coronavirus: लॉकडाऊनमधील लाभाकडे दुर्लक्षच...
By किरण अग्रवाल | Published: September 10, 2020 09:17 AM2020-09-10T09:17:24+5:302020-09-10T09:21:08+5:30
कोरोनाच्या महामारीने जो काही उत्पात घडवला आहे त्याने लहानांपासून थोरांपर्यंत सारेच चिंतित आहेत. कमी-अधिक प्रमाणात साऱ्यांनाच त्याचा फटका बसला आहे. आता हळूहळू अनलॉक झाले असले तरी अद्यापही जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलेले नाही.
- किरण अग्रवाल
कोरोनापासून बचावण्यासाठी केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला व त्यातून अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले, त्यामुळे नुकसानदायी अशा अर्थानेच याकडे पाहिले जात असले तरी काही बाबतीत इष्टापत्ती म्हणूनही या संकटाकडे पाहता येणारे आहे; पण कोरोनाच्या अनुषंगाने पॉझिटिव्हपणाचा इतका व असा काही धसका घेतला गेला आहे की निगेटिव्ह बाबीच जास्त लक्षात घेतल्या जाताना दिसत आहेत.
कोरोनाच्या महामारीने जो काही उत्पात घडवला आहे त्याने लहानांपासून थोरांपर्यंत सारेच चिंतित आहेत. कमी-अधिक प्रमाणात साऱ्यांनाच त्याचा फटका बसला आहे. आता हळूहळू अनलॉक झाले असले तरी अद्यापही जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलेले नाही, कारण बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी मनात असलेली सुरक्षेबाबतची भीती संपलेली नाही. पुनश्च हरिओम करताना कोरोनाने सारे संदर्भच बदलून ठेवलेले दिसत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन काळातील अडीअडचणींचाच पाढा अधिकतर वाचला जात असला, तरी त्यातील चांगल्या बाबींकडे मात्र दुर्लक्षच घडून येते आहे म्हणायचे. या काळात सक्तीने घरात बसावे लागलेल्यांना कधी नव्हे ते कुटुंबीयांसाठी व विशेषत: रोजीरोटीच्या झगड्यात धावताना मुलाबाळांकडे व वृद्ध माता-पित्यांकडे लक्ष देता न आलेल्यांना त्यासाठी जी संधी मिळून गेली; त्याचा विचार यासंदर्भात प्रकर्षाने करता येणारा आहे.
महत्त्वाचे म्हणजे सद्य:स्थितीत अनलॉक झाले असले आणि अडचणींचा सामना कायम असला तरी कोरोनामुळे घडून आलेल्या काही परिणामांकडे सकारात्मकतेने पहाता येणारेही आहे. उदाहरणादाखल चर्चा करायची तर, आगामी शिक्षण व्यवस्था ही आॅनलाइन व डिजिटल पद्धतीची राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यादृष्टीने घरातील शाळकरी मुलांच्या हातातही मोबाइल देणे त्यांच्या पालकांना भाग पडले आहे. यात खास आॅनलाइन शिक्षणासाठी मुलांना नवीन मोबाइल घेऊन देणाऱ्यांच्या प्रमाणापेक्षा आईकडे असलेलाच मोबाइल मुलांकडून वापरला जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यात मुलांची सोय होत असतानाच आईच्या हातातील मोबाइल गेल्याने फावल्या वेळात तिचे कॅण्डी क्रश खेळणे बंद होऊन ती कुटुंबाकडे अधिक लक्ष देऊ लागल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर मुले घरातच असल्याने व गृहिणीच्या हातातील मोबाइलही गेल्याने तिच्याकडून आता खाण्यासाठीचे वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस बनविले जाऊ लागले आहेत. त्यामुळे घरात एकत्र बसून त्याचा आस्वाद घेता येऊ लागल्याने या आनंदाकडे दुर्लक्ष कसे करता यावे, तेव्हा या अशा बाबींकडे सकारात्मकतेनेच पाहता यावे.
बालपणातच मुलांवर संस्कार घडून येण्याची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींचीही वेगवेगळ्या बाबतीतली वाढती व्यस्तता चर्चिली जाते. शहरी भागांमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे सुरू झाल्याने बरेचसे ज्येष्ठ या कट्ट्यांवर आपल्या अनुभवाची शिदोरी मोकळी करण्यात समाधान मानतात, त्यात गैर आहे अशातला अजिबात भाग नाही; परंतु त्यांच्याकडून घरातील नातवंडांकडे जितके लक्ष दिले जाणे अपेक्षित असते तितकेसे ते होत नसल्याच्या तक्रारी असतात; परंतु आता कोरोनाच्या भीतीमुळे ज्येष्ठांचेही घराबाहेर पडणे बंद अगर मर्यादित झाल्यामुळे तेदेखील नातवांबरोबर वेळ घालवू लागले आहेत. त्यामुळे बालगोपाळ मंडळी आनंदात असल्याचे दिसून येते. कोरोनाने सर्वांना सारख्याच भीतीच्या छायेत आणून ठेवले आहे, त्यामुळे कौटुंबिक असो अगर सामाजिक; व्यावसायिक असो अगर अन्य कुठल्याही पातळीवरचे, सारे मतभेद व राग-लोभ विसरून प्रत्येकजण फोनवरून का होईना एकमेकांची ख्यालीखुशाली विचारू लागला आहे. यातून परस्परातील आपलेपणाचे जे भावबंध जुळून येत आहेत व सुदृढ होत आहेत ते महत्त्वाचेच नाही का म्हणायचे? विसंवादातून सुसंवादाकडे होत असलेली ही प्रक्रिया कोरोनाच्या भीतीतूनच घडून येते आहे. त्यातील चांगला परिणाम तेवढा लक्षात घ्यायला काय हरकत असावी? याकाळात सारेच काही वाईट, नकारात्मक व अडचणीचेच घडते आहे अशातला भाग नाही. भलेही मर्यादित स्वरूपात असेल; पण थोडे चांगलेही आहे, त्याकडेच आपण बघूया...