CoronaVirus : ‘स्टॅच्यू’ पोरखेळ नव्हे, जिद्दीने सामना व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 03:10 AM2020-03-28T03:10:47+5:302020-03-28T03:11:05+5:30
Coronavirus : गेल्या दोन महिन्यात सोशल मीडियातून भीतिदायक व्हिडिओ आणि चुकीची माहिती येत राहिल्याने डोक्याची कचराकुंडी झाली आहे.
- विकास झाडे
(संपादक, लोकमत, दिल्ली)
सध्या जगापुढे एकमेव विषय आहे, कोरोना विषाणूचा! केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक व्यक्ती भीतिग्रस्त आहे. रुग्णांचे दररोजचे आकडे हिमालयाकडे कूच करणारे दिसतात. देशाची लोकसंख्या १३० कोटी असल्याने अत्यंत विपरीत परिणाम होतील, या कल्पनेनेच सगळ्यांचा थरकाप उडाला आहे. साधा खोकला आणि शिंक आली तरी, पहिली शंका असते आपणही कोरोनाच्या रांगेत लागलो तर नाही ना याची. गेल्या दोन महिन्यात सोशल मीडियातून भीतिदायक व्हिडिओ आणि चुकीची माहिती येत राहिल्याने डोक्याची कचराकुंडी झाली आहे. यातून बाहेर निघायला बराच वेळ लागेल. परंतु भारताची अशी भयावह अवस्था का झाली असावी, यावरही मंथन होणे गरजेचे आहे. भारत सरकारने वेळीच पावले का उचलली नाहीत? हा प्रश्न वारंवार उपस्थित होईल.
चीनच्या वुहान इथे डिसेंबरमध्येच कोरोनाची लागण झाली. ७ जानेवारीला पहिला बळी गेला. हा विषाणू अत्यंत जलद गतीने पसरतो आहे याबाबत भारताला जाणीव नव्हती असे नाही. वुहान ते भारताचे अंतर केवळ साडेतीन हजार किलोमीटर आहे. हा विषाणू हवेतून पसरत नसला तरी भारत आणि चीनचे व्यापारी संबंध लक्षात घेता भारत सरकारच्या देखरेख समितीची बैठक ८ जानेवारीला पार पडली. या बैठकीचे सार्थक काय झाले ते अद्याप गुलदस्त्यात आहे. कोरोनावर मोदी सरकार गाफील होते का? असा प्रश्न उपस्थित करणे धाडसाचे ठरते. तब्बल अडीच महिने कोरोनावर सरकारदरबारी केवळ कृतिशून्य चर्चा झाली. चीननंतर अनेक देशात कोरोना झपाट्याने पसरत होता तेव्हा सरकार वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये व्यस्त होती. लाखो लोक विदेशातून भारतात येत गेलेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, अमेरिकेचे राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचा भारत दौरा या बाबी सरकारच्या डोक्यावर होत्या. अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु असतानाच कोरोनाने भारताची मानगूट पकडली. पंतप्रधान मोदींना मात्र इकडे राजकीय लालसा खुणावत होती. मध्य प्रदेशातील सरकार पाडणे आणि आपले सरकार बनवणे त्यांना महत्त्वाचे वाटले. महाराजे म्हणवणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकांच्या जीवापेक्षा स्वत:च्या पुनर्वसनाला महत्त्व दिले. केंद्र सरकार शांत बसले म्हणून महाराष्टÑ, दिल्ली, केरळ आदी राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी स्वत:च पुढाकार घेत नियोजन केले. राहुल गांधी कोरोनाची देशात त्सुनामी येईल असे दीड महिन्यापासून ओरडत आहेत, परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले.
कोरोनावर सर्व राज्ये कामाला लागल्यानंतर मोदींनी रात्री आठ वाजताची घंटा वाजवली. मोदी देशाला संबोधित करतील असे म्हटले तरी जनतेच्या ह्दयाचा ठोका चुकतो. नोटबंदीच्या घोषणेची इथे पुनरावृत्ती झाली. त्यांनी २१ दिवस देशाला लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. जिथे आहेत तिथेच थांबा, असे आवाहन केले. रात्री १२ वाजतापासूनच अंमलबजावणी होत असल्याचा तो बिगूल होता. लोकांच्या हातात उरले होते केवळ चार तास!. त्यांच्या आवाहनात स्पष्टता नसल्याने विलगीकरणाच्या या प्रयोगाचे चित्र उलट दिसले. सगळ्या दुकानांमध्ये लांबच लांब रांगा लागल्यात. ज्यांना घराचे दार ओलांडायचे नव्हते त्यांनी दुकानांमध्ये तुफान गर्दी केली. मुलांच्या खेळण्यात ‘स्टॅच्यू’ हा एक खेळ आहे. ‘स्टॅच्यू’ हा शब्द उच्चारताच सहभागी मित्रास आहे त्याच स्थितीत राहावे लागते. बघायला छान वाटते. तो दिसायला पुतळा वाटतो तरी त्यातून विविध कला शिल्पांचे दर्शनही होत असते. पोरांना मजा येते. परंतु हा खेळ चालतो केवळ अर्धा- एक मिनिटेच. मात्र, २१ दिवसांसाठी देशाला ‘स्टॅच्यू’ करणे हा पोरखेळ नव्हता. हा विषय अत्यंत गंभीर आहे. ही घोषणा करण्यापूर्वी हातातून गेलेल्या अडीच महिन्यांत नियोजन करण्याची गरज नव्हती का? मोदींनी १९ मार्चला पहिल्यांदा जनता कर्फ्यूचे आवाहन केले तेव्हा ‘मला काही आठवडे हवेत’ हे कोड्यात न बोलता त्याच दिवशी स्पष्ट केले असते की, प्रत्येकाने आपापल्या गावी जावे किंवा सुरक्षित ठिकाणी असावे तर आता निर्माण झालेल्या स्थितीपासून नक्कीच वाचता आले असते.
जे कामाच्या किंवा रोजगाराच्या निमित्ताने दिल्लीत आहेत असे लाखो लोक आजही अडकून आहेत. हजारो लोक शेकडो किलोमीटर पायी चालत गावाकडे निघाले आहेत. यूपीएससीच्या तयारीसाठी देशभरातून लाखो तरूण दिल्लीत आलेले असतात. एकीकडे क्लास बंद दुसरीकडे घरच्या लोकांना त्यांची चिंता. विद्यार्थ्यांनी खोलीत अक्षरश: स्वत:ला डांबून घेतले आहे. देशभरात अनेकांच्या नोकºया गेल्यात. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिल्याने कालच मयूर विहार परिसरात एकाने गळफास घेत आत्महत्या केली. ट्रम्प भारतात आले. तेव्हा ईशान्य दिल्लीत दंगल सुरू होती. शेकडो घरे बेचिराख झालीत. १०० कुटुंबे मुस्तफाबादमध्ये शिबिरात दाखल झाली. लॉकडाऊनमुळे त्यांना इतक्या संख्येत एकत्र राहता येत नाही आणि दुसरा पर्यायही नाही. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लॉकडाऊन बाधितांसाठी १.७० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले, हे सरकारचे पाऊल शुभवर्तमानाची नांदी ठरू शकते. परंतु आज लोक उपाशी आहेत त्याचे काय?
कोरोना बाधितांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिकांना व्यक्तिगत संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) मिळत नाहीत. व्हेंटिलेटर्स, औषधी, रूग्णालये, खाटांचा सर्वत्र तुटवडा आहे. एम्समधील डॉक्टरांच्या वेदनांनी माणूस व्याकूळ होतो. दुसऱ्यांचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. आता सगळ्यांनीच जिद्दीने सामना करणे हा एकमेव पर्याय आहे.