Coronavirus : जनाची नाही, मनाची तरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 02:28 AM2020-03-24T02:28:37+5:302020-03-24T02:28:50+5:30
coronavirus : वैद्यकीय संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी तर ‘मी हात जोडतो, पाया पडतो, पण बिनकामाचे घराबाहेर पडू नका’, असे सांगितले. त्याचाही परिणाम होताना दिसत नाही.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीजवळ गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सगळ्या पक्षांचे नेते, या क्षेत्रातील जगभरातले अभ्यासक, तज्ज्ञ डॉक्टर, वैज्ञानिक घसा कोरडा करून सांगत आहेत. ‘घरात बसा, कोरोना संसर्गाची साखळी त्याशिवाय तुटणार नाही. सक्ती किंवा सरकारी जबरदस्ती करायला भाग पाडू नका,’ तरीही महाराष्ट्रावर याचा कसलाही परिणाम होताना दिसत नाही. राज्याचे वैद्यकीय संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी तर ‘मी हात जोडतो, पाया पडतो, पण बिनकामाचे घराबाहेर पडू नका’, असे सांगितले. त्याचाही परिणाम होताना दिसत नाही.
चीनमधून सुरुवात झालेला हा विषाणू आता जगभरात पसरला आहे. चीनने तत्काळ यावर उपाय शोधला आणि त्यांची शहरे तातडीने कडेकोट बंद करून टाकली. त्याचा परिणाम काही दिवसांतच समोर आला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत चीनमध्ये एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. मात्र इटली, फ्रान्स, अमेरिका या देशांमध्ये लोकांना काही सांगण्याचा किंवा सल्ले देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांना त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आल्यासारखे वाटते. त्यामुळे त्या देशांनी वारंवार सांगूनही तिथल्या नागरिकांनी सरकारचे म्हणणे ऐकले नाही. परिणामी इटलीतील बाधित भागात मरून पडलेले लोक नेण्यासाठी नातेवाईक पुढे येताना दिसत नाहीत. ज्या देशातील लोक तसेही कोणामध्ये फारसे मिसळत नाहीत, फारसे ‘सोशल’ नाहीत त्या देशांमध्ये कोरोनाने हाहाकार उडवला आहे. एकट्या इटलीत एका दिवसात ८०० हून अधिक लोकांचे जीव गेले.
प्रेते नेण्यासाठी लष्कराच्या गाड्या आणाव्या लागल्या. भारत हा तर सभा, समारंभात रमणारा देश. येथे कधीही, कशासाठीही सहज गर्दी होऊ शकते. अशा वेळी सामाजिक जीवनात बाळगायची शिस्त कोणी फारशी पाळत नाही. त्यामुळे आपल्याकडे कोरोना तिसऱ्या टप्प्यात शिरला तर चीन, इटलीपेक्षा भयावह परिस्थिती येऊ शकते. म्हणूनच सगळे वारंवार सांगत आहेत. घराबाहेर पडू नका, अशा विनवण्या करत आहेत. तरीही महाराष्टÑ हे गांभीर्याने घ्यायला तयार नाही. लोक स्वत:ला समजतात तरी काय कोणास ठाऊक? कोरोनावरून सोशल मीडियात वाट्टेल ते विनोद, आचरट विचकट किस्से, अफवा, अश्लील चित्रफिती पसरवण्यात काही महाभागांना आनंद वाटतोय.
जे कोणी अशा गोष्टी करत आहेत त्यांच्या घरात कोरोनाचा रुग्ण आढळला तर ते असेच वागतील का? याचे उत्तर त्यांनी स्वत:लाच द्यावे. कशाची मस्ती, झींग अशा लोकांना आली आहे? काही जण ‘आम्ही खासगी नोकºया करतो, आमचे पोट हातावर आहे’ अशी कारणे पुढे करत आहेत. मात्र आपल्याकडे दंगल झाली असती, कर्फ्यू लावण्याची वेळ आली असती तर, तेव्हा आम्ही असेच वागलो असतो का? दुर्दैवाने आपण तिसºया-चौथ्या टप्प्यात गेलो तर आपल्याकडे लाखो रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल्स नाहीत, डॉक्टर नाहीत. रुग्णालयांमधून खाटाही मिळणार नाहीत. उपचारांअभावी अनेकांचे तडफडून जीव जातील. जागतिक आरोग्यतज्ज्ञ रामानन लक्ष्मीनारायण यांच्या मते भारतात जर हा आजार पसरला तर ६० टक्के भारतीयांना याची लागण होऊ शकते. याचा अर्थ १३० कोटी लोकसंख्येपैकी ७० ते ७५ कोटी जनतेला कोरोनाची लागण होईल. हे वाचताना अतिशयोक्तीपूर्ण वाटेल, पण आज राज्यातील लोक हे विधान खरे ठरवण्याच्या मागेच लागल्यासारखे वागताना दिसत आहेत.
पैसे कधीही कमावता येतील, मात्र जीव गेला तर तो कधीच परत येणार नाही. इटली, फ्रान्समधल्या महाराष्टÑातील तरुणांनी संदेश पाठवणे सुरू केले आहे. काय घडू शकते हे आम्ही अनुभवले आहे, घरात बसा, असे ते तरुण कळवळून सांगत आहेत. आम्ही मात्र हाती तिरंगा घेऊन जल्लोष करत फिरण्यात धन्यता मानत आहोत. ही देशभक्ती नाही. हा देशाशी केलेला द्रोह आहे. असे लोक केवळ स्वत:चाच नाही तर आपल्या आप्तस्वकीयांचा जीवही धोक्यात घालत आहेत. घरात बसून विराट कोहलीला क्रिकेटचे धडे देण्यात ज्यांची हयात जाते त्यांना देशभक्ती काय कळणार? वेळ गेलेली नाही. अजूनही भानावर या. घरात बसून देशभक्ती दाखवा. जनाची नाही तरी मनाची तरी बाळगा.