BLOG : कोरोनाविरुद्धच्या लढाईतला पडद्याआडचा 'रिअल हिरो'!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 10:30 AM2021-03-28T10:30:16+5:302021-03-28T10:40:52+5:30
Suresh Kakani, Addl. Municipal Commissioner And CoronaVirus Mumbai Updates : गेले वर्षभर सतत कामात असणारे आरोग्य अधिकारी, शासकीय कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ यांच्या श्रमाला तोड नाही. शांतपणे आणि नेमस्तपणे आपले काम करणारे एक अधिकारी म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी.
- अतुल कुलकर्णी
महाराष्ट्रात कोरोनाची सुरुवात होऊन एक वर्ष पूर्ण झाले. एक लाट आली आणि ती संपत असताना दुसरी आली. परिस्थिती सुधारत असताना पुन्हा दुसऱ्या लाटेने महाराष्ट्राला घेरले आहे. गेले वर्षभर सतत कामात असणारे आरोग्य अधिकारी, शासकीय कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ यांच्या श्रमाला तोड नाही. आता या आजारासोबत आपल्याला राहावे लागेल, या मानसिकतेत हळूहळू उपचार करण्याची सिस्टीम देखील सेट होऊ लागली आहे. मी या काळात अनेक अधिकारी पाहिले. प्रसिद्धीपासून दूर,.कुठलाही गाजावाजा न करता, शांतपणे आणि नेमस्तपणे आपले काम करणारे एक अधिकारी म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani, Addl. Municipal Commissioner).
मंत्रालयात ते काम करत तेव्हापासून माझी त्यांची ओळख आहे. मात्र त्यांच्यातला माणूस मी या वर्षभरात खूप जवळून पाहिला. अनुभवला. मुंबईत या साथीने प्रचंड डोके वर काढले असतानाही स्वतःचे चित्त शांत ठेवून काम करताना मी त्यांना पाहिले. त्यांची मुलाखत घेतली. ज्या ज्या वेळी त्यांना काही माहिती विचारली, तेव्हा त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता माहिती दिली. अनेकदा दिलेली माहिती मुंबई महापालिकेच्या विरोधात जाईल असे वाटत असतानाही, त्यांनी काहीही न लपवता माहिती दिली. ती देत असताना महापालिकेची बाजूदेखील तेवढ्यात भक्कमपणे मांडली.
Suresh Kakani, Addl. Municipal Commissioner (Western Suburbs), paid a visit to the Ward War Room of @mybmcWardPS and interacted with the team.#BlessedToServe#AnythingForMumbai#NaToCoronapic.twitter.com/7ci98TUzic
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 30, 2020
सायन हॉस्पिटलमध्ये डेडबॉडीज पडून आहेत. त्या नेल्या जात नाहीत अशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल झाला. प्रचंड टीका झाली. त्यावेळी वस्तुस्थिती काय आहे, हे विचारण्यासाठी मी काकाणी यांना फोन केला. तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती, ती माहिती खरी आहे अशी... पण त्या का पडून आहेत? त्याची कारणं सांगताना त्यांनी जी वस्तुस्थिती मांडली ती विदारक होती. तरी देखील त्यांनी निर्भीडपणे ती माहिती सांगितली. सांगत असताना प्रशासनाला फेस कराव्या लागणाऱ्या अडचणीही त्यांनी सांगितल्या. त्या अडचणी अत्यंत भयंकर होत्या, आणि ज्या काळी कोरोना पीक वर होता त्या काळाची असहाय्यता दर्शवणाऱ्या होत्या.
या वर्षभरात मी ज्यावेळी त्यांना फोन केले आणि कोणाला बेडची गरज आहे, कोणाला ऑक्सिजनची गरज आहे, किंवा कोणाला रेमडेसेवीरची गरज आहे, कोणाला व्हॅक्सिन हवे आहे, अशा प्रत्येक वेळी त्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्याकडून कधीही नकार घंटा नव्हती. पत्रकार असल्यामुळे अनेक जण फोन करतात. मदत मिळेल का असे विचारतात. ओळख असो नसो, मला आलेले मेसेज मी त्यांना फॉरवर्ड केले, त्यावेळी त्यांनी मदतीचा हात पुढे केला. तुम्ही मुंबई महापालिकेच्या विरोधात लिहिता किंवा बाजूने लिहिता हा विषय कधीही त्यांनी मदत करताना मध्ये आणला नाही. काकाणी यांना मी मंत्रालयात काम करताना जेवढे पाहिले आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त पुण्याईचे काम करताना मी त्यांना गेले वर्षभर पाहत आहे. त्यांना तणावाचे प्रसंग आले नसतील असे नाही, मात्र अत्यंत शांतपणे आणि संयमाने माहिती देत, त्यांनी ही परिस्थिती हाताळली आहे. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात पडद्याआड काम करणारे असे अनेक रियल हिरो आहेत. काकाणी त्यातले एक प्रमुख हिरो आहेत, असे म्हटले तर वावगे होणार नाही.