‘अंदर की बात’… ठाकरे पिता-पुत्राला कसा घडला सोनू सूद ‘चांगला माणूस’ असल्याचा साक्षात्कार?

By संदीप प्रधान | Published: June 9, 2020 07:59 PM2020-06-09T19:59:31+5:302020-06-09T20:19:00+5:30

बाळासाहेबांची शिवसेना व आताची म्हणजे नव्या पिढीची शिवसेना यामध्ये बराच फरक पडला आहे. सेनेतील नवी पिढी पेज थ्री वर्तुळातील आसामींच्या गराड्यात रमते, सोशल मीडियावरील ट्रेन्डचा आदर करते.

Coronavirus: Sonu Sood meeting with CM Uddhav Thackeray and politics behind the issue | ‘अंदर की बात’… ठाकरे पिता-पुत्राला कसा घडला सोनू सूद ‘चांगला माणूस’ असल्याचा साक्षात्कार?

‘अंदर की बात’… ठाकरे पिता-पुत्राला कसा घडला सोनू सूद ‘चांगला माणूस’ असल्याचा साक्षात्कार?

Next
ठळक मुद्देअगोदर समाजकारण व मग राजकारण या मार्गाने जाण्याचा चस्का सोनू सूद यांना लागला असावा. राऊत यांनी सोनूच्या समजसेवेचा रोखठोक समाचार घेतल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सोनू ‘मातोश्री’वर गेला.एकेकाळी संजय राऊत व संजय निरुपम हे भाजपपासून अनेकांवर ‘मातोश्री’च्या इशाऱ्यावरुन टीकास्त्र सोडायचे व मनोहर जोशी त्या व्यक्तीस ‘मातोश्री’वर चर्चेला घेऊन यायचे.

>> संदीप प्रधान

बॉलिवूड सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका करणारे सोनू सूद यांनी कोरोना संकटाच्या काळात मुंबईत अडकलेल्या कामगार, मजुरांची घरी जाण्याची व्यवस्था केली आणि ते वेगळ्या अर्थाने प्रकाशात आले. सूद यांच्या समाजसेवेचा या अगोदर पुरावा उपलब्ध नाही. खरे तर सूद हे ग्लॅमरच्या दुनियेत वावरतात. त्यामुळे राजकारणातील ग्लॅमरची आस त्यांना असायचे कारण नाही. मात्र अगोदर समाजकारण व मग राजकारण या मार्गाने जाण्याचा चस्का त्यांना लागला असावा. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यापासून राज बब्बर यांच्यापर्यंत आणि हेमा मालिनी यांच्यापासून जयाप्रदा यांच्यापर्यंत अनेकांनी मळवलेल्या राजकीय वाटेवरून सूद यांचा भविष्यात प्रवास होणार, अशी चिन्हे दिसत आहेत. किंबहुना सूद यांच्यावरून शिवसेना, भाजप, काँग्रेस वगैरे पक्षात जे राजकारण तापले आहे ते पाहता सूद यांना राजकारणाच्या आखाड्यात ओढले जाईल, अशी चिन्हे आहेत.

मुंबईत पोट भरण्याकरिता मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या व कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने बेरोजगारीच्या झळा सोसत कोंडवाड्यात बसलेल्या मजुरांच्या हालअपेष्टा हा या संकटाच्या काळातही राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विषय झाला. या मजुरांची नेमकी संख्या किती, त्यांची नेमकी भावना काय, याचा अंदाज न घेताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केल्याचे सुरुवातीला सांगत होते. त्यांना दिलासा देत येथेच थांबायचा सल्ला देत होते. प्रत्यक्षात सरकार व सामाजिक संस्थांची यंत्रणा तोकडी पडेल इतकी मोठी या मजुरांची संख्या होती. शिवाय या मजुरांना केवळ बसून जेवण नको होते तर त्यांना हाताला काम हवे होते. ते जर लागलीच मिळत नसेल तर घर गाठायची त्यांची तीव्र इच्छा होती. रात्री आठ वाजता प्रकट होऊन प्रवचन देण्याची सवय जडलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात लागू केलेला कठोर लॉकडाऊन योग्य की अयोग्य हाही वादविषय ठरला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातील मजुरांना त्याचवेळी रेल्वे गाड्यांतून त्यांच्या मूळ गावी जाण्यास परवानगी दिली असती तर कदाचित सुरुवातीलाच हा विषय निकाली निघाला असता, असा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे कोरोना, लॉकडाऊन या सर्वांनाच नव्या असलेल्या संकटात राज्य व केंद्र सरकारही चाचपडत असल्याचे व अडखळल्याचे मान्य करावे लागेल.

जेव्हा मजुरांच्या घरवापसीवरुन राजकारण सुरु झाले तेव्हा मग केंद्र सरकार रेल्वेगाड्या देत नाही, रेल्वेगाड्या दिल्या तर त्यांचे पैसे कोण देणार, मजुरांकडून तिकिटाचे पैसे घ्यायचे किंवा कसे, वेगवेगळी राज्य सरकारे परराज्यातून आलेल्या मजुरांना स्वीकारणार किंवा कसे अशा अनेक मुद्द्यांवरुन राजकारण सुरू राहिले. या काळात सोनू सूद याने बसगाड्यांतून मजुरांची घरी जाण्याची व्यवस्था केली व त्याची सोशल मीडियावर तत्परतेनी प्रसिद्धी केली. राज्यातील सत्तेची पोळी ताटातून हिसकावून घेतली गेल्याने बिथरलेल्या भाजपने राष्ट्रीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार यांच्या माध्यमातून सोनूला मजुरांचा मसिहा म्हणून पुढे केले, असा आरोप शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केला आहे. राज्यातील सरकार हे मजुरांचा प्रश्न हाताळण्यात नाकाम ठरल्याचे दाखवण्याकरिता सोनूला मोहरा केले गेले, असे राऊत यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही सोनूला चहापानाकरिता राजभवनावर बोलावून त्याचे कौतुक करणे हेही राऊत यांना रुचलेले नाही. राऊत यांनी सोनूच्या समजसेवेचा रोखठोक समाचार घेतल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सोनू ‘मातोश्री’वर गेला आणि सोनूमधील ‘चांगल्या माणसाचे’ ठाकरे पिता-पुत्राला दर्शन झाले.

शिवसेनेची कार्यपद्धती वर्षानुवर्षे माहीत असलेल्यांना खरे तर यामध्ये आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. ‘शहेनशहा’ चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर बोफोर्स व्यवहारातील गैरव्यवहाराच्या सहभागावरून टीकास्त्र सोडले होते. लेखणी, वाणी व कुंचला ही तिन्ही शस्त्रे ठाकरे यांच्याकडे होतीच. अखेरीस बच्चन यांनी मातोश्रीवर पायधूळ झाडल्यावर ठाकरे यांना त्यांच्यातील ‘चांगल्या माणसाचा’ साक्षात्कार झाला. पुढे ठाकरे-बच्चन कुटुंबाचा दोस्ताना घट्ट झाला. इतकेच नव्हे तर युतीची सत्ता असताना एका वादग्रस्त प्रकरणात बच्चन यांच्या निवासस्थानी ठाकरे यांनी तत्कालीन पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांची भेट झाली होती. संजय दत्त यांचे नाव मुंबईतील बॉम्बस्फोटांशी जोडले गेल्यावर देशभरात त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू असताना अभिनेता सुनील दत्त हे मातोश्रीची पायरी चढले व तेव्हाही बाळासाहेबांना संजूबाबामधील ‘चांगल्या माणसाची’ ओळख पटली.

वांद्रे येथील एका पुलाच्या उद्घाटन सोहळ्यात युतीच्या मुख्यमंत्र्यांसमक्ष न्यायव्यवस्थेवर शेलक्या शब्दांत टीकास्त्र सोडण्यास ठाकरे यांनी मागेपुढे पाहिले नाही. एकेकाळी संजय राऊत व संजय निरुपम हे भाजपपासून अनेकांवर ‘मातोश्री’च्या इशाऱ्यावरुन टीकास्त्र सोडायचे व मनोहर जोशी त्या व्यक्तीस ‘मातोश्री’वर चर्चेला घेऊन यायचे. आताही राऊत हे राज्यपाल कोश्यारी यांनी सोनूला चहा पाजल्यावरुन आगपाखड करीत असताना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे सांत्वनाला गेलेल्या कोश्यारी यांच्याबरोबर दिवंगत भाजप नेत्या चंद्रकांता गोयल यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षात वेगवेगळ्या नेत्यांना अभिनेते होऊन आपापली भूमिका वठवावी लागते. त्यामुळे राऊत यांनी सोनूच्या पाठीत सोटा हाणायचा आणि त्याचवेळी काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी सोनूला ‘मातोश्री’वर जाण्याचा सल्ला द्यायचा हे घडले किंवा घडवले गेले असेल.

अर्थात बाळासाहेबांची शिवसेना व आताची म्हणजे नव्या पिढीची शिवसेना यामध्ये बराच फरक पडला आहे. सोनूवर मुखपत्रातून टीका झाल्यावर त्याचे समाजमाध्यमात प्रतिसाद उमटले. राऊत यांना ट्रोल केले गेले. सेनेतील नवी पिढी पेज थ्री वर्तुळातील आसामींच्या गराड्यात रमते, सोशल मीडियावरील ट्रेन्डचा आदर करते. त्यामुळे सोनूच्या पाठीवर पडलेल्या सोट्याचे वळ नव्या पिढीच्या पाठीवर उमटलेले असू शकतात. सध्या कोरोनाच्या भीतीपोटी काही मोजक्या नेत्यांचा अपवाद वगळता शिवसैनिकांना प्रवेश बंद असलेल्या ‘मातोश्री’वर सोनू व अस्लम शेख यांना प्रवेश मिळाला, याचे शिवसैनिकांना अप्रुप वाटणे स्वाभाविक होते.

मजुरांकरिता सोनूने एकट्याने बसची व्यवस्था केली नाही. राजस्थान, मध्य प्रदेशपर्यंत बसने आपल्या मतदारसंघातील व्होटबँक असलेल्या मजुरांना सोडण्याकरिता अनेक नेत्यांनी एका बसमागे पाच लाख रुपये मोजले. उत्तर प्रदेश, बिहारकडे बस पाठवायच्या तर एका बसकरिता सात ते आठ लाख रुपये मोजावे लागत होते. सोनूने जेवढ्या बसगाड्यांची व्यवस्था केली ते पाहता त्याला आठ ते दहा कोटी रुपये खर्च करावे लागले असतील. बंगळुरवरुन एक खास विमान कोच्चीला आणून त्यातून केरळच्या ओडिशात अडकलेल्या १७७ मुलींची सुटका जर सोनूने केली असेल तर या चार्टर फ्लाईटकरिताच त्याला किमान ४० ते ५० लाख मोजावे लागले असणार. सोनूला जवळून ओळखणाऱ्यांच्या मते सोनूकडे पैसा असला तरी तो इतका धनाढ्य व्यक्ती नाही की, तो आपली दौलत समाजकार्यावर उधळेल. त्यामुळे महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त सदस्यांच्या यादीत कलाकारांचाच समावेश करण्याच्या कोश्यारी यांच्या आग्रहाची कुणकुण लागल्याने ही संधी साधण्याकरिता सोनूने पदराला खार लावला का? सोनूच्या नावाचा आग्रह जर राजभवानाकडून धरला जाणार असेल तर सोनूने तत्पूर्वी ‘मातोश्री’वर येऊन ‘चांगला माणूस’ असल्याचे प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक असल्याने हे सारे घडले का? असे अनेक किंतुपरंतु यातून निर्माण झालेत.

एक गोष्ट स्पष्ट आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मुंबईत मजुरांचा मुद्दा तापवला जाणार आहे. मनसेला मजूर परत येताना त्यांची नोंदणी हवी. मजुरांच्या नोंदणीला काँग्रेस विरोध करणार. शिवसेनेला मराठी माणसांबरोबरच परप्रांतीय मजुरांची मते हवी आणि भाजप व काँग्रेस तर मजुरांकडे व्होटबँक म्हणून पाहतच आहे. सोनू सूदच्या निमित्ताने राजकारणाची संधी साधली गेलीच. आता सोनू यात संधी साधणार का, ते लवकरच कळेल.

Web Title: Coronavirus: Sonu Sood meeting with CM Uddhav Thackeray and politics behind the issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.