CoronaVirus: नव्या परिस्थितीजन्य संस्कृतीची नितांत गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 05:15 AM2020-04-22T05:15:55+5:302020-04-22T05:16:19+5:30

वसुंधरा दिनी प्रतिज्ञा करावी की, ‘जगडव्याळ विचार, स्थानिक कृती व जो बदल वांच्छित आहे तो स्वत: बनणे.’ वसुंधरेचे रक्षण हा २१व्या शतकाचा युगधर्म आहे.

coronavirus need of new situational living culture | CoronaVirus: नव्या परिस्थितीजन्य संस्कृतीची नितांत गरज

CoronaVirus: नव्या परिस्थितीजन्य संस्कृतीची नितांत गरज

Next

- प्रा. एच. एम. देसरडा, प्रख्यात अर्थतज्ज्ञ; माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ

१९७० पासून २२ एप्रिल हा दिवस जगभर पृथ्वी दिवस (अर्थ डे) म्हणून साजरा केला जातो. यंदा त्याला ५० वर्षे पूर्ण होत असून, यावेळचा विषय ‘हवामान कृती’ (क्लायमेट अ‍ॅक्शन) हा आहे. अर्थात त्याचे मूळ प्रयोजन, मर्म व महत्त्व लक्षात न घेता सोपस्कार नि समारंभ चालत राहतात. यंदाचा अर्थ-डे ‘कोरोना’च्या भीषण धास्तीमुळे अंतर्मुख करणारा आहे, असावयास हवा. महामारीच्या लागण व मृत्यू तांडवापायी सव्वा लाख मानवांचा हकनाक बळी गेला. अवघे जग भांबावले. कोट्यवधी लोकांचे जीवन व जीविका धोक्यात आली. जगभर श्रमजीवींचे, स्थलांतरितांचे हाल होत आहेत.



उत्क्रांती तसेच सामाजिक स्थित्यंतराच्या कालौघात मानवाने असंख्य आपत्तींचा सामना केला. उत्पात, संसर्गजन्य विषाणू, साथीचे रोग याखेरीज संसाधने व भूभाग काबीज करण्यासाठी तसेच जात-वर्ग-वर्ण वर्चस्ववादी युद्धांमुळे कोट्यवधींची हत्या, वंशसंहार घडले, विसावे शतक मानव समाजाच्या इतिहासात महाहिंसेचे शतक म्हणून नोंदले गेले. वसाहतवाद व संसाधनाच्या दोहनमुळे ४६० कोटी वर्षे आयुर्मानाच्या पृथ्वीला औद्योगिक क्रांतीनंतरच्या दोन-अडीचशे वर्षांत तापमानवाढीच्या संकटात लोटले. याला मुख्यत: कारणीभूत जीवाश्म इंधन (कोळसा, तेल, वायू) वापरामुळे होणारे कर्ब व अन्य विषारी वायूंच्या उत्सर्जनात झालेली अफाट वाढ हे लक्षणीय प्रमाणात हवामानबदल घडवू लागले. ही जगासमोरील अव्वल समस्या आहे.



सोबतच निसर्गचक्र व त्याची एकात्मता समजून न घेता कीड व विषाणूंवर वर्चस्वासाठी डीडीटीसारखी घातक रसायने शोधून त्याचा अनाठायी वापर सुरू केला. रॅचेल कार्सन या जीवशास्त्रज्ञ बाईंनी ‘सायलंटस्प्रिंग’ या पुस्तकात त्याचा पर्दाफाश केला. आधुनिक पर्यावरणीय चळवळीच्या त्या उद्गात्या मानल्या जातात. २०१२ मध्ये ब्राझीलमधील ‘रिओ+२०’ परिषदेतील सहभागानंतर जेव्हा मी हार्वर्ड विद्यापीठात काही भित्तीचित्रं पाहात होतो तेव्हा कार्सन यांचे लक्षवेधी, मर्मभेदी चित्र व खाली त्यांनी मानवजातीला दिलेली चेतावणी वाचावयास मिळाली. ती अशी : ‘इंडिकेशन ऑयु द हार्म अँड नाट द प्रुफ ऑफ हार्म इज युअर कॉल फॉर अ‍ॅक्शन.’ सांप्रतच्या कोरोनाग्रस्त काळात याची प्रकर्षाणं आठवण होते. भल्या माणसा, आता काय पुरावा हवा आहे? निसर्गात जो अविवेकी हस्तक्षेप केला, त्यामुळे कडेलोट होत असून, जैवविविधतेचा लोप, ऱ्हास; पशुपक्षी, वन्यप्राण्यांचे अधिवास संपुष्टात येणे, याचा परिपाक म्हणजे नवे संसर्ग विषाणू फोफावण्याचे प्रकार घडत आहे.



लॉकडाऊननंतर जगातील शहरं कमी प्रदूषित, शांत, सुसह्य होत असल्याच्या बातम्या म्हणजे निरर्थक वृद्धीची पागलदौड बंद करण्याची कोरोना ही संधी होय. खरं तर गांधीजींनी सेवाग्राम आश्रमात लावलेला ‘पागलदौड’ फलक म्हणजे निसर्गाची ऐशीतैशी करणाऱ्यांना दिलेला परखड इशारा आहे! तात्पर्य, निसर्ग, मानव व समाजाच्या जैव एकात्मतेचे जे नाते, जो जीवन समुच्चय (वेब ऑफ लाईफ) बुद्धापासून गांधींपर्यंतचे तत्त्वज्ञ (थोरो, रस्कीन, टॉल्स्टाय आदी) व रॅचेल कार्सन यांच्यासारख्या मानवतावादी शास्त्रज्ञापासून ग्रेटा थनबर्गसारखी शाळकरी मुलगी जी तथ्ये अधोरेखित करत आहे, त्याचा मानवसमाज आता तरी गांभीर्याने स्वीकार व कृती करेल?

थोडक्यात, विनाशकारी वाढवृद्धी, विकासप्रणाली, जीवनशैलीत जगातील सत्ताधारी, धोरणकर्ते, महाजन, अभिजन आमूलाग्र बदल करतील की लॉकडाऊन उठताच परत अट्टाहासाने, विकासाच्या गोंडस नावाने तोच विमानप्रवास, मोटारवाहने, पंचतारांकित सेवा, आदी सर्व मस्तवालपणे चालू ठेवतील? आजमितीला सत्तेला हे सत्य सांगणं गरजेचं आहे, ही चैनचंगळ परवडणारी नाही.

मंत्री, बडेबाबू, न्यायाधीश, कंपन्यांचे प्रमुख, मी मी म्हणणारे विद्वान, पत्रकार मंडळी सध्या मोटारवाहने बंद झाल्यामुळे प्रदूषण कमी झाल्याने मानवी आरोग्य व पृथ्वीच्या सुरक्षेसाठी वांच्छित असल्याचे मानत असतील, तर यापैकी प्रत्येकाने यापुढे ही वाहने, निरर्थक प्रवास याला सोडचिठ्ठी देण्यास काय अडसर आहे?



‘कोरोना’चा ढळढळीत धडा असा आहे की, यापुढे जगाला नव्या परिस्थितीजन्य संस्कृतीची नितांत गरज आहे. वसुंधरेचे रक्षण केले, तरच मानव निरोगी, सुखी राहू शकेल. किंबहुना, विकासाची प्रचलित संकल्पना, समीकरणे यात मूलभूत परिवर्तन आवश्यक आहे. सुदैवाने पर्याय उपलब्ध आहेत. यासंदर्भात डिजिटल तंत्रज्ञान, माहिती संसाधने, इंटरनेटची सार्वत्रिक उपलब्धता नि विपुल विदासंपदा याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यासाठी वसुंधरा दिनी प्रतिज्ञा करावी की, ‘जगडव्याळ विचार, स्थानिक कृती व जो बदल वांच्छित आहे तो स्वत: बनणे.’ वसुंधरेचे रक्षण हा २१व्या शतकाचा युगधर्म आहे.

पर्यावरण, परिस्थितीजन्य निसर्गव्यवस्था हा मानवाच्या भरणपोषण, जनकल्याणाचा मूलाधार असून प्रकल्प, योजना, बांधकामे पर्यावरणीय परिणामाची शहानिशा केल्याखेरीज राबवू नयेत! एकंदरीत, यापुढे विकास व प्रशासनाचा ढाचा यात आमूलाग्र बदल करून भारताला मोदींची पाच ट्रिलियन डॉलर व महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर (फडणवीस उवाच) अर्थव्यवस्था बनविण्याच्या बातम्यांना सोडचिठ्ठी देऊन सर्वांच्या मूलभूत गरजा भागवणारी विकेंद्रित, स्वदेशी, श्रमजिवींचा सन्मान करणारी अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था व संस्कृती निर्माण करणे ही वसुंधरा दिनाची आर्त हाक आहे. आज, २२ एप्रिलला केंद्र, राज्य सरकारे व जिल्हा प्रशासनांनी महात्मा गांधींचे स्मरण करून त्यांच्या स्वप्नांचा देश निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, प्रतिज्ञा घ्यावी.

Web Title: coronavirus need of new situational living culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.