CoronaVirus News : डॉक्टर मित्रांनो, ही वेळ पैसे कमावण्याची नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 06:34 AM2021-04-15T06:34:06+5:302021-04-15T06:34:28+5:30
Doctors : ही वेळ रुग्णांना विश्वासात घेण्याची आहे. परिस्थिती किती बिकट आहे, हे सर्वच जाणतात. म्हणूनच प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे.
- डॉ. हिंमतराव बावस्कर
(ख्यातनाम वैद्यक आणि संशोधक)
डिसेंबर २०१९ ला वुहान या चीनच्या भागात कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाला, ही इंडेक्स केस होय. त्यानंतर जगभरात या महामारीचे थैमान सुरू झाले, ते वर्ष उलटले तरी अद्याप सुरूच आहे. सध्या अवघे जग हे एक घर झाले आहे. विमान प्रवाशांकडून हा रोग जगात पसरला. प्रगत देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण भारतापेक्षा खूपच जास्त आहे. याचे कारण म्हणजे तिथे ताबडतोब मिळत असलेल्या अत्याधुनिक सुविधांचा अतिरेक. जास्तीतजास्त रुग्णांसाठी कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रे जरुरीपेक्षा जास्त प्रमाणात वापरली जात आहेत.
हा रोग आमच्या कोकणात हमखास येणार याची मला पूर्वकल्पना होती. कारण जवळ असलेली मुंबई, जिथून रोज येणे-जाणे आहे. शिवाय समुद्रकिनाऱ्यावरील दमट वातावरण ह्या विषाणूंसाठी फारच पौष्टिक!
जानेवारी २०२० ते मार्चपर्यंत लॅनसेट, ब्रिटिश मेडिकल जर्नल, इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन यामध्ये कोरोनाबद्दल खूपच माहिती प्रसिद्ध होत होती. मी त्यावर लक्ष ठेवून होतो. कोरोनाचे रुग्ण आपण तपासायचे हे मी व माझी पत्नी - आम्ही दोघांनी ठरवले. अगोदर आपण या रोगापासून सुरक्षित कसे राहायचे ते वाचून शिकून घेतले. मास्क, शिल्ड.
प्रत्येक रुग्ण तपासल्यानंतर सॅनिटेशन, हात साफ करणे, एका वेळेस एकाच रुग्णास आत घेणे व त्यानेही मास्क पूर्ण लावणे म्हणजे नाक पूर्ण कव्हर करणे; कारण नाकातील पेशीत या विषाणूचे रेसिपिटर्स २०० ते ५०० प्रमाणात असतात म्हणजे हा विषाणू नाकाद्वारे शिरतो. तसेच रुग्ण कमीतकमी वेळेत तपासणे! अशा अनेक गोष्टी आम्ही आधीच ठरवून घेतल्या आणि त्याप्रमाणे रुग्णांची आणि स्वत:चीही काळजी घेतली.
या काळात कोरोनाची लस उपलब्ध नव्हती. लहान मुलांना सहसा कोरोना होत नाही याचे कारण म्हणजे बी सी जी व एम एम आर लसीकरण. आम्ही दोघांनीही एम एम आर व बी सी जी या लसी एप्रिल महिन्यात घेतल्या. १९ व्या शतकात प्लेगच्या साथीने खूपच रुग्ण दगावले. गावेच्या गावे खाली झाली. सावित्रीबाई फुलेंनी डॉक्टर यशवंतना बोलावून घेतले व हडपसरमध्ये झोपडीत दवाखाना उघडून शुश्रूषा सुरू केली. सावित्राबाईंच्या कार्यकर्त्याला प्लेग झाला, तेव्हा त्याला कुणी हात लावेना. शेवटी सावित्रीबाईंनीच त्याला पाठीवर घेतले व दवाखान्यात नेले. नंतर सावित्रीबाईंना प्लेग झाला व त्यातच दगावल्या.
या घटनेला शंभर वर्षे होऊन गेली आहेत आणि वैद्यक कितीतरी प्रगत झाले आहे. अशा कसोटीच्या काळात डॉक्टरांनी नेमके काय करायला हवे याची प्रेरणा हवी असेल, तर १०० वर्षांपूर्वीच्या सावित्राबाई पुरेशा आहेत, असे मला वाटते. बावसकर कोरोनाचे रुग्ण तपासतात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली; कारण महाडमध्ये पहिला रुग्ण एप्रिल महिन्यात ॲडमिट झाला. सुरुवातीला कोणीही डॉक्टर या रुग्णांस थारा देत नव्हते. आमच्याकडे रुग्णांची रीघ लागली. आम्ही आमच्या परीने शक्य ते सर्व करू लागलो. या काळात आम्ही एकूण ६५४ रुग्ण तपासले. त्यापैकी फक्त ११ (१.६%) दगावले व फारच कमी लोकांना ऑक्सिजन लावावा लागला. या सर्व रुग्णांना आम्ही नेहमीइतकाच चार्ज लावला; कारण तेच उचित होते. ज्या लोकांना ऑक्सिजनची जरुरी आहे त्यांना घरीच ऑक्सिजन सिलिंडर व इतर साहित्य उपलब्ध करून दिले. ही साधने कशी वापरायची याचे प्रशिक्षणही आम्ही आमच्या रुग्णांना देत राहिलो. त्याचा खूपच मोठा उपयोग झाला. मुख्य म्हणजे अतिरेकी भीती निर्माण न होता हे रुग्ण आजाराला धैर्याने सामोरे गेले.
परिस्थिती बिकट आहे. हे आपल्या अवघ्या जगावरचे, आपल्या देशावरचे जीवघेणे संकट आहे. अशा वेळेसच आपल्या धैर्याची आणि वैद्यकीय सेवा सुरू करताना घेतलेल्या शपथेची कसोटी लागते, असे मी मानतो. माझे सर्व डॉक्टर मित्रांना आवाहन आहे की, ही वेळ पैसे कमावण्याची, व्यवसाय करण्याची नाही. ही वेळ आपल्यातल्या सेवाधर्माला जागण्याची आहे. कुठल्याही अत्याधुनिक आरोग्य सुविधा नसताना केवळ जुजबी साधने, ऑक्सिजन, शब्दांनी देता येऊ शकणारा धीर आणि योग्य ते प्रशिक्षण एवढ्याच बळावर आम्ही कोकणात काम करतो आहोत. इच्छाशक्ती असलेल्या कुणालाही हे जमू शकते. सध्या शहरातल्या आरोग्य व्यवस्थेत चाललेल्या गोंधळाच्या, रुग्णांनी डॉक्टरांवर केलेल्या आरोपांच्या बातम्या वाचतो, तेव्हा मला क्लेश होतात. हे टाळता येऊ शकते. ही वेळ रुग्णांना विश्वासात घेण्याची आहे. परिस्थिती किती बिकट आहे, हे सर्वच जाणतात. म्हणूनच प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे.
माझी पत्नी प्रमोदिनीचे वय आता ६५ आहे आणि मी ७० वर्षांचा आहे. तीही माझ्याबरोबरीने या सेवाकार्याला उभी राहिलेली आहे. शिवाय मला उच्चक्तदाब, हायपोथायरॉईड आहे. आमची मुले म्हणतात, तुमचे वय जास्त आहे, तुम्हाला संसर्गभय अधिक आहे. तेव्हा तुम्ही हा धोका पत्करू नका. पण, मुलांचे ऐकायला सध्या आमच्याकडे वेळच नाही अशी परिस्थिती आहे. मी मुलांना म्हटले, अशी संधी डॉक्टरांच्या जीवनात क्वचितच येत असते. एक डॉक्टर म्हणून स्वत:साठी आणि रुग्णांना बरे करण्यासाठी या संधीचा फायदा आम्ही घेणार आहोत. डॉक्टरांनी मरणासन्न अवस्थेतील रुग्णास उभे करायचे असते, त्याला खांदा द्यायचा नसतो.
himmatbawaskar@rediffmail.com