Coronavirus: निर्बंधात शिथिलता, पण निग्रह कायम हवा...

By किरण अग्रवाल | Published: June 3, 2021 08:16 AM2021-06-03T08:16:59+5:302021-06-03T08:19:40+5:30

Coronavirus in Maharashtra: कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे हे खरेच, पण म्हणून अनिर्बंधपणे वागले व वावरले जाणार असेल तर तिसऱ्या लाटेला थोपवता येणे मुश्किलच ठरावे.

Coronavirus: Restraint relaxation, but restraint should be maintained | Coronavirus: निर्बंधात शिथिलता, पण निग्रह कायम हवा...

Coronavirus: निर्बंधात शिथिलता, पण निग्रह कायम हवा...

googlenewsNext

- किरण अग्रवाल

कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधात काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली, याचा अर्थ संकट टळले आहे असे अजिबात नाही. संकटाची तलवार आपल्या शिरी लटकलेली आहेच, त्यामुळे निर्बंध शिथिल केले गेले असले तरी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमध्ये (Lockdown) १५ जूनपर्यंत वाढ केलेली आहे हे विसरता येऊ नये; परंतु दुर्दैवाने कोरोना जणू संपला अशा अविर्भावात खबरदारीकडे दुर्लक्ष होताना दिसत असेल तर अवघड आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे हे खरेच, पण म्हणून अनिर्बंधपणे वागले व वावरले जाणार असेल तर तिसऱ्या लाटेला थोपवता येणे मुश्किलच ठरावे. (Coronavirus in Maharashtra)

कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात १ जूनपर्यंत घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन यापुढे १५ जूनपर्यंत वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे, पण तसे करताना ज्या जिल्ह्यांमधील कोरोनाच्या पॉझिटिव्हिटीचा रेट दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे, या जिल्ह्यातील आवश्यक वस्तू व सेवांची एकल दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगीही देण्यात आली आहे; म्हणजेच अशा जिल्ह्यांमध्ये काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिकसह जळगाव, गोंदिया, नांदेड, धुळे, जालना, यवतमाळ, सोलापूर, बुलडाणा आदी जिल्ह्यांचा यात समावेश आहे. निर्बंध शिथिल झाल्यामुळे या जिल्ह्यातील बाजारांमध्ये चैतन्य दिसून आले. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे, तिला या शिथिलतेमुळे काहीशी चालना मिळेल हे खरे, परंतु ज्या अनिर्बंधपणे पूर्ववत सारे सुरू झालेले दिसत आहे ते पुन्हा धोक्याला निमंत्रणच देणारे ठरण्याची भीती आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी त्यात काही नियम आहेत, त्या नियमांना हरताळ फासला जात असल्याचे पाहावयास मिळते. फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याचे कसलेही भान न बाळगता लोकांनी बाजारांमध्ये गर्दी करीत आहेत, ही गर्दी संसर्गाला कारणीभूत ठरू शकणारी असून ज्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्क्यांच्या आत असला तरी काठावर म्हणजे ९ च्या जवळपास आहे, तो यामुळे वाढावयास वेळ लागणार नाही. तसे झाले तर पुन्हा या जिल्ह्यांना कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते, तेव्हा नियम पाळण्याबाबत काळजी घेण्याचा निग्रह गरजेचा आहे.

महत्त्वाचे म्हणजे, तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना अधिक सांगितला जातो आहे, अर्थात, याबद्दलही जाणकार किंवा तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत हा भाग वेगळा; परंतु अहमदनगरसारख्या जिल्ह्यात गेल्या मे महिन्यात सुमारे दहा हजार मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलीत, जो आकडा एप्रिल महिन्यापेक्षा अधिक असल्याचे पाहता मुलांना असलेल्या धोक्याची खात्री पटावी. राज्याच्या अन्य भागातही लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण काहीसे वाढताना दिसत आहे, पण असे असताना त्यांच्याबाबत जी काळजी घ्यायला हवी ती घेतली जाताना दिसत नाही. आता काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आल्यावर कुटुंबेच्या कुटुंबे बाजारासाठी बाहेर पडत आहेत. त्यात गरज नसताना लहान मुलांना सोबत घेतले जात आहे. यातही अनेक ठिकाणी ही लहान मुले मास्कविना बाजारात व गर्दीत फिरत असल्याचे आढळून येते. दुसरे म्हणजे कुटुंब घरात टीव्हीसमोर बसून असताना घरातील लहान मुले मात्र गल्लीत एकत्र येऊन पूर्वीप्रमाणे गप्पागोष्टीत किंवा खेळण्यात रमलेली दिसून येतात, ही बाब संसर्गाला निमंत्रण देणारीच ठरावी. याबाबत पालकांनीच काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पहिल्यापेक्षा अधिक फटका दिला आहे. अर्थकारण तर ढासळले आहेच, परंतु जवळपास प्रत्येक कुटुंबालाच कुण्या न कुण्या प्रिय व्यक्तीला गमावल्याच्या दुःखाला सामोरे जावे लागले आहे. या दुःखासह व प्रचंड भीतीच्या वातावरणात यापुढची वाटचाल करायची आहे, कोलमडून पडलेले सारे काही सावरायचे आहे. त्यासाठी बेफिकीर राहून चालणार नाही. अधिक नुकसान होऊ नये व सामान्यांची अडचण टाळण्यासाठी शासनाने काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता आणली असली तरी, मी जबाबदार बनूनच वागायला अगर वावरायला हवे. कामाखेरीज बाहेर पडायला नको किंवा किरकोळ कामासाठी संपूर्ण कुटुंबाने बाजारात जाण्याची गरज नाही; बाहेर जावे लागले तरी मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्स राखणे... या खरे तर अतिशय साध्या गोष्टी, त्या समोरच्याकडून पाळल्या जाणार नसतील तर आपण त्याला आठवण व जाणीव करून द्यायला हवी; कारण हे संकट एकट्या-दुकट्यावरचे नाही तर सर्वांवरचे आहे. त्यामुळे ते परतवून लावण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम व निर्देश पाळण्याचा आग्रह धरूया.
 

Web Title: Coronavirus: Restraint relaxation, but restraint should be maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.