CoronaVirus : देशभक्तीची कसोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 12:21 AM2020-03-27T00:21:44+5:302020-03-27T00:24:15+5:30
CoronaVirus : २१ दिवसांच्या देशव्यापी ‘लॉकडाऊन’ची घोषणा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकल्यावर बव्हंशीनागरिकांच्या छातीत आभाळ कोसळल्यागत धस्स झाले.
प्रत्येक देशाच्या, त्याच्या नेतृत्वाच्या आणि नागरिकाच्या आयुष्यात निर्णायक कसोटीची वेळ येत असते. सध्याचे कोरोनाचे संकट ही अशीच वेळ आहे. या संकटावर एकजुटीने आणि निर्धाराने मात केल्याच्या समाधानाने भविष्यात ताठ मानेने फिरायचे की अपयशाने शर्मिंदे होऊन मान खाली घालून फिरायचे, याचा फैसला प्रत्येक नागरिकाच्या हाती आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या कृतीचे परिणाम संपूर्ण देशाशी निगडित आहेत, याचे गांभीर्याने भान ठेवणे गरजेचे आहे. एरवी कोणत्याही देशावर आपत्ती आली की संपूर्ण जग मदतीला धावून येते. पण हे संकटच असे आहे की, फक्त आपणच आपल्याला वाचवू शकतो.
२१ दिवसांच्या देशव्यापी ‘लॉकडाऊन’ची घोषणा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकल्यावर बव्हंशीनागरिकांच्या छातीत आभाळ कोसळल्यागत धस्स झाले. मोदींनी हा निर्णय घेण्याचे धाष्टर्य दाखवून नेतृत्वाची अर्धीअधिक कसोटी पार केली आहे. आता नागरिकांची व पर्यायाने संपूर्ण देशाची कसोटी आहे. हा न भूतो निर्णय घेण्यामागचा एकमेव उद्देश व त्यासाठी २१ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यामागचे कारण समजून घेतले तर या कसोटीस उतरणे सोपे जाईल. शिवाय चीनच्या ज्या ह्युबेई प्रांतात व वुहान शहरात हा कोरोनारूपी भस्मासूर सर्वप्रथम बाटलीतून बाहेर आला. तिथे गेले दोन महिने पूर्णपणे बंद असलेले सार्वजनिक व्यवहार व वाहतूक आपल्या या निर्णयाच्या दिवशीच पुन्हा सुरळीत सुरू होणे, हा शुभसंकेतही आपला निर्धार वाढविणारा आहे.
या २१ दिवसांच्या ‘लॉकडाऊन’ने व त्या काळात पाळायच्या ‘सोशल डिस्टन्सिंग’ने कोरोना विषाणूचे भारतातून समूळ उच्चाटन होईल, हा भ्रम सर्वप्रथम डोक्यातून काढून टाकावा लागेल. कोरोनाविरुद्धची ही लढाई अधिक सुसज्जतेने व प्रभावीपणे लढण्यास थोडी उसंत मिळावी, एवढाच याचा उद्देश आहे. या मर्यादित उद्दिष्टासाठी एवढी मोठी किंमत मोजावी लागत असेल तर ही उसंत आपण यशस्वीपणे मिळविली नाही तर देशात केवढा हाहाकार माजेल, याची कल्पनाही करवत नाही. कोरोनाचा संसर्ग फक्त माणसाकडून माणसाला होतो व शरीरात प्रवेश केल्यानंतर या विषाणूने पुनरुत्पादनाने घट्ट पाय रोवायला साधारणपणे १४ दिवस लागतात, ही या उपायामागची दोन मुख्य वैज्ञानिक गृहितके आहेत.
लागण झालेल्या व्यक्तीमध्ये पहिल्या सात दिवसांत लक्षणे दिसू लागतात. मात्र काही बाधित व्यक्तींमध्ये कित्येक आठवडे लक्षणे दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार फक्त लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीपुरता मर्यादित नाही. त्यामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’ शत-प्रतिशत पाळून ‘लॉकडाऊन’ची कठोर अंमलबजावणी झाली तर आतापर्यंत ज्यांना कुणाला लागण झाली असेल त्यांच्यातील बहुतेकांना लक्षणे दिसू लागतील. शिवाय त्यांच्यापासून पुढे लागण होण्याचा धोका अशा व्यक्तींच्या कुटुंबीयांपुरताच मर्यादित होईल. या दुय्यम संसर्गाची लक्षणेही ‘लॉकडाऊन’च्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत स्पष्ट होतील. संपूर्ण देशाने सलग २१ दिवस एवढ्या हालअपेष्टा सोसल्यानंतर फलनिष्पत्ती एवढीच की, प्रत्यक्ष बाधित आाणि संभाव्य बाधित अशा वर्गाचे एक बºयापैकी निश्चित असे चित्र स्पष्ट होईल. हे होईपर्यंत कदाचित बाधितांची संख्या आताच्या तुलनेत काही पटींनी वाढलेली असू शकेल. पण तरीही ती संख्या देशातील सध्याच्या वैद्यकीय सोयी-सुविधांच्या तुलनेत हाताळण्याजोगी असेल. त्यामुळे वज्रनिर्धाराने परिस्थिती वेळीच आटोक्यात ठेवायची की गाफील राहून बेजबाबदारपणे ती हाताबाहेर जाऊ द्यायची, याचा फैसला करणे आपल्या हाती आहे.
महाभारतातील युद्ध १८ दिवसांत संपले. पण कोरोनाविरुद्धचे युद्ध २१ दिवस लढावे लागणार आहे, हे मोदींनी अधोरेखित केले आहे. महाभारतातील युद्धाप्रमाणे हे युद्धही आपणच आपल्याविरुद्ध लढणार आहोत. यात हार किंवा जीत फक्त आपलीच होऊ शकते. ज्ञात व दृश्य शत्रूंपासून देशाच्या सीमांचे रक्षण करण्यास आपली सैन्यदले समर्थ आहेत. पण हा न दिसणारा शत्रू नकळत सीमा ओलांडून देशात घुसला आहे. त्याला चारीमुंड्या चित करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला सैनिक व्हावे लागेल. प्रत्येकाला देशभक्तीने प्रेरित होण्याची अशी संधी क्वचितच मिळते. तिचे सोने केले नाही तर आपल्यासारखे करंटे आपणच असू!