण कोरिया, चीन, रशिया आणि अमेरिकेहून कमी आहे. ईशान्येकडील आठपैकी सहा राज्ये पूर्णपणे कोरोनामुक्त झाली आहेत, तसेच गोव्यातूनही कोरोना हद्दपार झाला आहे. कोरोना प्रभावित जिल्ह्यांची संख्या कमी होऊन सुमारे ३०० जिल्हे ‘ग्रीन झोन’मध्ये आले आहेत. कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाणही सतत वाढून ३१ टक्क्यांच्या पुढे गेले आहे. या सर्वांवरून आपण योग्य दिशेने चाललो आहोत, हेच सिद्ध होते. मोदीजींनी वेळीच ‘लॉकडाऊन’ लागू केले नसते, तर चित्र भयावह दिसले असते, असा निष्कर्ष अनेक तज्ज्ञांनी अभ्यासाअंती काढला आहे. मोदींच्या आवाहनाला लोकांनी मनापासून साथ दिली म्हणूनच अन्य अनेक देशांच्या तुलनेत आपल्याकडे ‘लॉकडाऊन’ खूपच यशस्वी होऊ शकले. नवे रुग्ण आढळत असले तरी रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी खूपच लांबला हे त्यामुळेच. देशात अनेक मतप्रवाह आणि संप्रदायाचे लोक असले तरी मोदींच्या नेतृत्वावर त्या सर्वांचा भरवसा आहे म्हणूनच हे साध्य होऊ शकले.
स्वत: मोदीजी विविध मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री आणि खास ‘कोरोना’साठी नेमलेल्या ११ ‘कोअर टीम’सोबत व्हिडिओ बैठका घेऊन दिवसाचे १८ तास काम करीत आहेत. या ‘कोअर टीम’ अहोरात्र काम करीत आहेत. या महामारीचा मुकाबला करण्यात ‘पीएम केअर्स फंड’ एक फार मोठे साधन ठरत आहे.
सरकारने गरीब व गरजूंसाठी १.७० लाख कोटी रुपये खर्चाची ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना’ हाती घेतली आहे. त्यानुसार ३९ कोटी लोकांना ३४,८०० कोटी रुपयांची मदत थेट दिली गेली आहे. मोदी सरकारने महिला व शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत थेट रक्कम जमा केली. उद्योगांना मदतीचा हात दिला, तर गरिबांना अन्नधान्य आणि विनामूल्य स्वयंपाकाचा गॅस दिला. आता स्थलांतरित मजुरांना स्वत: संकटात असूनही भारताने अनेक मोठ्या देशांना औषधांचा पुरवठा
केला आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या
तुकड्या अन्य देशांच्या मदतीला पाठविल्या आहेत.
हे नक्कीच अभूतपूर्व आहे. कोरोना विषाणूविरुद्धच्या
या लढाईत भारताकडे जगाचा नेता म्हणून पाहिले
जात आहे.

Web Title: coronavirus: India is ideal for the world in the fight against coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.