Coronavirus:... आता भारतीय अब्जाधीशांचे विदेशी स्थलांतर
By संदीप प्रधान | Published: May 25, 2021 05:43 AM2021-05-25T05:43:11+5:302021-05-25T05:44:37+5:30
Coronavirus: कोरोनामुळे गोरगरिबांवर स्थलांतराची वेळ आलीच; पण याच काळात विदेशी नागरिकत्व घेऊन अतिश्रीमंतही देशाबाहेर जाऊ लागले आहेत!
- संदीप प्रधान
(वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत)
भारतीय कोरोनाचा सामना करीत असताना त्यांच्या बचावाकरिता कोविशिल्ड या लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला हे भारतामधील काही राजकीय नेते व उद्योगपती यांच्याकडून लसीचा पुरवठा करण्याकरिता धमक्या मिळाल्याने लंडनला निघून गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पूनावाला हे आता परत येणार नाहीत, अशा वावड्या उठल्यानंतर खुद्द अदर व त्यांचे पिताश्री सायरस पूनावाला यांनी त्याचा इन्कार केला. दरवर्षी मे महिन्यात हवापालटाकरिता आम्ही लंडनला येतो, असा खुलासाही त्यांनी केला. पूनावाला जरी देश सोडून गेले नसले तरी ‘ग्लोबल वेल्थ मायग्रेशन रिव्ह्यू’च्या ताज्या अहवालानुसार, २०२० या वर्षात भारतामधील सात हजार कोट्यधीश, अब्जाधीश यांनी भारत सोडून विदेशाचे नागरिकत्व स्वीकारले. कोरोनामुळे हातावर पोट असणारे मजूर, कामगार पहिल्या लाटेच्या वेळी शहरातून हाकलले गेले तेव्हा हजारो कि.मी. पायी चालत त्यांच्या बिहार, झारखंड येथील गावी गेले. दुसऱ्या लाटेच्या वेळेही मजुरांनी स्थलांतर केले. दुसऱ्या लाटेत मध्यमवर्गीयांच्या सोसायट्या, कॉम्प्लेक्समध्ये कोरोना रुग्ण वाढू लागल्याने त्यांनीही गावी जाणे पसंत केले. ज्यांनी अलिबाग, मुरूड, लोणावळा, तळेगाव अशा ठिकाणी सेकंड होम घेतले आहे. त्यांनी गर्दीच्या कॉम्प्लेक्समध्ये राहण्यापेक्षा सेकंड होमकडे मोर्चा वळविला. म्हणजे कोरोनामुळे गोरगरिबांपासून अतिश्रीमंतांपर्यंत साऱ्यांनी स्थलांतर केले. मात्र, श्रीमंतांच्या स्थलांतराची फार चर्चा झाली नाही. ती या अहवालाच्या निमित्ताने सुरू झाली.
जगभरात कोरोनाने डोके वर काढेपर्यंत म्हणजे २०१९ पर्यंत अतिश्रीमंतांकरिता भारत सोडून स्थायिक होण्याकरिता ऑस्ट्रेलिया, अमेरिका, स्वीत्झर्लंड, कॅनडा, सिंगापूर, इस्रायल, न्यूझीलंड, संयुक्त अरब अमिरात, पोर्तुगाल हे देश लोकप्रिय होते. याखेरीज मोनॅको, मॉरिशस, माल्टा, बर्मुडा, कॅरेबियन आयलंड येथेही श्रीमंत भारतीय नागरिकत्व घेऊन स्थायिक होत आले आहेत. अतिश्रीमंतांना भुरळ घालणाऱ्या शहरांमध्ये सिडनी, जिनिव्हा, मेलबर्न, सिंगापूर, दुबई, तेलअविव, लिस्बन या शहरांचा समावेश आहे. कोरोनाचा उद्रेक जगभर असून, अमेरिका, युरोपातील देश येथेही कोरोनामुळे लॉकडाऊन लागले, मृत्यू झाले. त्यामुळे आता भारतामधील श्रीमंतांच्या नागरिकत्व स्वीकारून स्थायिक होण्याच्या पसंतीक्रमात थोडा बदल झाला असून, पुढील दशकात न्यूझीलंडमध्ये स्थायिक होण्यास अधिक पसंती लाभेल, असा या अहवालाचा कयास आहे. याखेरीज आतापर्यंत पसंती असलेल्या ऑस्ट्रेलिया, अमेरिका, स्वीत्झर्लंड या देशांचा समावेश आहेच. कोरोनाचा प्रसार रोखण्यात सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस हे देश पुढील दशकात अतिश्रीमंतांकरिता आकर्षण ठरतील, असा अंदाज आहे.
कोरोनामुळे गोरगरिबांचे कंबरडे पार मोडले आहे. मध्यमवर्गीयांकडील गंगाजळी आटली आहे. वेतनकपात, बेरोजगारी यामुळे मध्यमवर्ग मेटाकुटीला आला आहे. कोरोनाची तिसरी, चौथी लाट खरोखरच आली आणि लॉकडाऊन अपरिहार्य झाले, तर उद्रेकाची स्थिती भारतात निर्माण होईल. मात्र, गेल्या दीड वर्षात कोरोना काळात भारतामधील अब्जाधीशांची संख्या ४० ने वाढून १५३ झाली आहे. ही किमया तीन कारणांमुळे झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. श्रीमंतांच्या शेअर बाजारातील गुंतवणुकीचे मूल्य वाढणे, कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेले उद्योग विकत घेतल्याने (ॲक्विझेशन) किंवा असलेल्या उद्योगांचे मर्जर झाल्याने अब्जाधीश होण्याच्या सीमारेषेवर असलेले अब्जाधीश झाले. कोरोना काळात औषधनिर्मिती व लॉजिस्टिक क्षेत्राला सुगीचे दिवस आले. या क्षेत्रात असलेल्यांना प्रचंड नफा झाल्याने ते अब्जाधीश झाले. महाराष्ट्रातील व अन्य राज्यांतील काही प्रमुख राजकीय नेत्यांनी औषधनिर्मितीच्या क्षेत्रात गुंतवणूक करून आपले उखळ पांढरे करून घेतल्याचीही चर्चा आहे. जगभरातील १३ दशलक्ष श्रीमंत, अतिश्रीमंतांकडे एकूण १८४ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी संपत्ती आहे. यामध्ये एक अब्ज व त्यापेक्षा जास्त मालमत्ता असलेल्यांची संख्या एक हजार ९२० आहे.
अतिश्रीमंतांनी भारत सोडून विदेशात स्थायिक होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये देशातील वाढती गुन्हेगारी, विदेशात शिक्षणाच्या-आरोग्याच्या उत्तम सुविधा, उद्योगाची संधी, प्रदूषण कमी असणे, विदेशातील कर रचना, उच्च जीवनमान अशी कारणे आहेत. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात १२ हजार, अमेरिकेत १० हजार ८००, स्वीत्झर्लंडमध्ये चार हजार, कॅनडात २२००, तर सिंगापूरमध्ये १५०० अतिश्रीमंत, श्रीमंत व्यक्ती नागरिकत्व घेऊन स्थायिक झाल्या. यामध्ये चीनमधील सोळा हजार, भारतामधील सात हजार श्रीमंतांचा समावेश आहे. श्रीमंतांनी चीन सोडून विदेशात स्थायिक होण्याचा विषय कोरोनाचा उद्रेक होईपर्यंत या देशाकरिता चिंतेचा विषय नव्हता. चिनी अर्थव्यवस्था नवनवीन श्रीमंत, अतिश्रीमंत व्यक्तींना आपल्या पायावर उभी करीत आली. अलिबाबा ग्रुपचे जॅक मा यांनी अलीकडेच चीनमधील आर्थिक व्यवस्थेवर टीकास्त्र सोडल्यानंतर गायब होणे व त्यांना बसलेला फटका हे चिनी सरकार अतिश्रीमंतांची पत्रास ठेवत नसल्याचे ठळक उदाहरण आहे. मात्र, गेल्या दीडेक वर्षात अमेरिका-चीन यांच्यात सुरू असलेले व्यापार युद्ध, हाँगकाँगमधील निदर्शने, कोरोना विषाणू जगभर पसरविल्याचा चीनवर बसलेला शिक्का आणि चीनचे ऑस्ट्रेलियासोबत बिघडलेले संबंध यामुळे अतिश्रीमंतांचे स्थलांतर व संपत्ती वाढीच्या दृष्टीने येणारी काही वर्षे चीनकरिता चिंताजनक असतील, असा या अहवालाचा निष्कर्ष आहे.
कोरोनामुळे अतिश्रीमंतांच्या सवयीत बरेच बदल झाले आहेत. कमर्शियल एअरलाइन्सने प्रवास करणे अतिश्रीमंत टाळू लागले असून, प्रायव्हेट जेट घेऊन फिरण्याकडे कल वाढला आहे. अनेकांनी लंडन, ऑस्ट्रेलियातील मोठ्या शहरांमध्ये वास्तव्य करण्यापेक्षा मोठ्या शहरांलगत असलेल्या उपनगरात वास्तव्य करणे पसंत केले आहे. अनेक देशांमधील विमानसेवा बंद असल्याने आंतरराष्ट्रीय पर्यटनापेक्षा देशांतर्गत पर्यटनाकडील श्रीमंतांचा कल वाढला आहे. विदेशातील सार्वजनिक वाहतुकीचा वापर अतिश्रीमंतांनी बंद केला आहे. कोरोना काळात भारतामधील श्रीमंत, अतिश्रीमंतांच्या जगात काय घडले त्यावर या अहवालाने प्रकाश टाकला आहे.